Guide on UPI Credit Card Link RuPay card: रोजच्या व्यवहारातील भाजीपाला खरेदी, चहा-नाश्ता किंवा लोकलच्या तिकिटासाठी यूपीआय (UPI) वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही यूपीआयद्वारे पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड यूपीआय अॅपला लिंक करावे लागेल.

किरकोळ पेमेंट

भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या यूपीआय अॅपचा वापर सातत्याने वाढतच चालला आहे. रोजच्या व्यवहारात आपल्याला किरकोळ पेमेंट वरचेवर करावे लागते. (उदा: भाजी/ फळे घेताना, मेट्रो/ बस/ लोकलचे तिकीट काढताना, रस्त्यावरच्या गाडीवर वडापाव/ भेळ/ भजी खाताना) हे पेमेंट रु.२० ते २५ पासून ते रु.४०० ते ५०० पर्यंत असू शकते). असे किरकोळ पेमेंट आता सर्रास भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या आपल्या मोबाईलमध्ये असणाऱ्या यूपीआयअॅप द्वारे होत असते.

यूपीआय – क्रेडीट कार्ड पेमेंट

सध्या बहुतेकांकडे एक किंवा त्याहून अधिक क्रेडीट कार्डस् असतात. तथापि, अशा रोजच्या व्यवहारातील किरकोळ पेमेंटसाठी आपल्याला क्रेडीट कार्ड वापरता येत नाही कारण वर उल्लेखिलेल्या ठिकाणी क्रेडीट कार्डने पेमेंट करण्यासाठी आवश्यक असणारे स्वाईप मशीन नसते. ही अडचण विचारात घेऊन सप्टेंबर २०२२ पासून एनपीसीआयने यूपीआय – क्रेडीट कार्ड पेमेंट ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुमारे ४ वर्षांचा कालावधी होऊनसुद्धा ही सुविधा अद्याप फारशी वापरली जात नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेकांना या सुविधेची माहितीच नाही. म्हणून आज आपण या सुविधेची तपशीलवार माहिती प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून घेणार आहोत.

UPI Credit Card Link RuPay Card Setup | How to Link RuPay Credit Card on Google Pay PhonePe | यूपीआय क्रेडिट कार्ड लिंक करण्याची सोपी पद्धत | गुगलपे आणि फोनपेवर रूपे क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे
यूपीआय क्रेडिट कार्ड लिंक करून असे करा पेमेंट (Image- Gemini)

यूपीआय – क्रेडीट कार्ड पेमेंट ही सुविधा नेमकी काय आहे?

आतापर्यंत आपण आपल्या मोबाईल मधील भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या यूपीआय अॅपला आपले बँकेतील बचत खाते किंवा डेबिट कार्ड जोडून पेमेंटसाठी वापरत आलो आहोत, मात्र आता आपल्याला आपले क्रेडीट कार्ड सुद्धा आपल्या भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या यूपीआयअॅपला जोडता येणार आहे. यामुळे आपण क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या जोडलेल्या क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट करू शकतो.

रूपे क्रेडिट कार्डसाठी सोय उपलब्ध

सध्या तरी ही सुविधा फक्त एनपीसीआयने सुरू केलेल्या रूपे क्रेडीट कार्डसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या यूपीआय अॅपला फक्त रूपे क्रेडीट कार्डच जोडता येते. मास्टर किंवा व्हिसा क्रेडीट कार्ड जोडत येत नाही. याचा मूळ उद्देश क्रेडीट कार्ड व्यवसायाचा भारतीय कार्डचा हिस्सा वाढविणे हाच आहे.

आपले रूपे क्रेडीट कार्ड भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या यूपीआय अॅपला कसे जोडावे?

अगदी सोपे आहे. आपल्या यूपीआय अॅपच्या प्रोफाईल वर क्लिक करून पेमेंट सेटिंगला जा व त्यातील लिंक रूपे क्रेडीट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड ऑन यूपीआय हा पर्याय निवडा. त्यानंतर आपले रूपे कार्ड ज्या बँकेचे असेल ती बँक निवडून आपला रूपे क्रेडीट कार्ड नंबर लिहा. त्यानंतर आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पडताळणी करा. आपले रूपे कार्ड आपल्या यूपीआय अॅपला लिंक होईल. प्रत्यक्ष पेमेंटसाठी बँकेनुसार असणारा आपला चार अंकी किंवा सहा अंकी पिन वापरा.

