Is Buddha a historical or a mythological figure?: काही दशकांपूर्वी ए. के. रामानुजन लिखित थ्री हंड्रेड रामायणाज या शोधनिबंधामुळे उजवे आणि डावे या दोन गटांमध्ये मतभेद निर्माण झाले. रामाला ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व न दर्शवता वाङ्मयातील एक काल्पनिक पात्र म्हणून दर्शवल्याचा आरोप उजव्या विचारसरणीच्या गटांनी डाव्यांवर केला. परंतु, ३०० बुद्ध किंवा बुद्ध कथांच्या वेगवेगळ्या आवृत्तींविषयी कोणीच काही बोलत नाही. बुद्ध ऐतिहासिक व्यक्ती आहे, असा समज प्रचलित आहे. परंतु, बौद्ध धर्माचा अभ्यास करणार्या प्रत्येक व्यक्तिला हे माहीत असतं की, आज आपल्याला माहीत असलेली बुद्धाची कथा १९ व्या शतकात युरोपीय अभ्यासकांनी विविध ग्रंथ आणि मनमानी निकष वापरून तयार केलेली आहे.
बुद्ध केव्हा होऊन गेले?
गौतम बुद्धांनंतर सुमारे ५०० ते ७०० वर्षांनी बुद्धांच्या आयुष्यावर चरित्रकथा लिहिली गेली. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण आणि अशोकाचा राज्याभिषेक यांच्यावरून बुद्धांच्या कालखंडाचा अंदाज लावला जातो. परंतु, बुद्धांच्या कालखंडाबद्दल एकवाक्यता नाही. गौतम बुद्ध अशोकापूर्वी २०० वर्षे जगले, तर काही अभ्यासक बुद्ध हे ३०० वर्षे जगले असे मानतात. पूर्व आशिया, आग्नेय आशिया आणि दक्षिण आशियातील विविध ऐतिहासिक ग्रंथांचा विचार केला, तर बुद्धांच्या कालगणनेच्या जवळपास ४० पद्धती दिसतात, पण एकाही बाबतीत एकमत नाही.
बुद्धांशी संबंधित संदर्भ बुद्धचरित, ललितविस्तर, नागार्जुनांसारख्या आचार्यांचे ग्रंथ आणि विविध जातक कथा अशा संस्कृत ग्रंथांमधून येतात. यापैकी कोणताही ग्रंथ बुद्धांच्या काळातील नाही आणि या कथांमध्ये स्वतः बुद्धांपूर्वी अनेक बुद्ध झाले होते, असे गृहीत धरलेले आहे.
म्हणजेच, बुद्धांची कथा मुळातच जैन परंपरेतील तीर्थंकरांच्या कथांप्रमाणे पूर्वीच्या बुद्धांना मान्यता देते. जैन धर्मात प्रत्येक तीर्थंकराच्या आयुष्यातील पाच मुख्य घटनांची सतत पुनरावृत्ती होत राहते. यात गर्भधारण, जन्म, दीक्षा/ संन्यास, कैवल्यज्ञान (जागृती) आणि शेवटी निर्वाण किंवा देहावसान यांचा या घटनांमध्ये समावेश होतो. याचप्रमाणे, बुद्धांच्या कथांमध्ये वेगवेगळ्या ग्रंथानुसार ७ ते २८ बुद्धांचा उल्लेख आढळतो. इथेही तीच परिचित क्रमवार पार्श्वभूमी आढळते. गर्भधारणा, जन्म, संन्यास, ज्ञानप्राप्ती आणि नंतर मृत्यू (परिनिर्वाण) अशी पुनःपुन्हा आढळणारी संकल्पना दिसून येते.
गर्भधारणा प्रसंग आणि वैवाहिक जीवन
ही माहिती कोणत्या ग्रंथातून घेतली आहे त्यानुसार बदलते. काही ग्रंथांमध्ये बुद्धांच्या वेळी गर्भधारणा निष्कलंक रीतीने घडते. स्वप्नात एक दैवी हत्ती बुद्धांच्या मातोश्रींच्या गर्भात प्रवेश करतो. ही कथा जेव्हा चिनी विद्वानांनी अनुवादित केली, तेव्हा कन्फ्यूशियन संस्कृतीला अधिक शोभेल अशी कल्पना त्यांनी केली, या आवृत्तीत बुद्ध स्वतः हत्तीवर स्वार होऊन गर्भात प्रवेश करतात.
काही कथांमध्ये असेही वर्णन आहे की, बुद्ध मातृदेहाच्या ‘अपवित्र’ भागाला स्पर्श न करता रत्नजडित पेटीत ध्यान करीत देवांशी संवाद साधत गर्भातच वास्तव्य करीत होते. शेवटी, लुंबिनी उद्यानात राणी एका झाडाच्या फांदीला धरून उभी असताना, तिच्या शरीराच्या उजव्या बाजूने बुद्ध प्रकट झाले, असेही सांगितले जाते. आज आपण सहज मानतो की, बुद्धांचा जन्म लुंबिनी उद्यानात झाला; परंतु जुन्या ग्रंथांमध्ये या स्थळाचा उल्लेख नाही. बुद्धांचं जन्मस्थान म्हणून लुंबिनीची प्रतिष्ठा अशोकाच्या कारकिर्दीत निर्माण झाली. लुंबिनीने बुद्धांना महत्त्व दिले नाही; उलट अशोकाने लुंबिनीला महत्त्व दिले.
