गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड आणि माजी आमदार मुक्तार अन्सारी याची पत्नी अफशा हिच्याविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला. मार्च २०२४ मध्ये बांदा मध्यवर्ती कारागृहात मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून अफशा अन्सारी फरार असून तिचा माग काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही; पण तपास पथकाला चकवा देणारी अफशा ही एकमेव महिला नाही. उत्तर प्रदेशातील इतर दोन कुख्यात गुंडांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीही गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असल्याचे समजते. एप्रिल २०२३ मध्ये माफिया अतीक अहमद आणि त्याचा धाकटा भाऊ अशरफ अहमद यांची माध्यमांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर अतीकची पत्नी शाइस्ता, अश्रफची पत्नी फातिमा आणि या दोघांची धाकटी बहीण आयेशा अचानक गायब झाली.

अंदाजे ५० ते ६० वर्षे वयोगटातील या चारही महिला अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. शाइस्ता परवीन आणि अफशा अन्सारी यांच्याबाबत माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये; तर झैनब फातिमा आणि आयेशा नूरी यांच्याबाबत माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या चारही महिलांवर दिवंगत कुख्यात गुंडांनी केलेल्या गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप आहे. या महिलांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून, त्यांना शरण येण्यासाठी विविध मार्गांनी दबाव टाकला जात असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. अफशा अन्सारी हिच्याविरोधात दाखल करण्यात आलेला ताजा गुन्हा तिच्या नावावर जारी करण्यात आलेल्या शस्त्र परवान्याशी संबंधित आहे. याबाबत गाझीपूरचे पोलीस अधीक्षक इराज राजा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, अफशाविरोधात यापूर्वीही पाच गुन्हे दाखल असून, त्यामध्ये उत्तर प्रदेश गँगस्टर्स आणि समाजविघातक कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत दाखल प्रकरणाचाही समावेश आहे. या कायद्यांतर्गत तिची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.

दुसरीकडे- शाइस्ता परवीन, झैनब फातिमा आणि आयेशा नूरी या तिघी एका हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपांमुळे पोलीस त्यांच्या मागावर आहेत. फरार होण्यापूर्वी शाइस्ता आणि झैनब या प्रयागराजमध्ये (पूर्वीचे अलाहाबाद) राहत होत्या; तर आयेशा नूरी मेरठमध्ये वास्तव्यास होती. अफशा अन्सारी ही गाझीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलीस अधीक्षक इराज राजा पुढे म्हणाले की, अफशा अन्सारी अद्याप फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके सातत्याने छापेमारी करत आहेत. अफशा अन्सारी देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करू शकते, अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीबीआय आणि इमिग्रेशन विभागासह केंद्रीय यंत्रणांकडे तिच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याची विनंती केली आहे. मुख्तार अन्सारी, त्याचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय यांच्या नावावर जारी करण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांची खरेदी-विक्री नोंदींची पडताळणी करताना हे नवे प्रकरण उघडकीस आले. पोलीस चौकशीत अफशाच्या नावावर शस्त्र परवाना असल्याचे आणि त्यावर एक बंदूक खरेदी करून नंतर ती विकण्यात आल्याचे, तसेच आणखी एक शस्त्र खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे- शस्त्रपरवान्याची खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रे गाझीपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेखातून गायब असल्याचे आढळले. अफशा हिने कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ही कागदपत्रे हटविण्यात आली असावीत, असा पोलिसांना संशय आहे. त्याशिवाय संबंधित बंदूक नेमकी कुठे ठेवण्यात आली आहे, याचाही शोध अद्याप लागलेला नाही. अन्सारी टोळीतील इतर सदस्यांना त्याचा वापर करता यावा, यासाठी जाणूनबुजून कागदपत्रे लपविण्यात आली असावीत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात अफशा अन्सारीसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन अभिलेख सहाय्यक बृज नारायण राम आणि भीष्म सिंह यादव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, बृज नारायण राम यांचे निधन झाले असून, या प्रकरणात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत.

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रयागराज येथील वकील उमेश पाल यांच्यासह त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे उत्तर प्रदेशासह संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली होती. हल्लेखोरांनी उमेश पाल यांच्यावर गोळीबार करत बॉम्बही फेकले होते. या कटात अतीक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन, बहीण आयेशा नूरी आणि भावजय झैनब फातिमा यांचाही सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. न्यायालयाने फरार आरोपी घोषित केल्यानंतरही हजर न राहिल्याप्रकरणी प्रयागराज पोलिसांनी या तिन्ही महिलांविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. उमेश पाल हत्याकांडातील तपासादरम्यान अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत. या हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या गुड्डू मुस्लीम याला आश्रय दिल्याप्रकरणी अतीक अहमदची बहीण आयेशा नूरी हिचा पती डॉ. अखलाक अहमद याला पोलिसांनी अटक केली आहे. अखलाक हा मेरठ येथील एका समुदाय आरोग्य केंद्रात कार्यरत होता. गुड्डू मुस्लीम हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही, तर अतीकची दोन मुले अली अहमद आणि मोहम्मद उमर हेदेखील सध्या तुरुंगात आहेत.

विशेष म्हणजे, उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गुड्डू मुस्लीम आणि साबीर यांचा उत्तर प्रदेश पोलिसांनी जाहीर केलेल्या ३० मोस्ट वाँटेड आरोपींच्या यादीत समावेश आहे. या दोघांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दुसरीकडे, फरार असलेली अफशा अन्सारी, शाइस्ता परवीन, झैनब फातिमा आणि आयेशा नूरी या चार महिलांचा या मोस्ट वाँटेड आरोपींच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, त्यात दीप्ती बहल ही एकमेव महिला आरोपी आहे. एका महाविद्यालयाची माजी प्राचार्य राहिलेली दीप्ती बहल ही २०१९ पासून पोलिसांना चकवा देत फरार आहे. तिच्यावर ‘बाईक टॅक्सी’ योजनेच्या नावाखाली तब्बल ४,५०० कोटी रुपयांची महाठगबाजी केल्याचा गंभीर आरोप आहे. या महाघोटाळ्याप्रकरणी दीप्ती बहलविरोधात देशभरात तब्बल ११८ गुन्हे दाखल असल्याचे समजते. सध्या उत्तर प्रदेश पोलीस या फरार महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहेत.