United Kingdom Riot ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा दंगली सुरू झाल्या आहेत. ब्रिटनमध्ये दंगली होणे किंवा हिंसक आंदोलन होणे काही नवीन नाही. परंतु, ही १३ वर्षांतील सर्वात मोठी दंगल असल्याचे बोलले आत आहे. उत्तर-पश्चिम इंग्लंडमध्ये तीन मुलींच्या हत्येनंतर ब्रिटनमध्ये हिंसक आंदोलने सुरू आहेत. बुधवारपासून (७ ऑगस्ट) देशभरात १०० हून अधिक मोर्चे निघणार असल्याची माहिती रहिवासी आणि अधिकाऱ्यांनी दिली आहे. या मोर्चांचा ओघ पाहता पोलिसांनी सुरक्षा आणखी वाढवली आहे. वकिलांची कार्यालये, स्त्यावरील दुकाने बंद करण्यात आली आहेत आणि लोकप्रतिनिधींना घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशाच्या अनेक भागांमध्ये रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळत आहे. लिव्हरपूल, बर्मिंगहॅम, ब्रिस्टल, ब्राइटन आणि लंडनमध्ये उजव्या विचारसरणीच्या लोकांचा विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. 'द्वेषाला जागा नाही', 'निर्वासितांचे स्वागत' आणि 'वर्णद्वेषाला नकार द्या' अशा घोषणा या नागरिकांकडून देण्यात येत आहेत. परंतु, १० दिवस ओलांडूनदेखील ब्रिटनमधील परिस्थिती जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलक मुख्यतः मशिदी आणि वसतिगृहांना लक्ष्य करत आहेत. देशभरात हिंसाचार पसरण्याचे कारण काय? या निदर्शनांची सद्यस्थिती काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ. दक्षिण किनारपट्टीवरील प्लायमाउथपासून उत्तर पूर्वेकडील सुंदरलँडपर्यंत सर्वत्र दंगली पेटल्या. (छायाचित्र-एपी) हेही वाचा : ‘या’ नामांकित कंपनीने ५० हजार कर्मचार्यांना पाठवले १० दिवसांच्या पगारी रजेवर; काय आहे कारण? हिंसक निदर्शनांची सुरुवात कशी झाली? २९ जुलै रोजी इंग्लंडच्या काउंटी मर्सिसाईडमध्ये एका नृत्य आणि योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संबंधित आरोपीने मुलांवर चाकूने हल्ला केला, ज्यात बेबे किंग (६), एल्सी डॉट स्टॅनकॉम्बे (७) आणि ॲलिस दा सिल्वा अग्वायर (९) या तीन मुलांचा मृत्यू झाला; तर आणखी आठ मुले आणि दोन प्रौढ जखमी झाले. हल्ल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी सांगितले की, त्यांनी एका १७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा दहशतवादी हल्ला नसल्याचेही त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला हल्लेखोराची ओळख किंवा हल्लेखोराविषयी कोणतीही माहिती उघड केली नाही. परंतु, सोशल मीडियासह 'Channel3Now' या माध्यम वाहिनीने संशयित हल्लेखोर मुस्लीम असल्याचे सांगितले आणि खोटे नावदेखील प्रसिद्ध केले. ही माहिती मिळताच त्याच्या पुढच्या दिवशी साउथपोर्टमधील पीडितांसाठी एक हजारांहून अधिक लोक जमले. त्यानंतर स्थानिक मशिदीजवळ हिंसाचार उसळला. लोकांनी मशिदीवर आणि पोलिसांवर विटा, बाटल्या आणि इतर क्षेपणास्त्रे फेकली, पोलिस व्हॅन पेटवली; ज्यानंतर २७ अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर संशयिताचे नाव एक्सेल रुदाकुबाना असे असल्याचे सांगण्यात आले, जो ब्रिटीश वंशाचा असून मुस्लीम किंवा स्थलांतरित नाही. हिंसाचार कसा पसरला? रुदाकुबाना हा मुस्लिमविरोधी, स्थलांतरित असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर वाढू लागल्या. द्वेष पसरवण्यात ईडीएल संस्थापक टॉमी रॉबिन्सन, आणि अँड्र्यू टेट यांसारख्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांचाही समावेश आहे. तसेच रिफॉर्म यूकेचे नेते निगेल फॅरेज यांनी साउथपोर्टचा हल्ला दहशतवादाशी संबंधित नसल्याबद्दल पोलीस सत्यवादी आहेत का? असा प्रश्न करून तणाव वाढवल्याचेही म्हटले जाते. विशेष म्हणजे 'एक्स'चे मालक एलॉन मस्क यांनीही या चर्चेत उडी घेतली. 