बुद्ध विवाहित होते का? की त्यांच्या विवाहाच्या आणि पितृत्वाच्या कथा नंतर जोडल्या गेल्या? हे कोणता ग्रंथ वाचता यावर हे अवलंबून आहे. बुद्धांना एक पत्नी, दोन पत्नी, तीन पत्नी किंवा अनेक पत्नी असल्याचे वर्णन आढळते. काही कथांमध्ये मुलाचा जन्म त्यांच्या राजवाडा सोडून जाण्याच्या रात्री होतो; तर काहींमध्ये मुलाचा जन्म त्यांना जागृती प्राप्त होऊन बुद्धत्व मिळालेल्या दिवशी झाल्याचे सांगितले जाते.
या भिन्न कथांमुळे काही आवृत्त्यांमध्ये बुद्धांच्या वैवाहिक निष्ठेवरही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. काही कथांमध्ये यशोधरेला विविध कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते आणि बुद्धांच्या इतर पत्नींकडून काहींनी दिलेल्या पाठिंब्याला आणि काहींनी केलेल्या विरोधाला तोंड द्यावे लागते आणि मग येते परिनिर्वाणाची कथा म्हणजेच बुद्धांच्या देहत्यागाची कथा येते.
बुद्धांची आजची प्रचलित कथा ही १९व्या शतकातील रचना आहे का?
जपानी, चिनी आणि कोरियन परंपरांमध्ये या कथांची मांडणी वेगवेगळी आढळते. पाली कॅननच ‘मूळ’ कॅनन आहे, असा समज ठेवणाऱ्या ब्रिटीश ओरिएंटलिस्टांनी बुद्धकथांमधील अलौकिक घटक काढून टाकले. उदाहरणार्थ, बुद्धांना ज्ञानप्राप्तीपूर्वी मार याच्याशी झालेल्या संघर्षाच्या कथेत ‘ज्ञानप्राप्ती’ हा शब्द जाणीवपूर्वक युरोपातील ‘एज ऑफ एनलाइटनमेंट’शी सुसंगत असा निवडण्यात आला. आज आपण जाणतो की, सर्वात प्राचीन उपलब्ध बौद्ध हस्तलिखिते गांधारी प्राकृतमध्ये आहेत आणि ही हस्तलिखिते इ.स.पूर्व १ ल्या ते इ.स. १ ल्या शतकातील आहेत. या प्राचीन हस्तलिखितांमध्ये ‘चार आर्यसत्ये’ असा उल्लेख नाही; त्याऐवजी अनेक विविध ‘सत्यांचा’ उल्लेख आढळतो.
थेरवाद परंपरेनुसार, पाली कॅनन प्रथम इ.स.पू. १ ल्या शतकात श्रीलंकेत राजा वट्टगामणी अभय यांच्या राज्यकाळात लिहिण्यात आले. मात्र त्याचे आजचे स्वरूप म्हणजे आपण ओळखतो ते संहितेचे पूर्ण रूप. इसवी सनपूर्व पहिल्या शतकानंतर पुढील अनेक शतकांत विद्वानांच्या टीकाग्रंथांद्वारे घडत गेले, विशेषतः इ.स. ५ व्या शतकातील बुद्धघोषांच्या कार्यामुळे यात मोलाची भर पडली.
खरं तर, बुद्धांविषयी आपल्या मनात असलेली एकूण कथा ही मोठ्या प्रमाणात १९व्या शतकातील रचना आहे. बुद्धांना ऐतिहासिक व्यक्ती मानून, तर राम आणि कृष्णांना पुराणकथांतील व्यक्तिरेखा म्हणून वर्गीकृत करून भारतीय धार्मिक परंपरांना विभागण्याचे काम ब्रिटीशांनी केले.
आपल्याला नेहमीच हे लक्षात ठेवावे लागेल की, इतिहास नेहमी सत्य सांगतोच असे नाही आणि पुराणकथा नेहमी असत्य सांगतात असेही नाही. भूतकाळ समजून घेण्यासाठी इतिहास आणि पुराणकथा या फक्त दोन वेगळ्या दृष्टी आहेत. एक तथ्यांवर आधारित, तर दुसरी श्रद्धेवर आधारित आहे. परंतु, दोन्हींपैकी एकही पूर्णसत्य सांगत नाही.
विषयाशी संबंधित प्रश्न
- “इतिहास नेहमी सत्य सांगत नाही आणि पुराणकथा नेहमी असत्य सांगत नाहीत.”- बुद्धांच्या विविध कथनांच्या संदर्भात या विधानाची चर्चा करा.
- सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि वसाहतवादी (औपनिवेशिक) व्याख्यांनी बौद्ध इतिहासाच्या निर्मितीवर कसा परिणाम केला, यावर चर्चा करा.
- पूर्वीच्या बुद्धांना मान्यता देणारी बौद्ध कथा आणि जैन धर्मातील तीर्थंकरांच्या कथांचा तुलनात्मक आढावा घ्या.
- गौतम बुद्धांची प्रमुख शिकवण कोणती? त्यांचे आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट करा.
