धर्मेश शिंदे
या जगात आजही आधुनिकतेपासून दूर राहणारी मंडळी वास्तव्य करून आहेत. या समुदायांचा अभ्यास सातत्याने करण्यात येत आहे. नुकतेच ॲमेझॉन आणि नॉर्थ सेंटिनेल बेटावरील आदिम जमातींचे दुर्मीळ फुटेज ड्रोन कॅमेऱ्यांनी टिपले, ज्यातून हजारो वर्षांपासून बाह्य जगाशी कोणताही संपर्क न साधता जगणाऱ्या समुदायांच्या जीवनपद्धतीचा उलगडा झाला. हे समूह कोणते आहेत आणि त्यांची जीवनपद्धती कशी आहे याचा हा आढावा…

संपर्कहीन समुदायांच्या चित्रणात काय आढळले?

ब्राझील सरकारचा आदिवासी व्यवहार विभाग (फुनाई) आणि संपर्कहीन आदिम समुदायांचे संवर्धन करणारे गट यांनी ड्रोनद्वारे आधुनिक समाजापासून अलिप्त राहणाऱ्या समुदायांचे चित्रण केले. या चित्रणामध्ये, दुर्गम भागातील लोक जंगलातून ड्रोनचे निरीक्षण करताना आणि काही प्रकरणांमध्ये, ते ड्रोनवर धनुष्यबाण रोखताना दिसून आले.

ॲमेझॉनमध्ये राहणारे गदाधारी काेण आहेत?

पृथ्वीवरील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा ब्राझीलच्या ॲमेझॉन वर्षावनात अधिक संपर्कहीन मूळनिवासी लोक राहतात. फुनाईच्या अंदाजानुसार, या प्रदेशात किमान १०० संपर्कहीन गट आहेत. पेरू सीमेला लागून असलेल्या दुर्गम जवारी खोऱ्यात त्यांची सर्वाधिक संख्या आहे, ज्यात कोरुबो लोकांचा समावेश आहे. संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या गदांमुळे या लोकांना त्या भागात कासेतेरोस किंवा गदाधारी म्हणून ओळखले जाते. दुसरीकडे मासाको प्रदेशात धनुष्यबाण वापरणारा समुदाय राहतो. यांची संख्या अंदाजे ३०० आहे.

फुनाईच्या अधिकाऱ्यांना त्यांचा अभ्यास करताना सापडलेल्या एका धनुष्याची लांबी चार मीटरपेक्षा जास्त होती. हे धनुष्यबाण या भागाच्या शेजारीच असलेल्या बोलिव्हिया येथे राहणाऱ्या सिरिओनो लोकांच्या धनुष्यासारखेच होते. हे गट त्यांच्या अस्तित्वाच्या विशिष्ट खुणा मागे सोडतात. हा समुदाय जेथे राहून गेला होता तेथे कासवांच्या कवचासारखे ढिगारे सापडले. यातून कासव हे त्यांचे पसंतीचे अन्न असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. ब्राझीलच्या माटो ग्रोसो राज्यात असलेली पिरिपकुरा जमात ही संपर्कहीन समुदायांपैकी एक आहे. या समुदायात आता फक्त काही मोजकेच लोक उरले आहेत. गाविआओ आदिवासी लोक पिरिपकुरा जमातीला ‘फुलपाखरू लोक’ म्हणतात, कारण ते सतत जंगलातून फिरत असतात. ते तुपी-कवाहिब भाषा बोलतात, जी ब्राझीलमधील अनेक लोकांमध्ये प्रचलित असलेली एक भाषा आहे.

अंदमान बेटांवरील रहस्य कायम

भारताच्या अंदमान बेटांमधील नॉर्थ सेंटिनेल बेटावरील सेंटिनेली जमात हे एक अत्यंत वेगळे उदाहरण आहे. ते अंदाजे ६० हजार वर्षांपासून जवळजवळ पूर्णपणे अलिप्त राहिले आहेत. या जमातीला रोगांपासून वाचवण्यासाठी भारत सरकारने कोणत्याही प्रकारच्या संपर्कावर कडक बंदी घातली आहे. त्यांची लोकसंख्या ५० ते २०० च्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. मानववंशशास्त्रज्ञ टी . एन. पंडित यांना या जमातीचा दूरवरून अभ्यास करण्याची परवानगी मिळाली होती. त्यांनी या जमातीचे वर्णन ‘स्वयंपूर्ण आणि बाह्य जगापासून पूर्णपणे स्वतंत्र’ असे केले आहे. त्यांच्या राहणीमानाबद्दल आणि भाषेबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्यामुळे ते आजही एक मोठे रहस्य आहे.

