बशारत मसूद
Operation Sindur anniversary reports reveal psychological scars on children living near the LoC in Uri: उरीच्या बंदी गावात सहा वर्षांची हुमायरा जान आता तिच्या शाळेतील मैत्रिणींना सहज सांगू शकते की, तोफांचे आवाज कसे असतात. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण होत असताना, सीमेवरील मुलांचे बालपण दहशतीच्या सावलीत कसे करपून जात आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हुमायरा.
भीती म्हणजे नेमकं काय?
उरीच्या बंदी गावात सहा वर्षांची हुमायरा जान आता तिच्या शाळेतील मैत्रिणींना सहज सांगू शकते की, तोफांचे आवाज कसे असतात, तोफगोळा घरावर पडला की जमीन कशी हादरते आणि भीती म्हणजे नेमकं काय असतं… कारण हे सगळं तिने फक्त ऐकलेलं नाही, तर ती प्रत्यक्ष हे सगळं जगली आहे.
सीमेवरची मुलं अकाली प्रौढ होतात
ऑपरेशन सिंदूरदरम्यान गेल्या वर्षी १० मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामध्ये तिचं घर उद्ध्वस्त झालं. त्या रात्रीच्या आठवणी आजही तिच्या डोळ्यांत घर करून आहेत. घराच्या ढिगाऱ्यात ती तासन् तास तिचं आवडतं ‘विनी द पूह’ खेळणं शोधत असते. …ते खेळणं तिला नंतर कधीच सापडलं नाही. आता तिच्याकडे एक नवीन खेळणं आहे, ते म्हणजे प्लास्टिकची बंदूक! “आता मला पोलीस व्हायचंय,” ती निरागसपणे म्हणते. “कारण कुणाचंही आयुष्य धोक्यात आलं की, पोलीस मदतीला येतात.” सीमेवर राहणाऱ्या लहान मुलांचं बालपण हे असंच असतं, ते अकाली प्रौढ होतात अनेकदा.

जगणं नव्याने उभं करावं लागतं
उरीच्या लोअर बंदी येथील सरकारी प्राथमिक शाळेत यूकेजीत शिकणाऱ्या हुमायराला अद्याप अक्षरओळखही पुरेशी झालेली नाही; पण ‘सीजफायर’, ‘शेलिंग’, ‘बंकर’, ‘सायरन’ हे शब्द आता तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. तिच्या शाळेचं नाव अजूनही ‘गव्हर्नमेंट बॉईज प्रायमरी स्कूल’ असलं, तरी आता तिथे मुलीही शिकतात. पण नाव बदलण्याइतका वेळही प्रशासनाला मिळाला नसावा; कारण या भागात काही ठरावीक वर्षांनी माणसांना पुन्हा स्वतःचं जगणं नव्याने उभं करावं लागतं. कारण ठरावीक वर्षांनी आधीचं सारं उद्ध्वस्त झालेलं असतं…
बंकरमुळे जीव वाचला
हुमायराचे वडील मोहम्मद अन्वर शेख मजुरी करतात. श्रीनगर-उरी राष्ट्रीय महामार्गालगतच त्यांचं घर. काहीशे मीटर अंतरावर सैन्याचं ब्रिगेड मुख्यालय आहे. जवळून वाहणारा हाजीपीर नाला पाकव्याप्त काश्मीरमधून उरीत येतो… त्या रात्री म्हणजेच १० मे २०२५ रोजी सीजफायर अर्थात शस्त्रबंदी जाहीर होण्याच्या काही तास आधी तीन मोठे तोफगोळे शेख कुटुंबाच्या घरावर कोसळले. सुदैवाने, तोफगोळ्यांचा मारा सुरू होण्यापूर्वीच कुटुंब आधीच नातेवाईकांच्या भूमिगत काँक्रीट बंकरमध्ये आलं होतं. त्यामुळे जीव वाचला. पण घर मात्र वाचलं नाही. आज, वर्ष उलटलं तरीही ते घर अजूनही उद्ध्वस्त अवस्थेतच उभं आहे.
तडे गेलेल्या भिंती आणि धुळमाखली वह्या-पुस्तकं
भिंतींना तडे गेले आहेत. पत्र्याच्या छतावर स्फोटांचे पुरावे पाहायला मिळतात. तुटलेल्या खिडक्यांवर प्लास्टिकचे तात्पुरते पडदे आहेत. कोपऱ्यात अजूनही धुळीत माखलेली वह्या, पुस्तकं, फुटकळ सामान तसंच पडून आहे. घरात २२ इंचांचा टीव्ही आणि काही फर्निचर ठेवून कुटुंबाने जगण्यासाठी एक नवा कृत्रिम निवारा तात्पुरता तयार केला आहे.
