Explore key insights for Pain Awareness Month: “डॉक्टर, माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत, मग मला इतकं दुखतंय का?” किंवा “व्यायाम केला की त्रास वाढतो, मग व्यायाम बंद करू का?” अशा अनेक प्रश्नांनी वेदनेसोबत जगणाऱ्या व्यक्ती त्रस्त असतात. वैद्यकीय जगतात केवळ वेदनाशामक औषधे देण्याऐवजी आता रुग्णाची वेदना समजून घेणे आणि त्याला उपचारात सहभागी करून घेणे याला प्राधान्य दिले जात आहे.
मला इतकं का दुखतंय?
“डॉक्टर, माझे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, मग मला इतकं का दुखतंय?”
“एमआरआयमध्ये झीज दिसतेय म्हणजे आता माझं दुखणं आयुष्यभर राहणार का?”
“व्यायाम केला की, दुखतं, मग मी व्यायामच बंद करू का?”
वेदनेसोबत जगणाऱ्या व्यक्तीच्या मनात असे अनेक प्रश्न असतात. पण अनेकदा उपचाराच्या प्रक्रियेत आपण वेदना कमी करण्यावर इतकं लक्ष केंद्रित करतो की, त्या व्यक्तीला तिच्या वेदनेबद्दल काय समजलं आहे, तिला कोणती माहिती मिळाली आहे आणि उपचाराच्या निर्णयात तिचा किती सहभाग आहे, याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही.
वेदना समजून घेणं
याच पार्श्वभूमीवर यंदाच्या (सप्टेंबर 2026) पेन अवेयरनेस मंथ (Pain Awareness Month) ची ‘अंडरस्टँड’, ‘एज्युकेट’ अँड ‘पार्टनर’ (‘Understand’, ‘Educate’ and ‘Partner’) ही संकल्पना विशेष महत्त्वाची ठरते. वेदनेची काळजी म्हणजे फक्त वेदना कमी करणं नाही. आधी वेदना समजून घेणं, नंतर रुग्णाला वेदनेबद्दल योग्य माहिती देणं आणि उपचाराच्या प्रवासात रुग्णासोबत एकत्र काम करणं, हा त्या मागचा अधिक व्यापक दृष्टिकोन आहे.

Understand – आधी वेदना समजून घ्या
वेदना ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. एकाच प्रकारची दुखापत असलेल्या दोन व्यक्तींना समान प्रमाणात वेदना जाणवतीलच असं नाही. एखाद्याला किरकोळ दुखापतीनंतरही तीव्र वेदना जाणवू शकतात, तर दुसऱ्या व्यक्तीला तुलनेने मोठ्या दुखापतीनंतरही कमी वेदना जाणवते. कारण वेदना ही फक्त शरीरातील ऊतींच्या स्थितीवर अवलंबून नसते. झोपेची कमतरता, मानसिक ताण, भीती, पूर्वीचा वेदनेचा अनुभव, कामाचा ताण, सामाजिक परिस्थिती आणि व्यक्तीला आपल्या समस्येबद्दल असलेली समज या अनेक घटकांचा वेदनेच्या अनुभवावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच रुग्णाने “मला खूप दुखतंय” असं सांगितल्यावर पहिला प्रतिसाद “तुमच्या रिपोर्टमध्ये तर काही नाही” असा नसावा.
वेदना दिसत नसली तरी ती खरी असते
रुग्णाच्या अनुभवाला मान्यता देणं म्हणजे त्याच्या वेदनेचं कारण मान्य करणं नव्हे; तर त्याचा अनुभव गांभीर्याने ऐकून घेणं होय. रिपोर्ट आणि वेदना नेहमी समान गोष्ट सांगत नाहीत. आजच्या काळात X-ray, MRI आणि इतर तपासण्यांमुळे शरीरातील संरचनात्मक बदल सहज दिसू शकतात. पण प्रत्येक ‘स्ट्रक्चरल चेंज’ हा वेदनेचं एकमेव किंवा थेट कारण असेलच असं नाही.
