Everything about UPI Circle and Google Pocket Money safety features for digital payments: सध्या डिजिटल व्यवहारांच्या युगात ‘यूपीआय सर्कल’ (UPI Circle) ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. नोव्हेंबर २०२५ पासून सर्व प्रमुख यूपीआय ॲप्सवर उपलब्ध झालेली ही सुविधा विशेषतः मुलांच्या पॉकेट मनीसाठी आणि वृद्ध पालकांच्या खर्चासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
यूपीआय सर्कल
दिवसेंदिवस डिजिटल पेमेंटचा वापर वाढतच चालला आहे, यात यूपीआयचा सिंहाचा वाटाआहे. यूपीआयसुद्धा वेळोवेळी यात नवनवीन सुविधा देऊ करत आहे; ज्यामुळे यूपीआयचा (भीम/ गुगलपे/ फोनपे ) वापर आणखी वाढीस लागेल. अशीच एक सुविधा म्हणजे यूपीआय सर्कल होय. ही सुविधा सर्व यूपीआय अॅपवर नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध आहे. या सुविधेमुळे गुगलपे अॅपवर ही सुविधा गुगल पॉकेट मनी नावाने उपलब्ध आहे.

भीम/ गुगलपे/ फोनपे सर्वत्र उपलब्ध

आपल्या जवळच्या व विश्वासू व्यक्तीस आपले खाते त्याच्या मोबाईलवरील भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या अॅपवरून वापरता येईल. गेल्या काही दिवसांपासून ही सुविधा सुरू झाली आहे. यामुळे आपल्याला आपल्या मुलांना किंवा वयस्कर आई- वडिलांना किंवा घरातील विश्वासू नोकारास एका ठराविक रकमेपर्यंत आपल्या खात्यातून पेमेंट करता येईल. उदा: आपली मुलगी कॉलेजमध्ये शिकत आहे व तिला वेळोवेळी बस/ रिक्षा/ ओला/ उबर यासाठी पेमेंट करावे लागते. तर हे पेमेंट साधारणपणे रु. २०० ते ५०० च्या दरम्यान असते, तर कधी वह्या/ पुस्तके अन्य स्टेशनरी घ्यायची असते. तर कधी मित्र- मैत्रिणींबरोबर हॉटेल किवा सिनेमा पहावयास जायचे असते. हा खर्च सुद्धा वरील प्रमाणे रु.२०० ते ५०० च्या दरम्यान असेल तर यासाठी तिला दरवेळी रोख पॉकेट मनी देण्याऐवजी तिच्या मोबाईलवर आपल्याकडे असलेले यूपीआय अॅप डाऊनलोड करून तिचा मोबाईल नंबर आपल्या यूपीआय अॅपशी जोडून तिला आपल्या यूपीआय सर्कलमध्ये सहभागी करून घेता येईल. यामुळे वरील प्रकारचे वेळोवेळी करावे लागणारे खर्च ती आपल्या मोबाईलवरील यूपीआय अॅप द्वारा करू शकेल व होणारा खर्च आपल्या बँक खात्यात डेबिट होईल.

UPI Circle digital payment feature explanation | गुगल पॉकेट मनी सुविधा माहिती | How to use UPI Circle for family | यूपीआय सर्कल सुरक्षितता फॅक्ट चेक
यूपीआय सर्कल आणि गुगल पॉकेट मनी सुरक्षित वापर. (Image- Gemini)

गुगल पॉकेट मनी

आता आपल्याला तिला रोज पॉकेट मनी द्यावा लागणार नाही. शिवाय ती काय खर्च करते यावर आपले लक्षही राहील. कारण ती करीत असलेल्या प्रत्येक व्यवहाराचा एसएमएस आपल्या मोबाईलवर येईल. गूगलपे अॅप मधील या सुविधेला गुगल पॉकेट मनी असे म्हणतात. याबाबत समाज माध्यमांवर काही गैरसमज पसरविणाऱ्या चुकीच्या बातम्या व्हायरल होत असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत होते. त्या त्यादृष्टीने आज आपण याबाबतची माहिती खालील प्रश्नोत्तरातून घेऊया.

यूपीआय सर्कल ही नेमकी काय सुविधा आहे?

