युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. झेलेन्स्की यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात नुकतेच काही फेरबदल केले आहेत. या दरम्यान, त्यांनी संरक्षण मंत्री पदावरून माइखेलो फेडोरोव यांना हटवले आहे. फेडोरोव यांना हटवल्याने युक्रेनमधील लष्करी तसेच सामान्य जनतेतून झेलेन्स्की यांना विरोध होत आहे. युक्रेनची राजधानी कीव येथे काल (१६ जुलै) मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.
तंत्रज्ञानात कुशल असलेले ३५ वर्षीय माइखेलो फेडोरोव हे फक्त सहा महिनेच संरक्षण मंत्री राहिले. परंतु, २०१९ पासून ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या संपर्कात आहेत. फेडोरोव यांना मंत्रिमंडळातून हटवण्याचा निर्णय झेलेन्स्की यांनी घेतल्याने या निर्णयाला प्रचंड विरोध होत आहे. फेडोरोव यांना पदावरून हटवण्याचे कारण अद्याप झेलेन्स्की यांनी सांगितलेले नाही. परंतु, त्यांनी माध्यमांना सांगितले की, संरक्षण मंत्रालय आणि लष्करी नेतृत्व यांच्यात चांगला समन्वय हवा आहे.
युक्रेनचे लष्करप्रमुख ओलेक्झांडर सिरस्क्यी व फेडोरोव यांच्यात वाद असल्याने फेडोरोव यांना पदावरून हटवण्यात आले, असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, फेडोरोव यांची गच्छंती झाल्याने युक्रेनच्या आजी माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये, सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. युक्रेनच्या वायू दलाचे उपप्रमुख आणि काही संसदेच्या सदस्यांनी फेडोरोव यांची गच्छंती झाल्याने आपापल्या पदांचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. माइखेलो फेडोरोव नेमकं कोण आहेत? त्यांना पदावरून हटवल्याने युक्रेनच्या नेतृत्वाविरोधात आंदोलन का होत आहे? जाणून घेऊ.
माइखेलो फेडोरोव कोण आहेत?
माइखेलो फेडोरोव यांचा जन्म व्हासीलिव्का या गावात झाला. त्यांचे शिक्षण जवळील झेपोरिझ्झिया शहरात झाले. माइखेलो यांचे जन्मगाव सध्या रशियाने ताब्यात घेतले असून तिथे दररोज बॉम्बवर्षाव होतो. फेडोरोव यांनी मार्केटिंग स्पेशालिस्ट म्हणून काम केले आहे. त्यावेळी झेलेन्स्की हे टीव्ही शो होस्ट करायचे. २०१९ मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत झेलेन्स्की यांचा विजय झाला. त्यावेळी फेडोरोव यांनी झेलेन्स्की यांच्या सोशल मीडिया प्रचाराची धुरा सांभाळली होती.
झेलेन्स्की यांनी त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात फेडोरोव यांना स्थान दिले होते. त्यावेळी फक्त २८ वर्षे वय असलेल्या फेडोरोव यांना डिजिटल परिवर्तन मंत्री पद देण्यात आले होते. फेडोरोव यांनी दिआ (Diia) नावाचे एक मोबाईल अॅप सुरू केले होते. ‘दिआ’ या युक्रेनियन शब्दाचा अर्थ “कृती” असा आहे. ‘स्मार्टफोनमध्ये सरकार’ अशा ब्रिदवाक्याने या अॅपचा प्रचार करण्यात आला. सरकारी सुविधा जसे की, विवाह, घटस्फोट आणि वाहन नोंदणी या अॅपच्या माध्यमातून केली जात होती.
२०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तेव्हा इंटरनेट सुविधा बंद झाली होती. त्यावेळी फेडोरोव यांनी इलॉन मस्क यांना स्टारलिंकच्या माध्यमातून युक्रेनला इंटरनेट सेवा द्यावी, अशी विनंती केली होती. स्टारलिंकने युक्रेनमध्ये इंटरनेट सेवा दिली. त्यामुळे युक्रेनच्या सैन्याला मोठी मदत मिळाली. त्यावेळी नागरी सुविधांशी संबंधित हे अॅपही बंद झाले होते.
यु्द्धात तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल हे फेडोरोव यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी ‘आर्मी ऑफ ड्रोन्स’ (ड्रोन्सचे लष्कर) तयार केली होती. तसेच युद्धात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.
जानेवारी २०२६ मध्ये फेडोरोव यांना झेलेन्स्की यांनी बढती देत संरक्षण मंत्री पदावर नियुक्त केले. हा फेडोरोव यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. रशियात दर महिन्याला ५० हजार जणांचे मृत्यू होतील, असे धोरण फेडोरोव यांनी आखले होते. तसेच रशियाचे हवाई हल्ला करण्याचे सामर्थ्य कमी होईल व रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे नियोजन फेडोरोव यांनी केले होते. दरम्यान, त्यांचे हे धोरण यशस्वी करण्यात ते अपयशी ठरले. तसेच युद्धासाठी सैन्य तयार करण्यातही ते कमी पडल्याचे अहवालांतून समोर आले आहे.
फेडोरोव यांना संरक्षण मंत्री पदावरून का हटवण्यात आले?
फेडोरोव यांना संरक्षण मंत्री पदावरून का हटवले याचे कारण युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अद्याप दिलेले नाही. परंतु, आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालानुसार, फेडोरोव यांना संरक्षण मंत्रालय व लष्करात काही बदल करायचे होते. त्यावरून त्यांचे लष्कर प्रमुख सिरस्क्यी यांच्याशी वाद झाले. हे फेडोरोव यांच्या गच्छंतीचे कारण मानले जात आहे. तसेच युद्धासाठी सैन्य तयार करण्यात ते कमी पडल्याचे कारणही दिले जात आहे.
झेलेन्स्की यांच्या विरोधात आंदोलन का होत आहे?
युक्रेनची राजधानी कीवमध्ये तरूणाई रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. त्यांच्या हातात झेलेन्स्कींच्या निर्णयाला विरोध करणारे बॅनर्स आहेत. युक्रेनच्या वायूदलाचे उपप्रमुख पावलो येलीझारोव यांनी त्यांचा राजीनामा फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिले की, “फेडोरोव यांना पदावरून हटवल्याने युक्रेनच्या संरक्षण क्षमतेचे मोठे नुकसान होणार आहे.” झेलेन्स्की यांच्या निर्णयाला युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. एका कार्यक्षम मंत्र्याला गरज नसताना हटवले, अशी प्रतिक्रिया युक्रेनमधील जनतेतून उमटत आहे.
