अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला वाद मंगळवारी पुन्हा एकदा उफाळून आला. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकन लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर या नव्या वादाची सुरुवात झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे हेलिकॉप्टर इराणनेच पाडल्याचा आरोप करत आपल्या लष्कराला प्रतिहल्ला करण्याचे आदेश दिले. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील अमेरिकेशी संबंधित तळांवर एकापाठोपाठ एक हल्ले करण्यास सुरुवात केली. या वाढत्या तणावामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती आणखीनच गंभीर झाली झाली आहे. आगामी काळात हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे पडले की इराणने ते पाडले, असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, त्याविषयी…
अपाचे हेलिकॉप्टर पडले की पाडले?
अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर हे लष्करी कारवायांसाठी अत्यंत महत्वाचे मानला जाते. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या कुरापतींवर नजर ठेवण्यासाठी या हेलिकॉप्टरची तैनाती करण्यात आली होती. जागतिक माध्यमांच्या वृत्तांनुसार, मंगळवारी अपाचे हेलिकॉप्टर गस्त घालत असताना अचानक त्यावर एक आत्मघातकी ड्रोन येऊन धडकल्याने ते दुर्घटनाग्रस्त होऊन खाली कोसळले. या हेलिकॉप्टरमधील वैमानिक सुखरूप असून त्यांना अवघ्या दोन तासांत नौदलाच्या बोटीद्वारे सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. समुद्रात अडकलेल्या सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी अमेरिकन लष्कराने नौदलाच्या बोटीचा वापर केल्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. यादरम्यान हा अपघात होता की अपाचे हेलिकॉप्टरला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले होते, याबाबत अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष काढलेला नाही. दुर्घटनेचा तपास सुरू असल्याने अमेरिकन लष्कराच्या अधिकृत निवेदनांमध्येही या घटनेसाठी थेट कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दुर्घटनेसाठी थेट इराणला जबाबदार धरले आणि आपल्या लष्कराला प्रतिहल्ला करण्याचे आदेश दिले.
अमेरिकेने कोणत्या ठिकाणांवर हल्ले केले?
अपाचे हेलिकॉप्टर दुर्घटनेपूर्वीच पश्चिम आशियात तणाव वाढत असल्याची चिन्हे दिसू लागली होती. एप्रिलमध्ये लागू झालेल्या युद्धविरामानंतर प्रथमच इराण आणि इस्रायलने हल्ले केल्याचे वृत्त समोर आले होते. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या संरक्षण दलातील दोन जवानांचा मृत्यू झाल्याचा दावा तेथील सरकारी माध्यमांनी केला होता. विशेष म्हणजे, दोन्ही देशांत युद्धविराम असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान अपाचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांवर एकापाठोपाठ एक हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली. या मोहिमेत अमेरिकन हवाई दल आणि नौदलाच्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. या कारवाईत होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील इराणशी संबंधित लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. त्यामध्ये हवाई संरक्षण प्रणाली, रडार नेटवर्क आणि जमिनीवरील नियंत्रण केंद्रांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेच्या हल्ल्यांत इराणचे किती नुकसान?
अमेरिकन लष्कराने होर्मुझ सामुद्रधुनीजवळील आपल्या अनेक भागांवर केल्याचे इराणने मान्य केले.त्यामध्ये केशम बेट आणि सिरिक बंदर शहर या ठिकाणांचा समावेश असल्याचे इराणच्या स्थानिक माध्यमांनी सांगितले. वृत्तानुसार, बंदर अब्बास परिसरात तसेच सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जास्क शहराच्या परिसरातही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यांमध्ये पाण्याचे दोन मोठे साठे उद्ध्वस्त झाले असून, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याचे सांगण्यात आले. इराणने हल्ल्याची पुष्टी केली असली, तरी त्यांच्या लष्करी तळांचे नेमके किती नुकसान झाले आहे, याची सविस्तर माहिती देण्याचे टाळले आहे. दुसरीकडे- अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही कारवाई सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सुरू करण्यात आली आणि रात्री नऊच्या सुमारास ती पूर्ण झाली. या घटनेमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणने कसे प्रत्युत्तर दिले?
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने आखातात असलेल्या बहरीन येथील अमेरिकेच्या पाचव्या नौदलाच्या ताफ्यावर थेट ड्रोनद्वारे हल्ले करण्यास सुरुवात केली. तसेच हा संघर्ष असाच सुरू राहिल्यास आणखी तीव्र प्रत्युत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला. या हल्ल्यानंतर बहरीनमध्ये धोक्याचे सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, बहरीनच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणचे हे ड्रोन हल्ले हवेतच यशस्वीपणे हाणून पाडले. दुसरीकडे, अमेरिकेचा मित्रराष्ट्र असलेल्या कुवेतमध्येही हाय अलर्ट जारी करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अमेरिकन सैन्याची तैनाती असलेल्या जॉर्डनमधील एका हवाई तळालाही लक्ष्य केल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र, या हल्ल्याला अमेरिका किंवा जॉर्डन प्रशासनाने अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा दिला नाही.
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकेला इशारा
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमधून अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला. इराणचे सैन्य कोणत्याही हल्ल्याला किंवा धमकीला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला सुरक्षित राहायचे असेल, तर आमचा प्रदेश सोडून चालते व्हा, असा इशाराही त्यांनी अमेरिकन सैन्याला दिला. आमच्या सीमेच्या जवळ असणाऱ्या परदेशी सैन्याच्या जीवाला त्यांच्या चुकांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका टाळायचा असेल, तर त्यांनी हा परिसर सोडणे हाच एकमेव उपाय आहे, असेही अराघची यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. पश्चिम आशियातील या ताज्या संघर्षामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या चर्चेवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इराणने आपल्याकडील युरेनियमचा मोठा साठा अमेरिकेकडे सोपवावा, अशी अट डोनाल्ड ट्रम्प यांनी घातली आहे. मात्र, इराणने ही मागणी फेटाळून लावली असून अमेरिकेने आमच्यावरील आर्थिक निर्बंध हटवावे, तसेच युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव नाकारला असून इराणच्या कोणत्याही अटी मान्य केल्या जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे या वादावर कायमस्वरुपी तोडगा कधी निघणार, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे.