या सुविधेनुसार बँक खातेदार जो यूपीआय अॅपचा वापर करीत आहे त्याला प्रायमरी युजर असे म्हणतात. असा प्रायमरी युजर आपल्या जवळच्या विश्वासू व्यक्तीस काही ठरविक मर्यादेपर्यंतची रक्कम स्वतंत्रपणे आपले यूपीआय संलग्न असलेल्या बँक खात्यातून देऊ शकतो. यामध्ये आपल्या कुटुंबातील व्यक्ती किंवा इतर कुणी विश्वासू व्यक्ती अशा जास्तीतजास्त ५ लोकांना हा अधिकार देता येतो. अशा व्यक्तीस सेकंडरी युजर असे म्हणतात.

सेकंडरी युजरला आपल्या यूपीआय अॅपशी कसे जोडता येते?

यासाठी प्रायमरी युजरने आपल्या यूपीआय अॅपच्या होम स्क्रीनवर जाऊन ‘इन्व्हाईट टू सर्कल’वर क्लिक करून ज्याला सेकंडरी युजर म्हणून जोडावयाचे आहे त्याचा मोबाईल नंबर आपल्या मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टमधून निवडून त्याला अधिकृत करावयाचे असते. आपण अशा प्रकारे जास्तीतजास्त ५ सेकंडरी युजर जोडू शकता. अशा प्रत्येक युजरला दरमहा जास्तीतजास्त रु.१५ हजारापर्यंत खर्च करण्याची मर्यादा ठेऊ शकता. प्रत्येकाची मासिक मर्यादा कमी- अधिक असू शकते. परंतु रु. १५००० पेक्षा अधिक ठेवता येणार नाही. याशिवाय प्रत्येक व्यवहाराची किंवा एका दिवसाची कमाल मर्यादा सुद्धा ठरविता येते.

या सुविधेचा नेमका काय फायदा आहे?

बऱ्याचदा आपल्या मुलांचे स्वतंत्र बँक खाते नसते व त्यांना वेळोवेळी लहानसहान पेमेंट करावे लागते. त्यासाठी पॉकेट मनी देण्याऐवजी सुविधा दिल्याने वरचेवर पैसे द्यावे लागत नाहीत. आपल्या वृद्ध आई- वडिलांना सुद्धा अशा प्रकारे आपल्या यूपीआय अॅपला संलग्न केल्याने त्यांना सुद्धा आपल्याकडे वरचेवर पैसे मागावे लागणार नाहीत. तसेच आपल्या घरातील विश्वासू नोकरास ही सुविधा दिल्याने त्याला हीकिरकोळ खरेदीसाठी जसे कि भाजी फळे, किराणा सामान आणण्यासाठी वेगळे रोख पैसे द्यावे लागत नाहीत. विशेष म्हणजे अशी खर्च होणारी रक्कम आपल्या बँक खात्यावरून होत असल्याने सर्व तपशील उपलब्ध होतो.

सुविधा कोणकोणत्या यूपीआय अॅपवर उपलब्ध आहे?

ही सुविधा सर्व प्रमुख यूपीआय अॅपवर (भीम/ गुगलपे/ फोनपे आद.)उपलब्ध आहे ही सुविधा वापरण्यासाठी कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाहीत.

गुगल पॉकेट मनीबाबत नेमकी काय अफवा पसरवली जात होती व याबाबत वस्तुस्थिती काय आहे?

गुगल पॉकेट मनीचा वापर केल्यास आपले बँक खाते हॅक होते व आपल्या खात्यातील रक्कम आपोआप काढली जाते, अशी चुकीची माहिती पसरविली जात होती. मात्र अधिकृत तपासणीअंती म्हणजे फॅक्ट चेक केल्यास ही बातमी खोटी असल्याचे निदर्शनास आले. ग्राहकांनी ही सुविधा वापरण्यात कोणताही धोका नाही. थोडक्यात असे म्हणता येईल की, पालकांनी आपल्या मुलांना पॉकेट मनी देण्याऐवजी ही यूपीआय सर्कल सुविधा दिल्यास वेळोवेळी मुलांनाही पैसे मागावे लागणार नाहीत. शिवाय आपल्यालाही मुले कुठे व कसा खर्च करतात हे वेळीच समजू शकेल व मुलांनाही आर्थिक शिस्त लागू शकेल.