Indian company sues AI giant Anthropic अँथ्रोपिक ही सुप्रसिद्ध एआय कंपनी एका नवीन टूलमुळे चर्चेत आली आहे. या नव्या एआय टूलमुळे जगभरातील तंत्रज्ञान आणि शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. रातोरात सॉफ्टवेअर कंपन्यांच्या मूल्यांकनातून शेकडो अब्ज डॉलर्स नाहीसे झाले आहेत. परंतु, अँथ्रोपिक कंपनी भारतात आपले पाय रोवण्याच्या तयारीत असतानाच कायदेशीर वादात अडकली आहे. हा वाद कोणत्याही प्रतिस्पर्धी एआय टूलचा नसून, कर्नाटकमधील एका आयटी कंपनीबरोबर आहे. हा वाद नेमका काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात…

काय आहे नेमके प्रकरण?

कर्नाटकमधील आयटी कंपनीचा दावा आहे की, त्यांची कंपनी २०१७ पासून अँथ्रोपिक हेच नाव वापरत आहेत. हे प्रकरण आता कर्नाटकमधील एका न्यायालयात पोहोचले आहे. हा खटला भारतीय कंपनी ‘अँथ्रोपिक सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड’ने दाखल केला आहे. या कंपनीचे मुख्यालय कर्नाटकातील बेळगाव येथे आहे. ६ एप्रिल २०१७ रोजी या कंपनीची स्थापना झाली होती. २०२१ मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे स्थापन झालेल्या अमेरिकन ‘अँथ्रोपिक पीबीसी’ कंपनीच्या कितीतरी आधी या कंपनीची सुरुवात झाली आहे. मोहम्मद अय्याझ मुल्ला यांच्या नेतृत्वाखालील ही कंपनी गेल्या दशकभरापासून ‘अँथ्रोपिक’ या नावाने कार्यरत आहे.

न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार अमेरिकन कंपनीच्या भारतातील प्रवेशामुळे ग्राहक, संस्था आणि सरकारी भागधारकांमध्ये ब्रँडच्या नावावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. टेकक्रंचच्या वृत्तानुसार, अँथ्रोपिक सॉफ्टवेअरने जानेवारीत बेळगावच्या जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. अमेरिकन एआय कंपनीच्या विस्तारामुळे त्यांच्या ब्रँडची ओळख पुसली जात असल्याचा आणि दिशाभूल होत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. कर्नाटकमधील ही कंपनी अमेरिकन कंपनीला अँथ्रोपिक हे नाव भारतात कायमस्वरूपी वापरण्यास मनाई करत आहे.

ही कंपनी या नावाने सुरू असलेल्या सेवा मागे घेणे आणि एक कोटी रुपयांच्या (साधारण १,१०,००० – १,२०,००० डॉलर्स) नुकसानभरपाईची मागणी करत आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना संस्थापक मोहम्मद अय्याझ मुल्ला म्हणाले, “सध्या मी माझ्या कायदेशीर हक्काचा वापर करत आहे. कारण- त्यामुळे माझ्या ग्राहकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होत आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, हा कायदेशीर मार्ग विनाकारण तणाव वाढवण्यासाठी वापरण्यात आला नसून, आम्ही हे नाव आधीपासून वापरत आहोत याची अधिकृत दखल घेतली जावी यासाठी आहे.

एका निवेदनात मुल्ला म्हणाले, “भारतीय स्टार्टअप्स आपली उत्पादने देऊन, विश्वास संपादन करून आणि वर्षानुवर्षे टिकून राहून आपली विश्वासार्हता निर्माण करतात. जेव्हा ही कष्टाने कमावलेली ओळख ऑनलाइन जगात अचानक दाबून टाकली जाते, तेव्हा त्याचे नुकसान खूप मोठे असते. नियमांचे पालन करणाऱ्या संस्थापकांना केवळ एखादी मोठी कंपनी आली म्हणून गायब व्हावे लागू नये, ” असे मत त्यांनी व्यक्त केले.

भारतातील अँथ्रोपिक सॉफ्टवेअर नक्की काय करते?

