Varadarajan Mudaliar Mumbai underworld:मुंबईतील संघटित गुन्हेगारी कारवायांचा विचार करताना करीम लाला, हाजी मस्तान आणि त्यानंतर वरदराजन मुदलियार ऊर्फ वरदाचा उल्लेख करावाच लागेल. माटुंगा मध्य रेल्वे स्थानकाजवळील वरदाचा गणपती अख्ख्या मुंबईत चर्चेचा विषय होता. परंतु चित्रपटात ज्याप्रमाणे नायकाचा प्रवेश झाल्यावर गुन्हेगारी साम्राज्य उद्ध्वस्त करुन टाकले जाते, अगदी त्याच प्रमाणे यादवराव ऊर्फ वाय. सी. पवार या तत्कालीन पोलीस उपायुक्तांनी वरदाला सळो की पळो करुन सोडले.
मुंबईच्या गोदीत विशेषत: प्रिन्सेस डॅाक म्हणजेच घड्याळ गोदीत (नौकांसाठी उभारलेला घड्याळ असलेला टॅावर) करीमलाला, हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार या त्रिकुटाच्या गुन्हेगारी कारवाया सुरु होत्या. भरपूर माया गोळा झाल्याने पैशाचा जोरावर हे त्रिकूट गुन्हेगारी जगताचे बादशाह झाले. या त्रिकुटाने मुंबई वाटून घेतली होती. शहरात करीम लाला आणि हाजी मस्तान तर उपनगरात वरदाची हुकुमत होती.
शासकीय अधिकाऱ्यांसाठी पार्ट्या
या त्रिकुटाशिवाय गोदीतील पानही हलत नव्हते. विरोध झाला तर विरोध करणाराच गायब व्हायचा. त्यामुळे या त्रिकुटाच्या नादाला कुणी लागायचेच नाही. त्यातही वरदाकडे तर अजिबात दयामाया नव्हती. तो जितका धार्मिक असल्याचे भासवत होता, तितकाच तो क्रूर असल्याचेही अनेक दाखले निवृत्त पोलीस अधिकारी देतात. पोलीसच नव्हे तर शासकीय अधिकारीही वरदाला मानत होते. त्यामुळे त्याचे काळे धंदे जोरात होते. या मंडळींसाठी वरदा पार्ट्यांचे आयोजनही करायचा. वरदाशी केलेली दोस्ती दोघा पोलीस अधिकाऱ्यांना चांगलीच भारी पडली होती. दोघांनाही निलंबित व्हावे लागले होते.

ॲंटॅाप हिल, धारावी, माटुंग्यात दहशत
दुसरीकडे करीम लालाची पठाण टोळी मोठमोठ्या सुपाऱ्या घ्यायची. सुपारीची किमत दोन लाख रुपये आणि दोन गाड्या अशीच असायची.ॲंटॅाप हिल, धारावी, माटुंगा हाजी मस्तान स्वत: गुन्हेगारी कारवायात गुंतलेला नसला तरी पठाण टोळीकडून विरोधकाचा काटा काढायचा. परंतु तरीही तो पोलिसांच्या नोंदीवर आला नाही, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी. वरदाची पद्धत मात्र वेगळी होती. ॲंटॅाप हिल, धारावी, माटुंगा या परिसरात त्याची प्रचंड दहशत होती.
हत्याराला लागलेले रक्त कोंबडीचे…
मुंबईतील अवैध दारु, मटका, वेश्याव्यवसाय आदी माध्यमातून वरदाने चारशे ते पाचशे तरुणांची टोळी तयार केली होती. या टोळीची दहशत इतकी प्रचंड होती की, वरदाला विरोध म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण. मृतदेहही सापडायचा नाही. त्यामुळे पोलीस तपास झाला तरी शिक्षा नाहीच. हत्या वरदाच्या खास गुंडांने केलेली असायची. परंतु आरोपी भलतेच असायचे. हे आरोपीही पुराव्याअभावी न्यायालयातून सुटायचे. गुन्ह्यातील हत्यार वरदाच पोलिसांना द्यायचा. या हत्याराला लागलेले रक्त हे कोंबडीचे असायचे, असे त्यावेळचे अधिकारी आवर्जून सांगतात. याची पोलिसांनाही कल्पना होती.