माकडांना पाळणारे आवा आहेत कोण?

आवा हा जंगली माकडांना पाळीव प्राणी म्हणून पाळणारा ब्राझीलमधील संपर्कहीन गट आहे. या गटातील लोक हार्पी गरुडाच्या पंखांपासून बनवलेले पंखे असलेले दोन मीटर लांबीचे धनुष्य वापरतात. आवा लोक जंगलातून सतत फिरत असतात. ते फांद्या आणि ताडाच्या पानांपासून काही तासांत निवारा बांधू शकतात आणि काही दिवसांनी तो सोडूनही देतात. ही जमात विलक्षण पाळीव प्राणी सांभाळणारी आहे. बहुतेक कुटुंबांमध्ये माणसांपेक्षा कितीतरी जास्त पाळीव प्राणी असतात, ज्यात रॅकूनसारखे दिसणारे कोआटी, रानडुक्कर, किंग गिधाडे आणि माकडे यांचा समावेश आहे. आवा समुदाय राहत असलेल्या जंगलापासून काही मीटर अंतरावरून एक रेल्वेमार्ग जातो. १९८०च्या दशकात जेव्हा ९०० किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधण्यात आला, तेव्हा अधिकाऱ्यांनी आवा लोकांशी संपर्क साधून त्यांना वसवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर लगेचच आवा समुदायावर आपत्ती ओढवली. मलेरिया आणि फ्लूने त्या समुदायांमध्ये थैमान घातले. एका समुदायातील ९१ लोकांपैकी, चार वर्षांनंतर केवळ २५ जण जिवंत होते.

आदिम समुदायांसमोरील धोके कोणते?

आदिम जमातींसाठी बाहेरील लोकांशी अगदी अल्प प्रमाणात संपर्क आला तरी तो अनेकदा जीवघेणा ठरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. इन्फ्लूएंझा आणि गोवर यांसारख्या सामान्य आजारांविरुद्ध त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती नसल्यामुळे साथीचे रोग अशा समुदायांसाठी विनाशकारी ठरू शकतात. सर्व्हायव्हल इंटरनॅशनल या जागतिक आदिवासी हक्क गटाच्या मते, पहिल्या संपर्काच्या एका वर्षात एखाद्या जमातीतील ५० टक्के लोकसमूह नष्ट होणे ही नित्याची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. माटिस लोकांच्या गटाने अशाच संपर्कामुळे आपली निम्मी लोकसंख्या गमावली.

कावाहिवा जमातीला पुढील पिढी नको?

रियो पार्डोमधील कावाहिवा जमातीने मुले जन्माला घालणे थांबवले, अशी शक्यता आहे. याचे कारण त्यांना सतत लाकूडतोड्यांपासून पळ काढावा लागतो. फुनाई अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार त्यांची संख्या ५० ते १०० होती, पण आज हा गट खूपच लहान असू शकतो. त्यांच्या जमिनीला अद्याप संरक्षण मिळालेले नाही आणि ब्राझीलमधील सर्वात हिंसक सीमावर्ती शहरांपैकी एक असलेल्या कोल्निझामधून कार्यरत असलेले लाकूडतोडे त्यांच्या जंगलावर सतत अतिक्रमण करतात. त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतलेला असू शकतो.

संपर्कहीनता हेच त्यांचे संरक्षण?

संपर्कहीन समुदायांचे संरक्षण करायचे असल्यास त्यांना एकटे सोडणे हाच एक पर्याय असल्याचे फुनाईच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. फुनाईने १९८७ सालापासून संपर्कविरहित लोकांच्या हितासाठी एक विभाग चालवला आहे. ही संस्था घुसखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी संरक्षण चौक्या उभारते. सन २०१४ मध्ये ब्राझील सरकारने आवा भूमीतून अवैध लाकूडतोड करणाऱ्यांना हाकलून लावण्यासाठी सैन्य पाठवले. टुडे सर्व्हायव्हल इंटरनॅशनलचे माजी संचालक स्टीफन कॉरी म्हणतात की, या समुदायांना टिकायचे असेल, तर संपर्क न ठेवण्याच्या त्यांच्या निवडीचा आदर केलाच पाहिजे. ब्लेड नावाच्या एका आवा माणसाने सर्व्हायव्हल इंटरनॅशनलला सांगितले की, जर तुम्ही जंगल नष्ट केले, तर तुम्ही आवा लोकांनाही नष्ट कराल.

dharmesh.shinde@expressindia.com