General Randy George US Army Chief Fired : पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटला असतानाच अमेरिकेत घडलेल्या एका घडामोडीने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तेथील संरक्षण मंत्रालयाने तातडीने पदावरून पायउतार होण्याचे निर्देश दिले. संरक्षणमंत्री पीटर हेगसेथ यांनी दिलेल्या या आदेशानंतर जनरल जॉर्ज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. युद्धाच्या काळातच त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याने संपूर्ण अमेरिकेत खूपच खळबळ उडाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसारच ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कोण आहेत जनरल रँडी जॉर्ज? त्यांना पदावरून नेमके का हटवण्यात आले? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
अमेरिका-इराणमध्ये युद्धाचा भडका
पाच आठवड्यांचा कालावधी लोटला तरीही पश्चिम आशियातील युद्धाची धग अद्यापही कायम आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील अमेरिका व इस्रायलच्या मित्रदेशांवर एकापाठोपाठ एक हल्ले केले. या भीषण युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्ष आणखी दोन-तीन आठवडे चालणार असल्याचे संकेत दिल्याने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे हा संघर्ष थांबविण्यासाठी काही देश प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने लष्करप्रमुख रँडी जॉर्ज यांना पदावरून हटवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोण आहेत जनरल रँडी जॉर्ज?
जनरल रँडी जॉर्ज यांचा लष्करी प्रवास अत्यंत प्रभावी राहिला आहे. १९८२ मध्ये ते पहिल्यांदा अमेरिकन सैन्यात रुजू झाले होते. त्यानंतर १९८८ मध्ये ‘United States Military Academy at West Point’ येथून पदवी घेत त्यांनी अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली. जॉर्ज यांनी अमेरिकन सैन्यदलाने आखलेल्या ‘डेझर्ट शिल्ड’, ‘डेझर्ट स्टॉर्म’, ‘ऑपरेशन इराकी फ्रीडम’ व ‘ऑपरेशन एंड्युरिंग फ्रीडम’ यांसारख्या महत्त्वाच्या लष्करी मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. सैन्यदलात कर्तव्य बजावताना त्यांनी नेतृत्वाच्या भूमिकाही अत्यंत जबाबदारीने सांभाळल्या. २०२२ ते २०२३ या कार्यकाळात जॉर्ज यांच्याकडे सैन्यदलाच्या उपसेनाप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती. अलीकडेच वेस्ट पॉईंट अकॅडमीने त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कौतुकही केले होते. सप्टेंबर २०२३ मध्ये तत्कालीन जो बायडेन प्रशासनाने जॉर्ज यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली होती. त्यांचा कार्यकाळ २०२७ मध्ये संपणार होता; परंतु त्यापूर्वीच त्यांना आपले पद सोडावे लागले.
हकालपट्टीमागची संभाव्य कारणे कोणती?
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीटर हेगसेथ यांनी जनरल जॉर्ज यांना हटवण्याचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही. मात्र, अनेकांनी त्यांच्या हकालपट्टीबाबत तर्कवितर्क करण्यास सुरुवात केली आहे. काहींच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांना लष्करप्रमुखपदी केवळ त्यांनीच राबवलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणारी व्यक्ती हवी होती. जनरल जॉर्ज यांची नियुक्ती जो बायडेन यांच्या कार्यकाळात झाल्याने ते ट्रम्प यांच्या बऱ्याच आदेशांकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळेच ट्रम्प यांच्या आदेशावरून पीटर हेगसेथ यांना पदावरून हटवण्यात आल्याची चर्चा आहे. यापूर्वीही हेगसेथ यांनी अमेरिकन सैन्यदलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका केली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विचारसरणीशी सुसंगत नसलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखणे किंवा त्यांना पदावरून हटवणे, असा सपाटा त्यांनी लावला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे जनरल जॉर्ज यांनी उघडपणे नाराजीही बोलून दाखवली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांचा नेमका इशारा काय?
इराणबरोबरचे युद्ध शिगेला पोहोचले असतानाच अमेरिकन प्रशासनाने लष्करप्रमुख रँडी जॉर्ज यांना पदावरून हटवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. युद्धकाळात अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या भूमिकेवर अमेरिकेतून टीका होत आहे. या निर्णयामुळे अमेरिकन सैन्याचे मनोबल खचून त्यांच्यात अस्थिरता निर्माण होऊ शकते, अशी भीती काहींनी बोलून दाखवली आहे. यादरम्यान बुधवारी देशाला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर भीषण हल्ले करण्याचे संकेत दिले. येत्या दोन ते तीन आठवड्यांत आम्ही इराणवर अत्यंत जोरदार प्रहार करणार आहोत. इराणची जागा अश्मयुगात असून, आम्ही लवकरच त्यांना तिथे पाठवू, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानावरून अमेरिका इराणमधील पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जनरल जॉर्ज यांच्या जागी कोण?
जनरल जॉर्ज यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी जनरल ख्रिस्तोफर लावेन यांची प्रभारी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते सैन्यदलात वरिष्ठ लष्करी सहायक म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची उपसेनाप्रमुखपदी नियुक्ती केली होती. केवळ दोन वर्षांपूर्वी कनिष्ठ पदावर असलेल्या ख्रिस्तोफर यांची ही प्रगती झपाट्याने झाल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते सीन पार्नेल यांनी त्यांना अनुभवी आणि युद्धाचा मोठा अनुभव असलेले नेतृत्व, असे संबोधले आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ख्रिस्तोफर लावेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचे अभिनंदन केले होते. तेव्हापासूनच ते ट्रम्प यांच्या पसंतीस उतरल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : एआयमुळे तब्बल १२,००० भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या; ओरॅकलने कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात का केली? कारण काय?
अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यापासून पीटर हेगसेथ यांनी लष्कराच्या संरचनेत मोठे फेरबदल केले आहेत. इराणबरोबरच्या युद्धाच्या काळातही त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचा धडका लावला आहे. हेगसेथ यांच्या या मोहिमेत अनेक दिग्गज अधिकाऱ्यांना आपली पदे गमवावी लागली आहेत. त्यामध्ये व्हाईस चीफ ऑफ स्टाफ जेम्स स्लाईफ, नौदलप्रमुख लिसा फ्रँचेटी यांसारख्या प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांना हटवण्यामागे हेगसेथ यांनी कोणतीही अधिकृत कारणे दिलेली नाहीत. यादरम्यान अमेरिका आणि इराणमधील युद्ध सुरू होऊन जवळपास ३५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. अशा कठीण प्रसंगी लष्करातील वरिष्ठ नेतृत्वात बदल झाल्याने अमेरिकन सैन्यात नाराजीची लाट उसळण्याची शक्यता आहे. या अंतर्गत संघर्षाचा युद्धाच्या निकालावर काय परिणाम होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
