युक्रेन आणि रशिया या दोन देशांतील युद्धाचा संपूर्ण जगाला फटका बसला आहे. अद्याप हे युद्ध थांबलेले आहे. रोज या युद्धभूमीतून जीवित तसेच वित्तहानीचे वृत्त येत असते. असे असतानाच युक्रेनच्या रशिया नियंत्रित भागातील काखोव्हका या मोठ्या धरणाची भिंत फुटल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर युक्रेनच्या काही भागात पाण्याची पातळी वाढत आहे. तर काही भागात पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होऊ शकते. विशेष म्हणजे याच धरणाच्या परिसरात असलेल्या झापोरीझ्झियाच्या अणुऊर्जा प्रकल्पालाही यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर धरणाची भिंत नेमकी का फुटली? त्याला जबाबदार कोण? तसेच या धरणफुटीचा युक्रेनवर काय परिणाम होणार? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण युक्रेनमधील निपरो नदीवरील काखोव्हका धरणाची भिंत फुटली आहे. या घटनेनंतर युक्रेनमध्ये गंभीर संकट निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश या दुर्घटनेला एकमेकांना जबाबदार ठरवत आहेत. युक्रेनने केलेल्या गोळीबारामुळे हे धरण फुटले आहे, असा दावा रशियाने केला आहे.

हेही वाचा >> इन्स्टाग्राम, डार्कनेट अन् क्रिप्टोकरन्सी, ड्रग्ज तस्करीसाठी स्मग्लर्सचा नवा फंडा काय? वाचा सविस्तर!

काखोव्हका धरणाचे वैशिष्य काय आहे?

काखोव्हका धरण हे ३० मीटर उंच तर ३.३ किलोमीटर लांब आहे. हे धरण १९५६ साली निपरो नदीवर उभारण्यात आले होते. काखोव्हका अणुउर्जा प्रकल्पाचा एक भाग म्हणून या धरणाची उभारणी करण्यात आली होती. रशियाने २०१४ साली क्रिमिया हा युक्रेनचा प्रांत आपल्या देशात विलीन केला होता. या भागाला याच धरणातून पाणीपुरवठा होतो. यासह रशियाच्या ताब्यात असलेल्या झापोरीझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पालाही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात एकूण १८ क्यूबिक किलोमीटर पाणीसाठा आहे. तुलना करायची झाल्यास अमेरिकेतील ग्रेट सॉल्ट लेकमध्ये जेवढे पाणी आहे, तेवढा पाणी या धरणात आहे.

युक्रेनमध्ये नेमके काय घडले? धरण फुटण्याचे कारण काय?

निपरो नदीरवरील काखोव्हका धरणाची भिंत का फुटली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र एकीकडे युद्ध सुरू असताने रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश एकमेकांना जबाबदार धरत आहेत. धरण फुटल्यानंतर युक्रेनने रशियावर गंभीर आरोप केले आहेत. युक्रेनने रशियाला थेट दहशतवादी म्हटलं आहे. “दहशतवादी रशियाने काखोव्हका जलविद्यूत प्रकल्पावरील धरणाला नेस्तनाबूत केले आहे. रशियाला युक्रेनच्या भूमीवरून हाकलून लावणे गरजेचे आहे, हेच यावरून स्पष्ट होते,” असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की टेलिग्राम या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून म्हणाले आहेत. तर युक्रेनच्या दक्षिणेतील सशस्त्र दलाने “काखोव्हका धरण हे रशियाच्या फौजांनी फोडले आहे. यामध्ये किती हानी झाली, पाणी किती वाया गेलेले आहे तसे या घटनेमुळे कोणकोणत्या आणि किती भागाला धोका आहे, हे तपासले जात आहे,” असे सांगितले आहे.

हेही वाचा >> इंडोनेशियातील हिंदू भाविक जिवंत ज्वालामुखीवर का चढत आहेत?

धरणफुटीला युक्रेन जबाबदार, रशियाचा दावा

तर दुसरीकडे या धरणफुटीला युक्रेन जबाबदार असल्याचा आरोप रशियाने केला आहे. रशियाच्या खेरसनमधील प्रशासनाने या घनटेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. “युक्रेनच्या सैन्याने काखोव्हका जलविद्युत प्रकल्पावर हल्ला केला. यामुळे धरणाच्या वरच्या भागाचे नुकसान झाले आहे,” असा दावा रशियाने केला आहे.

झापोरिझ्झिया येथे तैनात केलेल्या रशियन अधिकाऱ्याने धरणावर कोणीही हल्ला केलेला नाही, असे सांगितले आहे. “याआधीच धरणाची भिंत खराब झाली होती. त्यामुळे पाण्याच्या दाबामुळे ती भिंत फुटली,” असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. रशियान वृत्तसंस्था TASS नेदेखील असेच वृत्तांकन केले आहे.

हेही वाचा >> देशांतर्गत विमान प्रवास महागला, दिल्ली-मुंबई प्रवासासाठी मोजावे लागले १८ हजार रुपये; नेमके कारण काय?

धरणाची भिंत फुटल्यामुळे नेमका काय परिणाम होणार?

धरणाची भिंत फुटल्यामुळे काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. युक्रेनच्या दक्षिणेकडच्या खेरसन या भागातील साधारण १४ वसाहतींना या धरणफुटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. या भागात साधारण २२ हजार लोक राहतात. या भागात पुराची शक्यता असल्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

क्रिमिया द्विपकल्पाला काय धोका आहे?

रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमिया या प्रांतालाही धरणाची भिंत फुटल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे उत्तर क्रिमिया येथे असलेल्या कालव्यातील पाणीपातळी कमी होण्याची शक्यता हे, असे येथील रशियाने नियुक्त केलेल्या गव्हर्नर यांनी सांगितले आहे. क्रिमिया हा प्रदेश गोड्या पाण्यासाठी याच कालव्यावर अवलंबून आहे. २०१४ साली रशियाने क्रिमिया प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर युक्रेनने या कालव्याचा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यामुळे क्रिमियामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. आता काखोव्हका धरण फुटल्यामुळे आगामी काळात या भागात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक कशी होते? नोकरीपायी चार महिन्यांत साडेपाच कोटी गमावले?

अणुउर्जा प्रकल्पाला काय धोका आहे?

झापोरिझ्झिया हा युरोपमधील सर्वांत मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तो युक्रेनच्या दक्षिणेकडे स्थित असून सध्या हा प्रकल्प रशियाच्या ताब्यात आहे. धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेने ‘आम्ही युक्रेनमधील धरणफुटीच्या घटनेवर गांभीर्याने लक्ष ठेऊन आहोत. सध्यातरी आण्विक सुरक्षेचा कोणताही धोका नाही,’ असे म्हटले आहे. यासह रशियातील राज्य अणुउर्जा कंपनी रोसाटॉम या संस्थेनेही झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाला कोणताही धोका नाही, असे सांगितले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine russia war kakhovka dam collapse know detail information prd
First published on: 07-06-2023 at 20:38 IST