संदीप कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या युवा महिला संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. प्रथमच झालेल्या महिलांच्या युवा विश्वचषक स्पर्धेत भारताच्या संघाने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी करताना आपली छाप पाडली. या विजेतेपदाच्या प्रवासात कोणते खेळाडू निर्णायक ठरले, महिला क्रिकेटसाठी जेतेपद विशेष का, याचा घेतलेला हा आढावा.

भारताचा विश्वचषक स्पर्धेतील प्रवास कसा होता?

भारतीय युवा महिला संघाने या विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासूनच चांगला खेळ करत सर्वांचे लक्ष वेधले. भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ गडी राखून नमवत चांगली सुरुवात केली. यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात संयुक्त अरब अमिराती संघावर १२२ धावांनी मोठा विजय नोंदवला. स्कॉटलंडवरही त्यांनी ८३ धावांनी मात केली. साखळी फेरीतील या कामगिरीनंतर भारताने ‘सुपर सिक्स’ गटात धडक मारली. भारताला पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून ७ गडी राखून पराभव पत्करावा लागला. पण नंतर दुसऱ्याच सामन्यात त्यांनी श्रीलंकेवर ७ गडी राखून विजयाची नोंद केली. या विजयामुळे भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. उपांत्य सामन्यात त्यांनी न्यूझीलंडवर ८ गडी राखून मात करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात त्यांनी इंग्लंडवर ७ गडी राखून विजय मिळवत प्रथमच जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

विश्लेषण: हॉकी पुन्हा नैसर्गिक हिरवळीच्या पृष्ठभागाकडे वळणार का? आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ काय विचार करतो?

भारताच्या यशात श्वेता सेहरावतची कामगिरी कशी ठरली निर्णायक?

विश्वचषक स्पर्धेत सलामीवीर श्वेता सेहरावतने ९९च्या सरासरीने २९७ धावा करत भारतीय संघाच्या जेतेपदात निर्णायक भूमिका पार पाडली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सेहरावतने ५७ चेंडूंत नाबाद ९२ धावांची खेळी केली. या कामगिरीसाठी तिची सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. संयुक्त अरब अमिरातविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सेहरावतने ४९ चेंडूंत नाबाद ७४ धावा केल्या. यानंतर स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत तिने मधल्या फळीत फलंदाजी करताना १० चेंडूंत नाबाद ३१ धावांचे योगदान दिले. तिला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१, श्रीलंकेविरुद्ध १३ धावाच करता आल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिने ४५ चेंडूंत नाबाद ४५ धावांची निर्णायक खेळी केली. अंतिम सामन्यात मात्र, सेहरावतला केवळ पाच धावाच करता आल्या.

भारतीय गोलंदाजांनी स्पर्धेत कशी छाप पाडली?

भारतीय गोलंदाजांनीही या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. लेग-स्पिनर पार्शवी चोप्राने सहा सामन्यांत ११ बळी मिळवले. तर, मन्नत कश्यपने ६ सामन्यांत ९ आणि अर्चना देवीने ७ सामन्यांत ८ गडी बाद केले. विशेष म्हणजे या तिघीही फिरकी गोलंदाज आहेत. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्चना, पार्शवी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. तर, मन्नतने एक गडी बाद करत विजयाला हातभार लावला. स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत मन्नत (१२ धावांत ४ बळी) आणि अर्चना (१४ धावांत ३ बळी) यांनी योगदान दिले. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पार्शवीने २० धावांत ३ बळी मिळवले. या कामगिरीसाठी तिची सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

विश्लेषण: महिला प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील संघ खरेदीसाठी कोणी लावली सर्वाधिक बोली? ‘बीसीसीआय’ने केली किती कोटींची कमाई?

शफाली वर्मा आणि रिचा घोष यांच्या अनुभवाचा कितपत फायदा?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) प्रथम युवा महिलांच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले गेले. त्यामुळे संघात अनुभवी खेळाडू असणे महत्त्वाचे होते. भारतीय संघात सलामीवीर शफाली वर्मा आणि आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषला स्थान देण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेल्या शफालीवर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. शफालीने या स्पर्धेत फलंदाजीसह गोलंदाजीतही योगदान दिले. शफालीने या स्पर्धेत १७२ धावांसह ४ गडीही बाद केले. रिचाला म्हणावी तशी चमक दाखवता आली नसली, तरीही आंतरराष्ट्रीय संघांविरुद्ध खेळण्याच्या अनुभवाचा फायदा त्यांना या स्पर्धेमध्ये झाला. शफालीच्या नेतृत्वगुणाचेही यावेळी सर्वांकडून कौतुक झाले. शफालीने आतापर्यंत भारताकडून ४९ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत.

प्रशिक्षक नूशीन अल खादीर यांचेही योगदान…

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या माजी खेळाडू नूशीन अल खादीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. नूशीन यांनी भारताकडून ७८ एकदिवसीय, दोन ट्वेन्टी-२० आणि पाच कसोटी सामने खेळले आहेत. या वेळेची आपल्याला बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती अशी भावना जेतेपद मिळवल्यानंतर नूशीन यांनी व्यक्त केली. आम्ही पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे आणि हे जेतेपद आम्हाला १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत मिळाले. या जेतेपदामुळे आपल्या देशात कौशल्याची कोणतीही कमतरता नसल्याचे कळते. संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली नाही. त्यानंतरही संघ एकजुटीने खेळला हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असे नूशीन यांनी अंतिम सामना संपल्यानंतर सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under 19 women world cup champion team india historic victory print exp pmw
First published on: 31-01-2023 at 10:07 IST