रिपोर्ट म्हणजे संपूर्ण रुग्ण नव्हे
उदाहरणार्थ, वय वाढताना मणक्यात किंवा सांध्यांमध्ये काही बदल दिसू शकतात. काही व्यक्तींना असे बदल असूनही वेदना नसतात, तर काहींना वेदना असू शकतात. म्हणून रिपोर्ट महत्त्वाचा असला तरी रिपोर्ट म्हणजे संपूर्ण रुग्ण नव्हे. रुग्णाची लक्षणं, कार्यक्षमता, दैनंदिन जीवन, भीती, उद्दिष्टं आणि एकूण परिस्थिती यांचा विचार करूनच वेदनेचं आकलन करणं आवश्यक आहे.
Educate :योग्य माहिती देणं ही उपचाराचीच एक पायरी
वेदनेबद्दल चुकीची माहिती अनेकदा भीती वाढवते. “तुमची पाठ खराब झाली आहे.”, “गुडघे झिजले आहेत, आता जास्त चालू नका.”, “हा मणका कमकुवत आहे.”, “एकदा डिस्क बाहेर आली की आयुष्यभर काळजी घ्यावी लागेल.” अशा वाक्यांमुळे रुग्णाच्या मनात आपल्या शरीराविषयी भीती निर्माण होऊ शकते. त्यामुळे रुग्णाला निदान सांगणं पुरेसं नाही. त्या निदानाचा अर्थ काय आहे आणि त्यानंतर काय करता येऊ शकतं हे समजावून सांगणं अधिक महत्त्वाचं आहे.
शब्दांमध्येही उपचाराची ताकद
उदाहरणार्थ, गुडघ्यात ऑस्टिओआर्थरायटीस आहे असं सांगण्याबरोबरच, त्याचा अर्थ हालचाल कायमची बंद करायची असा नसून योग्य व्यायाम, शारीरिक सक्रियता, वजन व्यवस्थापन आणि इतर उपचारांच्या मदतीने कार्यक्षमता सुधारता येऊ शकते, हे समजावणं आवश्यक आहे. शब्दांमध्येही उपचाराची ताकद असते. आरोग्य व्यावसायिक वापरत असलेले शब्द रुग्णाच्या वेदनेच्या अनुभवावर आणि हालचालींबद्दलच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात.
सत्य, अचूक आणि आशावादी माहिती
“तुमचा सांधा झिजला आहे” याऐवजी “तुमच्या सांध्यामध्ये काही बदल दिसत आहेत; पण तुमची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो” असं सांगणं रुग्णाला अधिक सक्षम करू शकतं.
याचा अर्थ रुग्णाला खोटी आशा देणं नाही. सत्य, अचूक आणि आशावादी माहिती देणं हा pain education चा महत्त्वाचा भाग आहे.
Partner – उपचारात रुग्णाला भागीदार करा
पारंपरिक पद्धतीत अनेकदा डॉक्टर किंवा थेरपिस्ट निर्णय घेतो आणि रुग्णाने तो पाळायचा असतो.
पण प्रत्येक रुग्णाची गरज, जीवनशैली आणि उद्दिष्टं वेगळी असतात. कुणाला वेदना कमी करून कामावर परतायचं असतं. कुणाला नातवंडांसोबत खेळता यावं असं वाटतं. कुणाला पुन्हा जिने चढता यावेत, तर कुणाला सकाळचं चालण पुन्हा सुरू करायचं असते. म्हणून उपचाराचं उद्दिष्ट फक्त “Pain score कमी करणं” असण्याची गरज नाही. “तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे?” हा प्रश्न उपचाराच्या चर्चेचा भाग असायला हवा.
Shared Decision-Making म्हणजे काय?
रुग्णाला उपलब्ध उपचारांचे पर्याय, त्यांचे फायदे, मर्यादा आणि संभाव्य परिणाम समजावून सांगून त्याच्या प्राधान्यांचा विचार करून निर्णय घेणं म्हणजे Shared Decision-Making. यामुळे रुग्ण उपचाराचा निष्क्रिय स्वीकारकर्ता राहत नाही. तो उपचाराच्या प्रक्रियेचा सहभागी होतो. विशेषतः दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदनांमध्ये हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, कारण अशा परिस्थितीत उपचार म्हणजे फक्त एखादी गोळी किंवा काही दिवसांचा व्यायाम नसतो. स्वतःच्या शरीराविषयीची समज, हालचालीवरील आत्मविश्वास आणि दैनंदिन जीवनातील सहभाग यांचाही त्यात समावेश असतो.