'Libs of TikTok' द्वारे 'एक्स'वर पोस्ट केलेल्या व्हिडीओला प्रतिसाद देताना त्यांनी लिहिले, 'गृहयुद्ध न टळणारे आहे.' त्यांनी नंतर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना #TwoTierKier असेही संबोधले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषणावर निर्बंध घालण्याच्या प्रयत्नासाठी त्यांनी ब्रिटनची तुलना सोव्हिएत युनियनशी केली. साउथपोर्टमधील दंगलीनंतर हिंसाचाराच्या घटना संपूर्ण देशात झाल्या. (छायाचित्र-एपी) दंगली कोणकोणत्या ठिकाणी झाल्या? साउथपोर्टमधील दंगलीनंतर हिंसाचाराच्या घटना संपूर्ण देशात झाल्या. दक्षिण किनारपट्टीवरील प्लायमाउथपासून उत्तर पूर्वेकडील संडरलँडपर्यंत सर्वत्र दंगली पेटल्या. उत्तर आयर्लंडच्या बेलफास्टमध्येही दंगली झाल्या. साउथपोर्टमधील दंगलीच्या एका दिवसानंतर, हिंसक निदर्शक लंडनमध्ये स्टार्मर यांचे निवासस्थान, १० डाउनिंगच्या बाहेर जमले, त्यावेळी पोलिसांशी त्यांचे भांडण झाले. तेव्हापासून अनेक गावे आणि शहरांमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. मिडल्सब्रोमध्ये गाड्या पेटवल्या गेल्या आणि आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. गेल्या रविवारी (४ ऑगस्ट) रॉदरहॅम आणि टॅमवर्थ येथे दंगलखोरांनी आश्रय शोधणाऱ्या हॉटेल्सना लक्ष्य केले होते. रॉदरहॅममध्ये दंगलखोरांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला, त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला आणि हॉटेलच्या आतील लोकांना बाहेर निघण्यासाठीचे सर्व मार्गही बंद केले. टॅमवर्थमधील हॉटेलही पेटवून देण्यात आले. दंगलखोरांनी परिसरातील खिडक्या आणि इतर मालमत्तेचे नुकसान केले. देशभरात दंगलीशी संबंधित अनेक वर्णद्वेषी हल्लेही घडले. उदाहरणार्थ हलमध्ये, दंगलखोरांच्या एका गटाने एका आशियाई माणसावर त्याच्या कारमध्ये हल्ला केला, असे 'द गार्डियन'ने वृत्त दिले. बेलफास्टमध्ये एका व्यक्तीवर गंभीर हल्ला झाल्यानंतर त्याला सोमवारी रुग्णालयात नेण्यात आले. इतर ठिकाणी जसे की संडरलँड, स्टोक-ऑन-ट्रेंट आणि इतर अनेक शहरे, मुख्यतः मिडलँड्स आणि इंग्लंडच्या उत्तरेकडील भागातदेखील गेल्या काही दिवसांत हिंसाचार वाढला आहे. आधीच हजारो अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. परंतु, लंडनमध्ये आणखी गंभीर समस्या उद्भवल्यास सुमारे १,३०० विशेषज्ज्ञ दलांना तैनात केले जाईल. हिंसाचारात ४०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी १०० जण आधीच आरोपी असल्याची माहिती आहे. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी दंगलीचे वर्णन 'अत्यंत विचारसरणीच्या लोकांची गुंडगिरी' असे केले आहे आणि त्यात सहभागी सर्वांना शिक्षा करण्याचे वचन दिले आहे. 'डाऊनिंग स्ट्रीट'वरील एका भाषणात ते म्हणाले, “या देशातील लोकांना सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे आणि तरीही मुस्लीम समुदायांना लक्ष्य करण्यात आले, मशिदींवर हल्ले झाले." हेही वाचा : Bangladesh crisis: बांगलादेशात नक्की किती भारतीय नागरिक अडकलेत? ते सुरक्षित आहेत का? वर्णद्वेषविरोधी निषेधाचे कारण काय? देशात काय घडत आहे याचा निषेध करण्याच्या प्रयत्नात, बुधवारी हजारो वर्णद्वेष विरोधी निदर्शक संपूर्ण इंग्लंडमध्ये जमले. देशभरात 'तुमच्यापेक्षा आमच्यासारखे अनेक आहेत', अशी घोषणाबाजी झाली. लिव्हरपूलमध्ये संध्याकाळी ७ वाजता शेकडो लोकांनी स्थलांतरितांसाठी सल्ला केंद्र आयोजित करणार्या एका चर्चच्या बाहेर मानवी ढाल तयार केली. पूर्व लंडनमधील हॅकनी आणि वॉल्थमस्टो आणि इंग्लंडच्या उत्तरेकडील फिंचले येथेही अशीच दृश्ये पाहायला मिळाली. परंतु, हॅम्पशायरमधील अल्डरशॉटमध्ये, 'वंशवादाच्या विरोधात उभे राहा' असे फलक घेतलेल्या निदर्शकांचा दुसर्या गटाशी संघर्ष झाला, तेव्हा तणाव निर्माण झाला. गटांना एकमेकांच्या जवळ येण्यापासून रोखण्यासाठी डझनभर पोलीस अधिकारी रस्त्यावर धावले. ब्लॅकपूलमध्येही चकमकी झाल्याची नोंद आहे. परंतु, आता देशभरात भीती कमी झाली आहे. पुढील दोन दिवस तुलनेने शांत राहतील, अशी अपेक्षाही पोलिसांना आहे. परंतु, लोक परिस्थिती शांत होऊ देतील की देशात पुन्हा हिंसाचार उफाळून येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.