प्रत्यक्ष पेमेंट करताना क्रेडीट कार्ड कसे वापरायचे ?

तुम्ही पेमेंट करणार असाल त्यावेळी यूपीआय अॅप मधील क्रेडीट कार्ड हा पर्याय निवडावा व नेहमी प्रमाणे क्यूआर कोड स्कॅन करून पिन टाकला असता पेमेंट होते. असे होणारे पेमेंट आपल्या क्रेडीट कार्डच्या लिमिट पर्यंतच पेमेंट होते ते लगेचच आपल्या बँक खात्यात डेबिट होत नाही. या पेमेंटचा समावेश आपल्या सबंधित महिन्याच्या क्रेडीट कार्ड बिलात होतो, त्यामुळे पेमेंट केल्याच्या तारखेपासून ते बिलच्या ड्यू डेटपर्यंत आपण ही रक्कम बिनव्याजी वापरत असतो.

ही सुविधा फायद्याची कशी?

  • अ) क्रेडीट कार्ड जवळ बाळगण्याची गरज नसते. त्यामुळे ते हरवण्याचीही शक्यता नसते.
  • ब) ज्या ठिकाणी कार्ड स्वाईप मशीन नाही, अशा ठिकाणी सुद्धा क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करता येते. थोडक्यात किरकोळ पेमेंटसुद्धा क्रेडीट कार्ड वापरून करता येते जे आधी शक्य होत नव्हते.
  • क) यूपीआय – क्रेडीट कार्ड पेमेंट सुविधा वापरली तरी क्रेडीट कार्डवर असणारे रिवार्ड पॉईंट्स तसेच मिळतात. शिवाय आपल्या क्रेडीट कार्डवर वेळोवेळी येणाऱ्या ऑफरचाही फायदा घेता येतो.

आपल्याकडे मास्टर किंवा व्हिसा क्रेडीट असेल, तर ही सुविधा कशी वापरता येईल?

आता बहुतेक प्रमुख बँका (उदा: एसबीआय, एचडीएफसी, कोटक, आयसीआयसीआय, यस बँक) व्हर्च्युअल रूपे क्रेडीट कार्ड देऊ करीत आहेत व असे व्हर्च्युअल क्रेडीट कार्ड आपल्या भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या यूपीआय अॅपला सहज लिंक करता येते. मात्र आपल्या मास्टर अथवा व्हिसा क्रेडीट कार्डवर असलेले क्रेडीट लिमिट व्हर्च्युअल क्रेडीट बरोबर एकत्रित वापरता येते. उदा: आपल्या एसबीआय व्हिसा कार्डचे क्रेडीट लिमिट रु.२,५०,००० इतके असेल आणि आपण एसबीआयचे व्हर्च्युअल क्रेडीट कार्ड घेऊन आपल्या यूपीआय अॅपला लिंक केलेले असेल, तर दोन्ही कार्ड मिळून रु.२,५०,००० इतकेच क्रेडीट लिमिट वापरता येईल आणि दोन्ही कार्डांचे एकत्रित बिल आपल्याला दिले जाईल व त्याचे पेमेंटसुद्धा एकत्रित करावयाचे असते. क्रेडीट कार्ड बाबतचे सर्व नियम व्हर्चुअल क्रेडीट कार्डला लागू असतात.

थोडक्यात असे म्हणता येईल की, ही सुविधा खरोखरीच खूप उपयुक्त आहे, आपण आपले क्रेडीट कार्ड जवळ न बाळगतादेखील त्याचा सहजगत्या वापर करू शकता. मात्र ही सुविधा फक्त वस्तू किंवा सेवा खरेदी करतानाच वापरता येते. एखाद्या व्यक्तीस रक्कम पाठविण्यासाठी (पर्सन टू पर्सन) ही सुविधा वापरता येत नाही.