वरदा पोरका झाला
वरदाचे वडील मुनीस्वामी यांची परिस्थिती चांगली नव्हती. कसाबसा त्यांचा उदरनिर्वाह होत होता. शिप बिल्डिंग कंपनीत काम मिळाल्याने ते तामिळनाडूतील तेव्हाच्या तुतिकोरिन (आता थूथुकुडी) शहरात आश्रयाला आले. परंतु, वरदा नऊ वर्षांचा असतानाच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे वरदाला त्यांनी कल्याण येथे राहण्यास असलेल्या बहिणीकडे ठेवले. वरदा शिक्षणात फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यातच वडिलांचेही अकाली निधन झाल्याने वरदा पोरका झाला.
हमालीवाचून पर्याय नव्हता
सातवीपर्यंत जेमतेम शिक्षण झालेला वरदा अँटॉप हिल परिसरात सतत जायचा, तो तेथील स्थलांतरित दक्षिण भारतीयांमुळे. शिक्षण गाठीशी नसल्यामुळे अखेर वरदाला इतरांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) हमाली करण्यावाचून पर्याय राहिला नाही. १९४० चा तो काळ असावा. व्हीटी स्थानक परिसरात हमाली करीत असताना चोरीत माहीर असलेल्या शक्तिवेल थेवर याच्याशी त्याची चांगलीच मैत्री झाली. चोरीच्या कामात वरदा त्याला मदत करु लागला. आणखी दक्षिण भारतीय तरुणांना त्याने या चोरीच्या धंद्यात ओढले.
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने या दोघांनी रेल्वे तिकिटांचा काळा बाजार सुरु केला. तसेच पार्सल विभागात शिरकाव करुन तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने मौल्यवान वस्तू चोरी करु लागले. त्यातून अर्थात चांगली माया वरदाकडे गोळा झाली. व्हीटी रेल्वे स्थानकात एक दर्गा होता. तेथे वरदा नेहमी गरीबांना जेवण द्यायचा. या निमित्ताने त्याने काही तरुणांना आपल्याकडे वळवले. वरदाचा आता दबदबा वाढत चालला होता. वरदाचे वास्तव्य अँटॉप हिल परिसरात होते. कुर्ला ते शिवडी खाडी हा परिसर निर्जन होता. हत्या करुन मृतदेह या ठिकाणी हमखास टाकले जायचे. यापैकी अनेकजण पोलिसांच्या बेपत्ता नोंदीपुरतेच राहिले. या खुनांची कधीच उकलही झाली नाही. बेकायदेशीर धंद्यांचा विस्तार करण्यासाठी यापेक्षा आणखी चांगली जागा कुठली नसणार, याची वरदाला कल्पना होती. मोकळ्या भूखंडावर झोपड्या उभारून त्यात स्थलांतरित दक्षिण भारतीयांना भाड्याने दिल्या. याशिवाय या परिसरात गावठी दारुच्या भट्ट्याही मोठ्या प्रमाणावर लावल्या जायच्या. या भट्ट्याही आपल्या ताब्यात घेण्याचा सपाटा वरदाने सुरु केला.
