यूपीएससीच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेत प्रादेशिक भाषेत प्रश्नपत्रिका उपलब्ध होत नसल्यामुळे मातृभाषेत शिक्षण घेणारे विद्यार्थी समान संधीपासून वंचित राहत असल्याचे दिसत आहे. या परीक्षेत उमेदवारांना मराठीसह देशातील २२ भाषांमध्ये उत्तरे लिहिण्याची मुभा आहे. मात्र, त्यांच्या हाती पडणारी प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजीत असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रादेशिक भाषेत प्रश्नपत्रिका देण्यास असमर्थता दर्शविल्याने मातृभाषेतून ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी झाल्याचे चित्र आहे.

सद्यस्थिती काय आहे?

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा ही देशातील सर्वोच्च आणि अत्यंत महत्त्वाची स्पर्धात्मक परीक्षा आहे. या परीक्षेतून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा तसेच अन्य केंद्रीय सेवांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. सध्या यूपीएससीच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर-१ आणि सामान्य अध्ययन पेपर-२ (सीसॅट) हे दोन अनिवार्य विषय असतात. या दोन्ही प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये तयार केल्या जातात. परिणामी, मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

यूपीएससीचे म्हणणे काय आहे?

नागरी सेवा परीक्षेत प्रादेशिक भाषेतील उमेदवारांसाठी पुरेशा सुविधा देण्यात आल्याचे यूपीएससीचे म्हणणे आहे. इंग्रजी आणि भाषा विषय वगळता उमेदवार इतर सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरे भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीत समाविष्ट कोणत्याही एका भाषेत किंवा इंग्रजीत देऊ शकतात. उमेदवार अनुसूचीत समाविष्ट २२ भारतीय भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत उत्तरे लिहिण्याची निवड करू शकतो. मुलाखतीसाठी २२ भारतीय भाषांपैकी कोणतीही भाषा निवडण्याचा त्याला अधिकार आहे.

यात अडचणी काय आहेत?

या परीक्षेत ज्या २२ प्रादेशिक भाषांमध्ये उत्तरे लिहिण्याची मुभा आहे, त्या भाषेत प्रश्नपत्रिका मात्र मिळत नाही. उमेदवाराला इंग्रजी वा हिंदी प्रश्नपत्रिकेच्या आधारे आपल्या मातृभाषेत उत्तरे द्यावी लागतात. ‘सामान्य अध्ययन पेपर-१’ हा इतिहास, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, विज्ञान-तंत्रज्ञान, चालू घडामोडी आदी विषयांवर आधारित आहे. प्रादेशिक भाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयांचे ज्ञान असूनही प्रश्नांचा नेमका आशय लक्षात घेण्यास तुलनेत अधिक वेळ लागतो. तांत्रिक शब्दावली समजून घेण्यासाठी अतिरिक्त मानसिक प्रक्रिया करावी लागते. पर्यायांमधील सूक्ष्म फरक आणि प्रश्नातील अपवाद लक्षात घेण्यास अडचणी येतात. भाषिक अडथळ्यांमुळे गुणांवर परिणाम होऊ शकतो.

सामान्य अध्ययन पेपर-२ मध्ये (सीसॅट) मोठे उतारे वाचून प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. इंग्रजीतून शिक्षण न घेतलेल्या विद्यार्थ्याला वाचन, त्याचा अर्थ समजून घेणे, मुख्य मुद्दा ओळखणे, लेखकाचा दृष्टिकोन आणि निष्कर्ष समजून घेण्यासाठी तुलनेने अधिक वेळ लागू शकतो. काही विशिष्ट शब्दांमधील सूक्ष्म फरक प्रश्नाचा अर्थ पूर्णपणे बदलू शकतो. प्रश्नपत्रिकेतील अनेक तांत्रिक संज्ञा समजण्यास वेळ लागतो. परीक्षेत एकेक मिनिट महत्त्वाचे असताना एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न समजण्यासाठी २०-३० सेकंद अतिरिक्त लागत असतील, तर संपूर्ण प्रश्नपत्रिकेच्या पातळीवर हा अतिरिक्त वेळ मोठा ठरतो. त्यामुळे समान प्रश्न आणि समान परीक्षा वेळ असूनही प्रादेशिक भाषेतील विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष भाषिक भार समान राहत नाही. ग्रामीण आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासासमवेत प्रश्न समजून घेण्यासाठी अतिरिक्त तयारी करावी लागते.

नकाराचे कारण काय आहे?

प्रादेशिक भाषेत परीक्षा देताना येणाऱ्या विविध अडचणी महाराष्ट्रातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी मांडून सामान्य अध्ययन पेपर-१ आणि सामान्य अध्ययन पेपर-२ (सीसॅट) या दोन्ही प्रश्नपत्रिका मराठीसह संविधानाच्या आठव्या अनुसूचीत समाविष्ट सर्व २२ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यास यूपीएससीने लेखी स्वरूपात असमर्थता दर्शवित एकप्रकारे नकार दिला. सध्याच्या योजनेनुसार नागरी सेवा (पूर्व व मुख्य) परीक्षांच्या प्रश्नपत्रिका नियमांनुसार ठरवून दिलेल्या भाषा माध्यमांमध्येच विषयतज्ज्ञांकडून तयार केल्या जातात. सर्व भाषांमध्ये प्रश्नपत्रिकांची छपाई करण्यासाठी तज्ज्ञांचा सहभाग वाढेल, ज्यामुळे परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञांची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. या संदर्भातील एक प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याचा दाखला यूपीएससीने दिला आहे.

हा निर्णय समानतेच्या तत्त्वाशी सुसंगत आहे का?

भारतीय राज्यघटना समानता आणि समान संरक्षणाची हमी देते. सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समान संधीशी संबंधित एक कलम आहे. यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा केंद्रीय सेवेत जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असल्यामुळे यातील प्रक्रिया समान संधीच्या व्यापक घटनात्मक उद्देशाशी सुसंगत असणे आवश्यक आहे. सद्यस्थिती मात्र तशी नाही, असा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत २२ भारतीय भाषांचा समावेश आहे. अधिकृत भाषा आयोगाच्या शिफारशींचा विचार केल्यास गैरहिंदी भाषिक प्रदेशातील व्यक्तींच्या सार्वजनिक सेवांमधील न्याय्य हक्क व हितांचा विचार करण्याची तरतूद आहे. त्यामुळे राष्ट्रीय सार्वजनिक सेवेतील परीक्षेत भारतीय भाषिक पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या हिताचा विचार करणे हे घटनात्मक भावनेशी सुसंगत ठरते.

विद्यार्थ्याची मातृभाषा मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली, गुजराती, मल्याळम, ओडिया किंवा घटनात्मक मान्यताप्राप्त अन्य भारतीय भाषा असली, तरी त्याची बौद्धिक क्षमता, तर्कशक्ती, विश्लेषणात्मक आणि प्रशासकीय क्षमता ही भाषेवर अवलंबून नसते. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या वास्तविक क्षमतेच्या आधारे स्पर्धा करण्याची समान संधी मिळणे आवश्यक आहे. प्रश्न समजण्यासाठी भाषेचे महत्त्व मोठे आहे. यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेतील दोन्ही प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेच्या समान आशय व समान दर्जाच्या असाव्यात, यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत.

aniket.sathe@expressindia.com