नावात साम्य असले तरी या दोन्ही कंपन्या एआय क्षेत्रातील पूर्णपणे वेगळ्या विभागांत काम करतात. ‘अँथ्रोपिक सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड’ ही प्रामुख्याने उत्पादनांवर आधारित कंपनी असून, ती भारतातील संस्था, सरकारी संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करते.

त्यांच्या सेवांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • ट्रूगाईडसारखे एआयवर आधारित विद्यापीठ प्लॅटफॉर्म आणि कॅम्पस ऑटोमेशन सिस्टिम्स.
  • स्पर्धा परीक्षांसाठीची यंत्रणा.
  • संस्था आणि सार्वजनिक नेटवर्कसाठी वाय-फाय मॉनेटायझेशन प्लॅटफॉर्म.
  • स्मार्ट सिटी तंत्रज्ञान उपाय.
  • सार्वजनिक सुरक्षेसाठी नावीन्यपूर्ण उपाय, त्यामध्ये ड्रायव्हिंग सुरक्षा आणि कर्मचारी उत्पादकता वाढवण्यासाठी ‘क्विक ट्युन्स’सारख्या यंत्रणांचा समावेश आहे.

ही कंपनी त्यांचे काम ‘कॉन्टेक्स्ट-अवेअर’आणि ‘प्रोफाईल-बेस्ड’असल्याचे सांगते. याचिकेमध्ये कंपनीने असा युक्तिवाद केला आहे की, अमेरिकन कंपनीच्या भारतात येण्यामुळे त्यांच्या व्यवसायाच्या संधी कमी झाल्या आहेत आणि त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच सर्च इंजिन आणि एआय-आधारित शोध प्लॅटफॉर्म आता जागतिक कंपनीच्या नावाला प्राधान्य देत असून, स्थानिक कंपनीचे प्राधान्य कमी झाले आहे.

न्यायालयाचे म्हणणे काय?

२० जानेवारी २०२६ च्या न्यायालयीन आदेशानुसार, बेळगाव वाणिज्य न्यायालयाने अमेरिकेतील अँथ्रोपिक कंपनीला नोटीस आणि समन्स बजावले आहे. मात्र, न्यायालयाने या टप्प्यावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले, “प्रतिवादीला नोटीस न देता आणि त्यांचे म्हणणे न ऐकता, केवळ एकतर्फी तात्पुरती स्थगिती देण्याइतपत सध्या तरी कोणताही मोठा धोका आढळलेला नाही.” या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.

अमेरिकन अँथ्रोपिकसाठी भारत इतका महत्त्वाचा का?

अमेरिका आणि युरोपबाहेर आपला विस्तार करण्यासाठी जागतिक एआय कंपन्यांसाठी भारत ही एक प्रमुख बाजारपेठ ठरत आहे. अँथ्रोपिक पीबीसी ही सॅन फ्रान्सिस्कोमधील एआय संशोधन संस्था तिच्या ‘Claude’ या लार्ज लँग्वेज मॉडेलसाठी ओळखली जाते. त्यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये भारतातील तंत्रज्ञान केंद्र असलेल्या बंगळुरूमध्ये आपले पहिले कार्यालय उघडण्याची घोषणा केली होती. कंपनीने म्हटले आहे की, त्यांची भारतीय टीम स्थानिक गरजांनुसार एआय सोल्यूशन्स तयार करण्यावर, डेव्हलपर्सशी संवाद वाढवण्यावर आणि सरकारी धोरणकर्ते व शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्यावर भर देईल.

जानेवारीत अँथ्रोपिकने मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या माजी व्यवस्थापकीय संचालक इरिना घोष यांची भारताच्या एमडी पदावर नियुक्ती केली. जागतिक एआय कंपनी अँथ्रोपिक ही ३५० अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर २० अब्ज डॉलर्सचा नवीन निधी उभारण्यासाठी चर्चेत असल्याचे वृत्त आहे. अँथ्रोपिकचे सह-संस्थापक व सीईओ डारियो अमोडेई हे दिल्लीतील आगामी ‘एआय इम्पॅक्ट समिट’साठी भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या समिटमध्ये ते सॅम ऑल्टमॅन, जेन्सन हुआंग व सुंदर पिचाई यांच्यासारख्या जागतिक तंत्रज्ञान नेत्यांबरोबर उपस्थित राहतील.