आणि वरदा मुंबईचा डॉन झाला
वरदाची दहशत इतकी होती की, एखाद्याने नकार दिला तरी त्याला सुरुवातीला त्याची माणसं समजावून सांगायची. त्यानंतरही ऐकला नाही तर त्याचा काटा काढायचा, ही पद्धत ठरलेली होती. अशा रीतीने त्याने विरोध करणाऱ्यांना आपल्या मार्गातून हटवले. त्यामुळे वरदाचा निरोप आला तर त्याला कुणी नाही म्हणायचेच नाही. चेला मुथ्थू हा स्थानिक गुंड मात्र विरोध करु लागला तेव्हा वरदाने त्याच्या दारुचे अड्डे उद्ध्वस्त केलेच. तसेच त्याच्या माणसांवर खुनी हल्ले केले. त्यानंतरही तो ऐकत नाही हे पाहून त्याच्या हत्येचा कट रचला. परंतु शेवटी मुथ्थु शरण आला. अशा रीतीने वरदाची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली होती. वरदा आता मुंबईतला डॅान बनला होता.
पोलीस ठाण्यात एकही नोंद नाही
१९४९ मध्ये मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी मुंबई प्रतिबंधित कायदा लागू केला तेव्हा दारुवर बंदी आली. परंतु याच काळात वरदाचा दारुचा धंदा अनेक पटींनी वाढला. अँटॉप हिलसह ट्रॉम्बे, शिवडी, वडाळा, धारावी परिसरात गावठी दारुच्या धंद्यांवर वरदाचेच वर्चस्व होते. यावर नजर ठेवण्यासाठी सव्वासहा फूट उंचीच्या परमेश्वर थेवर याला खास मदुराईतून वरदा घेऊन आल्याचे त्याचे तेव्हाचे साथीदार सांगतात. दक्षिण भारतीय तमिळांचा तो मसिहा झाला होता. हे त्याचे एक रुप होते. परंतु धंद्याच्या आड येणाऱ्याला निर्दयपणे संपवून टाकणे, हे त्याचे दुसरे क्रूर रुप होते. वरदाने अनेकांना यमसदनी धाडले असावे आणि मृतदेह थेट दारूच्या भट्टीत टाकून दिले असावे, असे सांगितले जाते. परंतु त्याच्याविरुद्ध कुणी ब्र देखील काढत नसे. अशा कितीतरी घटना या परिसरात घडल्या. परंतु एकाही घटनेची पोलीस ठाण्यात कधीच नोंद झाली नाही, हेही तितकेच खरे आहे.
मरिअम्ममशी लग्न
अँटॉप हिल परिसरात तोपर्यंत वरदाचा ‘वरदाभाई’झाला होता. याच परिसरात वर्धन नावाचा गुंड वेश्यांचा अड्डा चालवायचा. तो पत्नी मरिअम्ममला रोज मारझोड करायचा. वरदाला ते सहन व्हायचे नाही. त्याने वर्धनला हे थांबव, नाहीतर माझ्याशी गाठ आहे, अशी धमकी दिली. तरीही वर्धन सुधारत नव्हता. त्यानंतर वरदाने थेट मरिअम्ममशी लग्न केले. तिच्यापासून वरदाला दोन मुली आणि एक मुलगा झाला. त्यापैकी एका मुलीचा तेव्हाच्या मद्रासमधील (आताचे चेन्नई) घराला लागलेल्या आगीत मृत्यू झाला.