Physiotherapy मध्ये ‘Partner’ का महत्त्वाचा?
फिजिओथेरेपीमध्ये रुग्णाला फक्त व्यायामांची यादी देणं पुरेसं नाही. तर रुग्णाला तो व्यायाम का करायचा आहे, कोणत्या हालचाली सुरक्षित आहेत, शरीराची क्षमता कशी वाढवायची आणि प्रगती कशी ओळखायची हे समजणं आवश्यक आहे. काही रुग्णांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग महत्त्वाचं असेल, काहींसाठी ग्रेडेड एक्टिविटी महत्त्वाची असेल तर काहींसाठी हालचालीबद्दलची भीती कमी करणं आवश्यक असेल. फिजिओथेरपिस्टचा उद्देश रुग्णाला कायम उपचारावर अवलंबून ठेवणं नसून हळूहळू स्वतःच्या शरीराचं व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम करणं हा असायला हवा.
Pain Awareness म्हणजे फक्त वेदनेची जाणीव नव्हे
- वेदनेबद्दल जागरूकता निर्माण करणं म्हणजे लोकांना फक्त “Pain is important” सांगणं नाही.
- त्यांना हे समजणं गरजेचं आहे की, वेदना ही खरी आहे.
- वेदना म्हणजे नेहमीच tissue damage नाही.
- रिपोर्टमधील प्रत्येक बदल हा वेदनेचा थेट स्रोत असेलच असं नाही.
- वेदनेबद्दलची भीती आणि चुकीची माहिती हालचालीवर परिणाम करू शकते.
- आणि योग्य माहिती, सक्रिय सहभाग व वैयक्तिक उद्दिष्टांवर आधारित उपचारामुळे व्यक्तीला अधिक सक्षम होता येऊ शकतं.
तीन शब्द, पण उपचाराची नवी दिशा
- Understand. Educate. Partner.
- पहिलं पाऊल- रुग्णाची वेदना समजून घेणं.
- दुसरं पाऊल- त्याला योग्य आणि वैज्ञानिक माहिती देणं.
- तिसरं पाऊल- उपचाराच्या प्रवासात त्याच्यासोबत भागीदारीने चालणं.
- कारण रुग्णाला फक्त “काय झालं आहे?” हे सांगणं पुरेसं नाही.
- त्याला “याचा अर्थ काय?”, “मी काय करू शकतो?” आणि “पुढे आपण काय करू?” या प्रश्नांची उत्तरंही मिळायला हवीत.
वेदनेसोबत जगणाऱ्या व्यक्तीला समजून घेणं
वेदना कमी करणं महत्त्वाचं आहे; पण वेदनेसोबत जगणाऱ्या व्यक्तीला समजून घेणं, शिक्षित करणं आणि सक्षम करणं तितकंच महत्त्वाचं आहे. Pain Awareness Month ची ‘Understand, Educate, Partner’ ही थीम आपल्याला उपचाराकडे पाहण्याचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन देते. रुग्णाला केवळ त्याच्या वेदनेच्या तीव्रतेने पाहू नका; त्याच्या अनुभवाला समजून घ्या, त्याला योग्य माहिती द्या आणि उपचाराच्या निर्णयात त्याला तुमचा भागीदार करा. कारण चांगलं वेदना व्यवस्थापन हे फक्त वेदना कमी करण्याची प्रक्रिया नाही; ती व्यक्तीला तिच्या शरीराविषयी समज, स्वतःवर विश्वास आणि पुन्हा सक्रिय जीवनाकडे जाण्याची दिशा देण्याची प्रक्रिया आहे.
वेदना ऐका.
वेदना समजावून सांगा.
आणि रुग्णाच्या सोबत चालत राहा.