‘घरपण’ मात्र परत आलेलं नाही…
हुमायराची मोठी बहीण नौरिन, वय १८, शांतपणे म्हणते, “हे घर दुरुस्त करावंसंच वाटत नाही. काय उपयोग? सीमारेषेवर तणाव वाढला की, आम्ही पुन्हा लक्ष्य ठरतो.” सीमेवरच्या लोकांचं भेदक वास्तव हे असंच आहे. ते कायमस्वरूपी घर बांधत नाहीत; ते तात्पुरत्या निवाऱ्यातच आयुष्य काढतात…
उद्ध्वस्त घर
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून झालेल्या तोफगोळ्यांच्या आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये काश्मीर खोऱ्यात हुमायराच्या परिसरात सुमारे शंभर घरांचं नुकसान झालं. प्रशासनाने ‘पूर्णतः नुकसानग्रस्त’ घरांसाठी ३.३ लाख रुपये, तर अंशतः नुकसान झालेल्यांसाठी १.१ लाख रुपयांची मदत जाहीर केली. शेख कुटुंबाचं घर पूर्णतः उद्ध्वस्त श्रेणीत मोडतं.

…भीतीची सवय
“वडिलांनी घर बांधण्यासाठी बँकेचं कर्ज घेतलं होतं. नुकसानभरपाईचा मोठा भाग कर्जफेडीत गेला,” असं हुमायराचा भाऊ फरहान अहमद सांगतो. त्याच्या आवाजात तक्रारीचा सूर नव्हता… तर ही परिस्थिती अशीच असणार आणि ती कधीच बदलणार नाही, हे बहुधा त्याने स्वीकारलेलं दिसतं. कारण सीमेवर राहणाऱ्यांना सरकारी आश्वासनांपेक्षाही अधिक सवय असते ती भीतीची, दीर्घकाळ प्रतीक्षेची आणि अगदी विस्मरणाचीही!
सायरन वाजला की….
फरहान सांगतो, “गेलं वर्षभर सीमारेखा शांत आहे. पण आम्ही अजूनही दचकतो. सायरन वाजला की, हृदय धडधडायला लागतं. लगेच जिन्याखाली जाऊन घाबरून उभे राहतो…. नंतर कळतं की धरणातून पाणी सोडण्याचा इशारा होता तो. मग… निःश्वास… हे असंच सुरू आहे”
आवाज झाला की, ती घाबरते
माणूस युद्ध संपल्यावरही युद्धातून बाहेर पडत नाही, याचंच हे भेदक वास्तव आहे.
हुमायरा तिच्या शाळेतील मित्रमैत्रिणींना हेच समजावण्याचा प्रयत्न करते.
“ते विचारतात, आवाज झाला की तू एवढी का घाबरतेस?” ती म्हणते. “मी त्यांना सांगायचा प्रयत्न करते… पण त्यांनी ते पाहिलेलंच नाही, तर त्यांना कळणार कसं, मी काय जगत्येय?” एका सहा वर्षांच्या मुलीने भीतीचं इतकं नेमकं स्पष्टीकरण देणं, हे पत्रकार म्हणून अस्वस्थ करून सोडणारं असतं.
किमान एकतरी बंकर असावा
उरीचे रहिवासी इश्फाक अहमद सरकारकडे एकच मागणी करतात, भूमिगत बंकरची संख्या वाढवा.
“गोळीबार थांबला की, सगळे आम्हाला विसरतात. पुढचा हल्ला होईपर्यंत फक्त आश्वासनं दिली जातात. बंकरचं काम मात्र पुढे सरकतच नाही,” ते म्हणतात.
हुमायरालाही तेच हवं आहे.
“आमच्याकडे लपायला जागाच नाही,” ती म्हणते. “किमान एकतरी बंकर असावा.”
जिवंत राहण्यासाठी हवा, एक सुरक्षित कोपरा
सीमेवरच्या मुलांच्या मागण्या फार मोठ्या नसतात.
त्यांना खेळणी, उद्याने किंवा मोठी स्वप्नं नको असतात.
त्यांना फक्त जिवंत राहण्यासाठी एक सुरक्षित कोपरा हवा असतो!