वरदाकडून मराठी तरुणांचा वापर
दुसरीकडे वरदाचा बदला घेण्यासाठी वर्धनने त्याला व कुटुंबीयाला संपविण्याचा कट रचला. तिरुपती येथे कुटुंबीयांसह दर्शनाला गेलेला असताना वरदा व कुटुंबीयांची हत्या करण्याचा वर्धनचा डाव होता. याची माहिती मिळताच वरदानेही वर्धनचा काटा काढण्याची योजना आखली. मात्र यावेळी त्याने आपल्या तमिळ साथीदारांऐवजी मराठी तरुणांचा वापर करण्याचे ठरवले. तमिळी साथीदारांची ओळख पटली तर त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ शकतो, असे वाटल्याने वरदाने ही योजना आखली. या २० तरुणांना तिरुपती येथे विमानाने पाठवले. याशिवाय स्वत: व कुटुंबीयांची प्रतिकृती एका गाडीत बसविली आणि मागील गाडीत तो स्वत: व कुटुंबीय होते. वर्धनच्या गुंडांनी वरदाच्या प्रतिकृतीवर हल्ला केला. त्यामुळे वरदा व त्याचे कुटुंबीय वाचले. परंतु वर्धनला वरदाच्या गुंडांनी संपवून टाकले. अगदी चित्रपटात शोभेल असाच हा प्रसंग असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
वायसींच्या कारवाईने वरदा हादरला
पांढरी शुभ्र लुंगी (मुंडू) आणि पांढरा शर्ट, कपाळावर मोठा टिळा, गळ्यात सोन्याची साखळी आणि हातात सोन्याचे कडे, अंगठ्या आणि पायात साध्या आणि पारंपारिक चपला किंवा सँडल असा वरदाचा पेहराव शेवटपर्यंत होता. अँटॉप हिल परिसरातील वाढते काळे धंदे आणि हत्यांमुळे तत्कालीन पोलीस आयुक्त जे. एफ. रिबेरो यांनी यादवराव पवार ऊर्फ वाय. सी. यांची उपायुक्तपदी नियुक्ती केली. वाय. सी. यांनी वरदाच्या काळ्या साम्राज्याला हादरे द्यायला सुरुवात केली. वरदाचे अनेक साथीदार त्यांनी तुरुंगाआड केले. दारुच्या भट्ट्या, मटक्यांविरुद्ध कारवाई केली. सत्ताधारी पक्षाचा वरदहस्त असल्यामुळे बिनधास्त असलेला वरदा या कारवाईमुळे पुरता हादरला होता.
अमिताभ व जया बच्चनही वरदाच्या गणपतीला…
बड्या राजकीय नेत्यांसोबत उठबस असतानाही वायसींनी त्याच्याविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला होता. वरदाच्या साथीदारांनी वायसींच्या अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर भला मोठा दगडही वायसींच्या गाडीवर टाकला. तरीही मागे न हटता वायसींनी कारवाई सुरुच ठेवली. वरदाचे सर्व दारु अड्डे उद्ध्वस्त केले. त्याचा परिणाम म्हणजे वायसीच्या गाडीवर अॅसिड बॉम्ब टाकण्यात आला. तरीही वायसी. डगमगले नाहीत. अखेर वायसींनी वरदाच्या गणेशोत्सवावर घाला घातला. भला मोठा मंडप टाकून गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधने आणली. अमिताभ बच्चन, जया बच्चन वरदाच्या गणेशोत्सवात आरतीला आवर्जून हजर असायचे. रस्त्यात असलेल्या या गणेशोत्सवामुळे प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची. अनेक सिनेअभिनेते, राजकीय नेते वरदाच्या गणपतीला हजेरी लावायचे. मात्र वायसींनी मंडप लहान करुन गणेशोत्सवाचे भव्य स्वरुप कमी करून टाकले.
हाजी मस्तानने वरदाचा मृतदेह विमानाने मुंबईत आणला
सततच्या कारवाईमुळे वरदा हैराण झाला. आपल्यालाच अटक होईल, या भीतीने तो चेन्नईला पळून गेला. १९८८ मध्ये चेन्नईतच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. तेव्हा मुंबईत अंत्यसंस्कार व्हावेत, ही मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी हाजी मस्तानने विशेष विमानाने वरदाचा मृतदेह मुंबईत आणला. हाजी मस्तान आणि वरदाची दोस्ती हा गुन्हेगारी जगतात नेहमीच चर्चेचा विषय होता. मात्र वरदाने दाऊद इब्राहिमला बळ दिले होते. वरदाचे वर्चस्व संपुष्टात आले आणि दाऊद नावाचा गुंड गुन्हेगारी जगतात स्थिरावत चालला होता. (पुढील भागात : करीम लालाने दाऊदला का फटकावले?) nishant.sarvankar@expressindia.com
