Lotus in Indian history: आज कमळ हे भारतातील एका प्रमुख राजकीय पक्षाचे चिन्ह म्हणून ओळखले जाते. मात्र हजारो वर्षांपासून कमळ भारतीय मिथककथा, धार्मिक विधी, वास्तुकला आणि हस्तकलेचा अविभाज्य आहे. गावांमध्ये कमळाचे रूप भाताच्या पीठाने काढलेल्या साध्या रांगोळीतून साकारले जाते. अशा प्रतिमांचा मागोवा प्रागैतिहासिक गुहाचित्रांपर्यंत घेता येतो. या कालखंडात मानवाने प्रथमच प्रतिकांच्या माध्यमातून निसर्गविश्व समजून घेण्याचा आणि त्यांना चित्ररूप देण्याचा प्रयत्न केला. हडप्पा संस्कृतीच्या कलासंभारात कमळ आढळत नाही. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात मौर्यांनी उभारलेल्या अशोकस्तंभांमुळेच कमळाचा भारतीय उपखंडाच्या दृश्यकलेत समावेश झाला. एकाच घडीव, झळाळत्या वालूकाश्मात घडवलेले हे स्तंभ कमळाच्या शीर्षभागाने (लोटस कॅपिटल) सुशोभित केलेले होते. त्या कमळावर उभे राहून सिंह, बैल, हत्ती आणि घोडे यांनी राजसत्तेची घोषणा केली. त्याच क्षणी कमळाने भारतीय राज्यकारभाराच्या प्रतिकविश्वात ठामपणे प्रवेश केला.
बौद्ध स्मारक आणि हिंदू मंदिरांमध्ये कमळ
बौद्ध स्मारकं ही कथा पुढे नेतात. इ.स.पू. १०० ते इ.स. १०० या कालखंडात सांची, भारहूत आणि अमरावती येथील स्तूपांच्या कठड्यांवर कमळाची पदकनक्षी आढळते. या उठावशिल्पांमध्ये कमळाची सरोवरे, समृद्धीचे प्रतीक असलेले लंबोदर यक्ष, तसेच वनश्री आणि सौंदर्य दर्शविणाऱ्या यक्षी यांचे दर्शन घडते. कमळावर आसनस्थ असलेली आणि दोन्ही बाजूंनी हत्ती असलेली लक्ष्मीची सर्वात प्राचीन ज्ञात प्रतिमा याच संदर्भात दिसून येते. ही प्रतिमा विविध धार्मिक परंपरांमध्ये एकसमान पवित्र प्रतीकभाषा अस्तित्वात असल्याचा संकेत देते.
नंतरच्या बौद्ध परंपरेत बोधिसत्त्व आणि तारा यांसारख्या देवताही हातात कमळ धारण केलेल्या किंवा कमळावर विराजमान झालेल्या आढळतात. जैन परंपरेतील पार्श्वनाथांची यक्षी पद्मावती हिलाही कमळावर बसलेल्या स्वरूपात दर्शविले आहे. इ.स. ५०० च्या सुमारास हिंदू मंदिरे उदयास आली आणि त्यांच्या रचनात्मक संकल्पनेत कमळ खोलवर रुजले. मंदिरांच्या आराखड्यांमध्ये कमळाच्या आकृतिबंधांचे अनुसरण केले जाते. मंदिरातील अधिष्ठाने विशाल पाकळ्यांप्रमाणे उंचावत गर्भगृहाला आकाशाकडे उचलून धरतात. गुजरातमधील कर्कवृत्तावर (ट्रॉपिक ऑफ कॅन्सर) स्थित मोढेरा येथील सूर्य मंदिरात हे रूप स्पष्टपणे दिसून येते.
स्तंभांची शीर्षके वरच्या दिशेने किंवा खालच्या दिशेने उमललेल्या कमळासारखी घडवलेली असतात. छतांवर अनेकदा उलट्या कमळाच्या आकारांची रचना आढळते. बाह्य भिंतींवर देवता आणि मानवाकृतींनी कमळाच्या कळ्या हातात धारण केलेल्या दिसतात. सूर्यदेव दोन्ही हातांत कमळे धारण करतो. लक्ष्मी देवी आपल्या कमळरूपी सिंहासनावरच विराजमान असते. घुमट आणि शिखरे मेरू पर्वताच्या वैश्विक कमळाची आठवण करून देतात. अशा स्वरूपाची रचना अंकोरवाट किंवा हंपी येथील कमळमंडपांमध्ये दिसून येते.
इंडो-इस्लामिक, शीख आणि आधुनिक वास्तुकलेतील कमळ
तेराव्या शतकानंतर इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा उदय होताच कमळाने नव्या सौंदर्यदृष्टीशी जुळवून घेतले. मशिदींच्या वास्तुरचनेत नैसर्गिक रूपांपेक्षा भूमितीला अधिक महत्त्व दिले जात असले, तरी भारतीय कमळ या दृश्य भाषेत सहज सामावून गेले. घुमट कळीसारख्या कमळाच्या आकारात फुगलेले दिसतात. घुमटांच्या तळाशी कोरलेल्या पाकळ्या आढळतात, तर त्यांच्या शिखरावर उलट्या कमळाच्या आकृती दिसून येतात.
