Everything you need to know about UPI Lite registration and limit: डिजिटल युगात चहाच्या टपरीपासून भाजीवाल्यापर्यंत आपण यूपीआयने पैसे देतो, पण यामुळे बँक स्टेटमेंटमध्ये व्यवहारांची गर्दी होते. या समस्येवर एनपीसीआयने (NPCI) ‘यूपीआय लाईट’ हा उत्तम पर्याय आणला आहे. दिवसेंदिवस डिजिटल पेमेंटचा वापर वाढतच चालला आहे. त्यातही यूपीआय पेमेंटमध्ये तर सातत्याने वाढ होत आहे. गेल्या महिन्यात (एप्रिल २०२६ मध्ये) २२.३५ बिलियन्स म्हणजे २२३५ कोटी व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून झाले आहेत आणि व या व्यवहारांचे मूल्य सुमारे रु. २९ लाख कोटी इतके मोठे आहे.
यूपीआय लाईट
विशेष म्हणजे एनपीसीआय (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) यासाठी यूपीआयमध्ये नवनवीन सुविधा वेळोवेळी दिल्या जातात. याचाच एक भाग म्हणून गेले काही दिवस सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये यूपीआय लाईटची जाहिरात वरचेवर दिसून येते. या जाहिरातीत आवर्जून सांगितले जाते की, “ छोट्या पेमेंट्सने बँक स्टेटमेंट भरू नका. UPI Lite वापरा.” मात्र अजून ही बऱ्याचजणांना यूपीआय लाईट म्हणजे नेमके काय व ही सुविधा कशी वापरता येते याबाबत माहिती नाही. भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या यूपीआय मोबाइल अॅपवर ही सुविधा सहजगत्या उपलब्ध आहे.
किरकोळ पेमेंट्ससाठी…
ही सुविधा आपल्या मोबाइल वरील भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या यूपीआय अॅपवर कार्यान्वित करून दैनंदिन करावी लागणारी छोट्या रकमेची पेमेंट्स पीन न टाकता केवळ क्यू आर कोड स्कॅन करून करता येतात. उदा: भाजी बाजारातील भाजीचे १० -२० रुपयाचे किरकोळ पेमेंट, चहाच्या टपरीवरील १५-२० रुपायचे पेमेंट , बस, मेट्रो, लोकलचे तिकीट यासारखी वरचेवर करावी लागणारी किरकोळ पेमेंट्स) त्यादृष्टीने यूपीआय लाईट बाबतची माहिती आज घेऊया.

यूपीआय लाईट म्हणजे काय?
यूपीआय लाईट हे तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या ही भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या यूपीआय मोबाइल अॅपमधील एक डिजिटल वॉलेट आहे. यात तुम्ही बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करून छोट्या रक्कमेचे व्यवहार करू शकता. या वॉलेटमध्ये जास्तीतजास्त रु.५००० इतकी रक्कम शिल्लक ठेवता येते आणि एकावेळी जास्तीतजास्त रु.१००० पर्यंतचे पेमेंट करता येते. किमान पेमेंट रक्कम कितीही असू शकते (अगदी एक रुपया सुद्धा ) तसेच एका दिवसात रु.१०,००० पर्यंत एकूण पेमेंट करता येते. विशेष म्हणजे पेमेंट करताना पिन नंबर टाइप करावा लागत नाही.
यूपीआयलाईटचे फायदे काय आहेत?
पिन विरहीत पेमेंट: रु.१००० पर्यंतच्या व्यवहारांसाठी यूपीआय पिन टाइप करण्याची गरज नाही.
जलद व्यवहार: बँक सर्व्हरवर अवलंबून नसल्यामुळे व्यवहार त्वरित होतात.
ऑफलाइन व्यवहार: इंटरनेट कनेक्शन नसतानाही पेमेंट करता येते.
सुटसुटीत बँक स्टेटमेंट: दररोजच्या लहान व्यवहारांची नोंद बँक पासबुक/ स्टेटमेंटमध्ये न होता, फक्त वॉलेट मध्ये रक्कम ट्रान्सफर केल्याची नोंद होते. यातून केलेल्या व्यवहारांचा तपशील यूपीआय अॅपमधील ट्रॅन्झॅक्शन हिस्ट्री मध्ये पाहता येतो. मात्र आपल्या बँक स्टेटमेंट मध्ये समाविष्ट होत नाही यामुळे आपले बँक स्टेटमेंट लांबलचक न होता सुटसुटीत होते.
आपल्या मोबाईल वरील भीम/ गुगलपे/ फोनपे यासारख्या यूपीआय अॅप मधील यूपीआय लाईट ही सुविधा कार्यान्वित कशी करता येते ?
- तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या भीम/ गुगलपे/ फोनपे यापैकी कोणतेही यूपीआय अॅप ओपन करा.
- ‘नंतर यूपीआय लाईट या पर्यायावर क्लिक करा.
- बँक खाते निवडा आणि पैसे ट्रान्सफर (लोड) करा (पीन टाइप करून).
रक्कम वॉलेट मध्ये ट्रान्स्फर (लोड) करताना इंटरनेटची गरज असते मात्र यूपीआय लाईट वॉलेट मधून पेमेंट करताना इंटरनेटची गरज नसते. तसेच यूपीआय लाईट वॉलेट मधील शिल्लक रक्कम गरज पडल्यास परत आपल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येते. ऑटोपे पर्याय वापरल्यास वॉलेट मधील शिल्लक कमी झाल्यास आपोआप आपल्या बँक खात्यातून ( यूपीआय अॅपला लिंक केलेल्या बँक खात्यातूनच) वॉलेट मध्ये रक्कम ट्रान्सफर होते. भारतातील सर्व प्रमुख बँका या सुविधेस सपोर्ट करतात.
यूपीआय लाईट सुरक्षित आहे का?
होय, हे पूर्णपणे सुरक्षित आहे. हे आरबीआय व आणि एनपीसीआय च्या नियमांनुसार काम करते आणि डिव्हाइस बाइंडिंग या तंत्रज्ञानाचा वापर करते.
आपला फोन हरवल्यास काय करावे?
तुमचा फोन हरवला, तर तो ब्लॉक करण्यासाठी त्वरित तुमच्या बँकेशी किंवा ॲप कस्टमर केअरशी संपर्क साधा. तसेच, फोनमध्ये लॉक स्क्रीन असणे आवश्यक आहे जेणेकरून कोणीही चुकीचा वापर करू शकणार नाही. याजबरोबर आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडरला तातडीने कळवून आपले सीम ब्लॉक करून घ्यावे.
यूपीआयलाईट वापरण्याचे तोटे आहेत का?
यूपीआय लाईटचा मुख्य तोटा म्हणजे व्यवहारांची मर्यादा. इंटरनेट कनेक्शन किंवा यूपीआय पीन शिवाय व्यवहार करता येत असले, तरी एका व्यवहाराची कमाल रक्कम रु.१००० पर्यंत मर्यादित आहे. तर एकूण पेमेंट जास्तीतजास्त रु.१०००० इतकेच करता येते , ही रक्कम, सामान्य यूपीआयव्यवहारांसाठी उपलब्ध असलेल्या प्रतिदिनी असलेल्या रु. एक लाखच्या मर्यादेच्या तुलनेत खूपच कमी आहे.
