आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले वर्चस्व गाजवत आहे. शिक्षणापासून तर अगदी सैन्यातदेखील महिला आपले स्थान निर्माण करत आहेत. अशातच इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. ब्रिटनची प्रसिद्ध गुप्तचर संस्था MI6 चे नेतृत्व आता एक महिला करणार आहे. या महिलेचे नाव आहे ब्लेझ मेट्रेवेली. त्यांच्या नियुक्तीची चर्चा जगभरात होताना दिसत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ब्लेझ मेट्रेवेली यांची निवड केली आहे. MI6 ही गुप्तचर संस्था १९०६ मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून या संस्थेच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली आहे.

ब्लेझ मेट्रेवेली या सध्या MI6 मध्ये तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाची जबाबदारी सांभाळत आहेत. ही भूमिका जेम्स बाँड चित्रपटांमधील ‘Q’ या पात्रासारखीच आहे. ‘Q’ हे पात्र गॅझेट्स आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ओळखले जाते. कीर स्टार्मर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटन अनेक धोक्यांना तोंड देत आहे आणि अशावेळीच नवीन प्रमुखाची निवड करण्यात आली आहे. कोण आहेत ब्लेझ मेट्रेवेली? MI6 काय आहे? त्यांच्या नियुक्तीवर लोकांची प्रतिक्रिया काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

कोण आहेत ब्लेझ मेट्रेवेली?

  • ब्लेझ मेट्रेवेली या दीर्घकाळापासून गुप्तचर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
  • आता त्या MI6 च्या एकमेव सार्वजनिकरित्या नियुक्त केलेल्या कर्मचारी ठरल्या आहेत.
  • त्यांनी स्वतः त्यांच्या नियुक्तीचा उल्लेख अभिमानाचा क्षण म्हणून केला आहे.
  • त्या म्हणाल्या, “माझ्या सेवेचे नेतृत्व करण्यास सांगितले गेल्याने मला अभिमान आणि सन्मान वाटतो.”
  • येत्या काही दिवसांत त्या या पदावर कार्यरत होतील.
  • त्या रिचर्ड मूर यांची जागा घेणार आहेत. रिचर्ड मूर यांनी पाच वर्षे एजन्सीचे प्रमुख म्हणून काम केले आहे.
  • MI6 च्या प्रमुखांना पारंपरिकपणे ‘C’ म्हणून ओळखले जाते. जेम्स बाँड या चित्रपटांमध्ये या प्रमुखांचा उल्लेख ‘M’ म्हणून करण्यात आला आहे.

मेट्रेवेली सध्या MI6 मध्ये तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन विभागाच्या महासंचालक आहेत. मेट्रेवेली या हे पद भूषवणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी मानववंशशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला आहे. त्यानंतर त्या १९९९ साली सेवेत रुजू झाल्या. गेल्या काही वर्षांत, त्यांनी MI6 आणि MI5 दोन्हीमध्ये वरिष्ठ भूमिका बजावल्या आहेत. प्रामुख्याने त्यांनी पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये ऑपरेशनल भूमिकांमध्ये काम केले आहे. ब्रिटनच्या गुप्तचर सेवांमध्ये व्यापक बदल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती झाली आहे. MI5 ने १९९२ मध्ये स्टेला रिमिंग्टन यांची पहिली महिला प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती, तर २००२ मध्ये एलिझा मॅनिंगहॅम-बुलर यांची नियुक्ती करण्यात आली होती. गव्हर्नमेंट कम्युनिकेशन्स हेडक्वार्टरला GCHQ म्हणून ओळखले जाते. ही ब्रिटनची एक गुप्तचर आणि सुरक्षा संस्था आहे. GCHQ ने २०२३ मध्ये त्यांची पहिली महिला प्रमुख म्हणून अँनी कीस्ट-बटलर यांची नियुक्ती केली होती. MI6 प्रमुख म्हणून, मेट्रेवेली या थेट परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांना अहवाल देतील.

त्यांच्यासमोरील आव्हाने कोणती?

रशिया, चीन आणि इराणशी व्यवहार करणे हे त्यांच्या सर्वोच्च पदावरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. ब्रिटीश गुप्तचर संस्थांनी रशियावर आरोप केला आहे की, रशिया इतर देशांना युक्रेनला पाठिंबा देण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण युरोपमध्ये अस्थिरता निर्माण करत आहे. २०२१ मध्ये, MI6 चे निवृत्त प्रमुख रिचर्ड मूर यांनी चीन हा संस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले होते. MI5 ने म्हटले आहे की, २०२२ पासून ब्रिटनमधील राजकीय विरोधकांच्या अपहरण, हत्या किंवा लक्ष्य करण्यात आलेल्या तब्बल २० प्रकरणांशी इराणचा संबंध आहे. पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले, “ब्लेझ मेट्रेवेलीची ऐतिहासिक नियुक्ती अशा वेळी झाली आहे, जेव्हा आपल्या गुप्तचर सेवांचे काम कधीही इतके महत्त्वाचे नव्हते.” त्यांनी पुढे म्हटले की, ब्रिटन सध्या अनेक धोक्यांचा सामना करत आहे. “अभूतपूर्व प्रमाणात धोक्यांचा सामना करावा लागत आहे. गुप्तचर जहाजे पाठवण्यात येत आहेत, अत्याधुनिक सायबर धोक्यांद्वारे हॅकर्स आपल्या सार्वजनिक सेवांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत. “

MI6 काय आहे?

MI6 याला औपचारिकरित्या सिक्रेट इंटेलिजेंस सर्व्हिस (SIS) म्हणून ओळखले जाते, ही ब्रिटनमधील विदेशी गुप्तचर संस्था आहे. या संस्थेची प्राथमिक भूमिका राष्ट्रीय सुरक्षेला समर्थन देणे, दहशतवाद रोखण्यासाठी आणि जागतिक स्तरावर ब्रिटनमधील नागरिकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी ब्रिटन बाहेरून गुप्तचर माहिती गोळा करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे आहे. या संस्थेला १९२० पासून MI6 म्हणून ओळखले जाऊ लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रेवेली यांच्या नियुक्तीवर अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?

परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांना मेट्रेवेली अहवाल सादर करणार आहेत. ते म्हणाले की, मेट्रेवेली या जागतिक अस्थिरता असताना आणि सुरक्षा धोक्यांमध्ये वाढ झाली असताना पदभार स्वीकारत आहेत. ते पुढे म्हणाले, “ब्लेझ मेट्रेवेली सुनिश्चित करतील की ब्रिटन या आव्हानांना तोंड देऊ शकेल, जेणेकरून ब्रिटनमधील नागरिक देशात आणि विदेशात सुरक्षित राहतील.” MI6 चे निवृत्त होणारे प्रमुख रिचर्ड मूर यांनी या नियुक्तीला ऐतिहासिक नियुक्ती म्हटले. ते म्हणाले, “ब्लेझ एक अत्यंत कुशल गुप्तचर अधिकारी आहेत. त्या तंत्रज्ञानावरील आमच्या अग्रगण्य विचारवंतांपैकी एक आहेत. MI6 च्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून त्यांचे स्वागत करण्यास मी उत्सुक आहे.”