हे रूप हुमायूनच्या मकबऱ्यात आणि ताजमहालात स्पष्टपणे दिसून येते. कमळाच्या कळ्या कमानींच्या कडेला रचलेल्या आढळतात. हे वैशिष्ट्य प्रथम अलाई दरवाज्यात दिसून येते. हा नक्षीकामाचा प्रकार बाल्कनी, भिंती आणि फरशांवर दिसतो; अनेकदा तो जडावकामाच्या (इनले वर्क) माध्यमातून साकारला जातो. बाबराच्या बाग-ए-निलुफरसारख्या बागांची योजना कमळे आणि लिली वाढवण्यासाठीच करण्यात आली होती. कारंजीही कमळाच्या आकारात घडवलेली आढळतात. अगदी फतेहपूर सिक्रीतील अकबराचे सिंहासनसुद्धा कमळावरच उभारलेले असून, त्यातून साम्राज्यशक्ती आणि स्थानिक प्रतीकविश्व यांचा सुरेख संगम दिसून येतो.
शीख गुरुद्वारांनीही अशीच प्रतिकात्मक भाषा स्वीकारली आहे. सुवर्ण मंदिराचा घुमट अर्धवट उमललेल्या कमळाची आठवण करून देतो, तर प्रवेशद्वारे आणि खिडक्यांवर कमळाची नक्षी आढळते. गुरु ग्रंथ साहिबमध्ये कमळ हे इच्छांपासून अलिप्त राहणाऱ्या मनाचे रूपक ठरते. असेच वर्णन प्राचीन उपनिषदांमध्येही आढळते.
आधुनिक भारतानेही ही परंपरा पुढे नेली आहे. १९८६ साली पूर्ण झालेल्या दिल्लीतील बहाई उपासना मंदिराची रचना अर्धवट उमललेल्या कमळाच्या आकाराची असून त्यात संगमरवरी दगडांच्या सत्तावीस पाकळ्या आहेत. या मंदिराचे नऊ प्रवेशद्वारे मध्यवर्ती सभागृहात उघडतात, ते सर्वांसाठी खुले आहे आणि हेच कमळाच्या पवित्रता व सर्वसमावेशकतेच्या प्रतिकाशी सुसंगत ठरते.
तांत्रिक भूमिती, कला आणि शरीररचनेतही कमळाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तांत्रिक भूमितीमध्ये कमळ हे एका वैश्विक आकृतिबंधात रूपांतरित होते. एकमेकांना छेदणारे दोन चौकोन मिळून आठ पाकळ्यांचे कमळ तयार करतात, तर एकमेकांत गुंफलेल्या दोन त्रिकोणांमधून सहा पाकळ्यांचे कमळ निर्माण होते. प्रत्येक आकृती सृष्टीच्या गर्भाचे प्रतीक मानली जाते.
मानवी शरीराची रचना कमळांच्या एका उंच मनोऱ्यासारखी मानली जाते. या कमळांना चक्रे म्हणतात. ग्रंथांनुसार, मणक्याच्या कण्यावर अशी सात महत्त्वाची चक्रे आहेत. कण्याच्या तळाशी चार पाकळ्यांचे कमळ मानले जाते, तर मस्तकावर हजार पाकळ्यांचे कमळ असते. या सर्वात वरच्या कमळात माणूस देहभावनेच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक जागृतीचा अनुभव घेतो.
नृत्यशास्त्रातील ग्रंथांमध्ये कळी धरलेल्या किंवा उमललेल्या कमळाच्या आकारातील कमळ मुद्रा वर्णिल्या आहेत. योगसाधनेत पद्मासन या आसनाच्या माध्यमातून शरीरालाच कमळाचे रूप दिले जाते; हे आसन गहन ध्यानाशी जोडलेले आहे. बुद्ध, शिव आणि जैन तीर्थंकर पद्मासनात आसनस्थ असलेल्या प्रतिमा शारीरिक संतुलन आणि आध्यात्मिक प्रबोधन यांतील घनिष्ठ नातेसंबंध अधिक ठळकपणे अधोरेखित करतात.
सोळाव्या शतकातील, पूर्व भारतातील एका रेशमी पटावर कमळाच्या पाकळ्यांचे केंद्राभिमुख वर्तुळाकार थर दर्शविलेले आहेत. पंजाबची फुलकारी, बंगालची कांथा, ओडिशाची इकत, कर्नाटकची कसूती आणि महाराष्ट्राची पैठणी या प्रत्येक वस्त्रपरंपरेत कमळ हे त्यांच्या रचनात्मक केंद्रस्थानी विराजमान असते. वस्त्रकलेतही कमळाने आपली ठसठशीत छाप उमटवली आहे.
अनेक शतके उलटून गेली तरी कमळ हे भारतातील एक साधे, पण अतिशय खोल अर्थ असलेले प्रतीक म्हणून टिकून आहे. ते आपल्याला केवळ दिसणाऱ्या रूपावर न थांबता, जीवन ज्या अदृश्य उगमातून आकार घेतं त्या अंतर्गत प्रवाहाचा शोध घ्यायला प्रवृत्त करतं.
