मराठी माध्यमातून परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवारांमध्ये इंग्रजीविषयी असलेला न्यूनगंड, प्रयत्नांची गुणवत्ता आणि लेखन-वाचन कौशल्याचा अभाव याकडे झालेले दुर्लक्ष यंदाच्या ‘यूपीएससी’च्या निकालात अधोरेखित होते. लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक-भाषिक व्यवहारांचे हे प्रतिबिंबच.

यूपीएससी’त मराठी माध्यमातून परीक्षा देण्याची सोय कोणत्या टप्प्यावर आहे?

‘यूपीएससी’च्या परीक्षेत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे टप्पे असतात. पूर्वपरीक्षेत सी-सॅट ही पात्रता परीक्षा आणि सामान्य अध्ययनाचा २०० गुणांचा मुख्य पेपर द्यावा लागतो. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना भारतीय भाषांसह मराठी माध्यमातून उत्तरे लिहिण्याची सोय असते. प्रश्न मात्र इंग्रजीत असतात आणि त्यांचे हिंदी भाषांतरही दिले जाते. शेवटी, मुख्य परीक्षेतील १,७५० गुण आणि मुलाखतीतील २७५ गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाते.

गेल्या काही वर्षांतील कल काय?

‘यूपीएससी’च्या परीक्षेत मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा टक्का कमालीचा घसरतो आहे. विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांच्या माहितीनुसार, सन २०१६ मध्ये ८७ उमेदवारांनी मराठीतून मुख्य परीक्षा दिली. हा आकडा २०२० मध्ये ४३ वर आला आणि त्यानंतर कायम ३० च्या आसपास राहिला. यातील एक-दोन उमेदवार तरी दर वर्षी यश संपादन करत होते. यंदा ३३ उमेदवारांनी मराठीतून मुख्य परीक्षा दिली. मात्र, केवळ दोन उमेदवार मुलाखतीपर्यंत पोहोचले आणि अंतिम निवड यादीत तर एकाचाही समावेश नसल्याचे चित्र आहे.

इंग्रजी माध्यमातून परीक्षा देणार्‍या महाराष्ट्रातील उमेदवारांची स्थिती काय?

महाराष्ट्रातील ६० उमेदवारांनी यंदा यश संपादन केले. पहिल्या शंभरात मात्र केवळ पाच विद्यार्थ्यांचा समावेश झाला. एकाही उमेदवाराचा पहिल्या पन्नासांत समावेश नाही. पहिल्या पाचशेमध्ये २१ उमेदवार आहेत. इंग्रजी माध्यम स्वीकारूनही महाराष्ट्रातील उमेदवार मागे पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या सहा वर्षांत उत्तर प्रदेशच्या सहा उमेदवारांनी पहिला क्रमांक मिळवला, तर राजस्थान, बिहार, तमिळनाडू आणि तेलंगणातील उमेदवारांचाही सातत्याने पहिल्या दहांत समावेश असतो.

मराठीचा टक्का का घसरला?

मराठी माध्यमातून परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवारांमध्ये इंग्रजीविषयी असलेला न्यूनगंड, प्रयत्नांची गुणवत्ता आणि लेखन-वाचन कौशल्याचा अभाव याकडे झालेले दुर्लक्ष यंदाच्या ‘यूपीएससी’च्या निकालत अधोरेखित होते. करोनानंतर ऑनलाइन मंचांवर विसंबून राहण्याची वृत्ती वाढली. लिखाणाची जागा टायपिंगने घेतली. एकाच छताखाली नोट्स, मेंटरशिप आणि चाचणी परीक्षा मुबलक प्रमाणात मिळू लागल्या. यात इंग्रजी आणि हिंदीचा पर्याय सहज उपलब्ध होणारा. अशाच प्रकारची बाजारपेठ मराठी उमेदवारांसाठीही उदयाला येत आहे. एका बाजूला साधन-साहित्याची उपलब्धता वाढते आहे. विद्यार्थ्यांना सर्व काही आयते हवे आहे. एक वेळ तेही उपलब्ध करून दिले जाते. मात्र, दृष्टिकोन विकत घेता येत नाही, हे कोण सांगणार? विद्यार्थ्यांमधील कष्ट करण्याची तयारी, जिद्द, आत्मविश्वास कमी होत चालल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील जाणकार नोंदवतात. घरगुती व्यवहार ते प्राथमिक शिक्षणापासून मराठीची होत असलेली दैना ‘यूपीएससी’च्या परीक्षेतही प्रतिबिंबित होत आहे.

हे चित्र बदलण्यासाठी पर्याय काय?

‘यूपीएससी’ला लिखाणाची परीक्षा म्हटले जाते. त्यात कमी वेळेत आणि कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय सांगण्याचे कसब कामी येते. ऐन वेळी आलेल्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन निकालातही दिसतो. इंग्रजीतून ‘की-वर्ड्स’ आणि जास्तीत जास्त मुद्दे लिहिता येतात, असा एक कल आहे. मात्र, अधिकारी म्हणून काम करण्यासाठी प्रत्यक्ष आयुष्यातील आणि व्यवस्थेतील आव्हाने समजून त्यावर मार्ग काढण्याची दृष्टी असलेले निवडले जातात. सोप्या भाषेत आपले मुद्दे पटवून, स्थानिक संदर्भ देण्याची पद्धत उत्तरांना समृद्ध करते. त्यामुळे आपला सगळा सांस्कृतिक-भाषिक व्यवहार समृद्ध होणे, नव्या बदलांना सामावून घेऊन वाचन-लिखाणासारखी मूलभूत कौशल्ये मरू न देणे, हाच अशा प्रश्नांवरचा तोडगा. नाही तर, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, असे केवळ उत्तरात लिहिण्यापुरतेच मर्यादित राहील.