US Bangladesh Secret Trade Deal: बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना बांगलादेश व अमेरिकेत व्यापारी करार होणार आहे. भारत व अमेरिकेत व्यापार करार झाल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. भारतावर १८ टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लावल्याचे ट्रम्प म्हणाले होते. बांगलादेशवर अमेरिकेकडून २० टक्के आयातशुल्क लावले जाते. ते आणखी कमी केले जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये पुढील आठवड्यात व्यापारी करार होणार आहे. दरम्यान, या कराराबाबत बांगलादेश सरकारकडून कमालीची गोपनियता पाळण्यात आली आहे. या करारावर बांगलादेशात चिंता व्यक्त केली जात असून टीका देखील केली जात आहे.
बांगलादेशात १२ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्याआधी पुढील आठवड्यात ९ फेब्रुवारी (सोमवारी) रोजी वॉशिंग्टनमध्ये दोन्ही देशांमधील व्यापार करारावर शिक्कामोर्तब होणार आहे. बांगलादेशातील अग्रगण्य वृत्तसंस्था प्रथोम अलोने याबाबत माहिती दिली आहे. व्यापार कराराची प्रक्रिया ८ फेब्रुवारी रोजी सुरू होईल. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर व्यापार करारावर ९ फेब्रुवारी रोजी स्वाक्षरी करतील. दरम्यान, बांगलादेशचे वाणिज्य सल्लागार एसके बशीर उद्दीन व वाणिज्य सचिव महबुबर रेहमान हे दोघेही या करारासाठी अमेरिकेत जाणार नसल्याचे समोर आले आहे. उद्दीन यांनी काही दिवसांपूर्वी ढाकामध्येच व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे.
आयातशुल्कात कपात होणार ?
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने मागील वर्षी एप्रिल महिन्यात बांगलादेशवर ३७ टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लावले होते. त्यानंतर ते ३५ टक्के केल्यानंतर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यांत २० टक्क्यांवर खाली आणले. व्यापार करारानंतर हे आयातशुल्क १५ टक्के केले जाईल, असा अंदाज आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर १८ टक्के टॅरिफ लावले जाणार असल्याचे म्हटले होते.
बांगलादेशला बाजारपेठ गमावण्याची भीती ?
बांगलादेशची अर्थव्यवस्था मुख्यत: कापड उद्योग व रेडीमेड गारमेंट उद्योगावर आधारित आहे. बांगलादेशातील कापड उद्योगातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी ९० टक्के निर्यात ही एकट्या अमेरिकेला होते. दरवर्षी बांगलादेशातून ७ अब्ज ते ८.४ अब्ज डॉलरची (५८१०० कोटी ते ६९७०० कोटी) अमेरिकेला निर्यात केली जाते. दरम्यान, भारतापेक्षा अधिक फायदा करून घेण्यावर बांगलादेशने जोर दिला आहे. त्याचे कारण म्हणजे बांगलादेशला या क्षेत्रात भारत स्पर्धक आहे.
…तर ५० लाख रोजगार धोक्यात येतील ?
अमेरिकेने भारतावर १८ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याचे ट्रम्प म्हणाले. त्यामुळे १८ टक्के किंवा त्यापेक्षा कमी टॅरिफ आकारला जाईल, असा बांगलादेशचा प्रयत्न असणार आहे. बांगलादेश त्यात अपयशी झाला तर बांगलादेशचे नुकसान होणार आहे. तसे झाल्यास भारतातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कापड उद्योगातून निर्यात होईल. बांगलादेशात कापड उद्योग, वस्त्रोद्योगातून ४० ते ५० लाख लोकांना रोजगार मिळतो. बांगलादेशने या क्षेत्रातील अमेरिकन बाजारपेठ गमावल्यास ५० लाख लोकांचे रोजगार धोक्यात येतील. कापड उद्योगात महिला कामगारांचे प्रमाण अधिक आहे. बांगलादेशाच्या एकूण निर्यातीच्या ८० टक्के निर्यात ही एकट्या कापड उद्योगातून होते. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत अमेरिकेचा वाटा २० टक्के इतका आहे.
अमेरिका – बांगलादेश व्यापार करार गोपनीय का?
बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने अमेरिकेबरोबर गोपनीय करार (Non-Disclosure Agreement) केला आहे. त्यामुळे अमेरिकेबरोबर होणाऱ्या व्यापार करारातील वाटाघाटींची माहिती सामान्य नागरिकांना मिळू शकणार नाही. कराराचा मसुदा सार्वजनिक केला जाणार नसल्याचे वृत्त प्रथोम अलोने दिले आहे. व्यापार कराराबाबत संसद, उद्योगपती किंवा इतर महत्वाच्या व्यक्तींना देखील माहिती दिली जाणार नाही.
निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर बांगलादेशात जनतेने निवडून दिलेले सरकार अस्तित्वात येईल. दरम्यान, त्या नवीन सरकारवर व्यापार करार बंधनकारक ठरेल. नवीन सरकार निवडणुकीनंतर अस्तित्वात येणार असल्याने सध्याच्या अंतरिम सरकारचे प्रमुख असलेले मोहम्मद युनूस हे अमेरिकेबरोबर करार करण्यास घाई का करत आहेत ? असा सवाल बांगलादेशात उपस्थित करण्यात आला. तसेच इतका महत्वाचा करार जनतेपासून गोपनीय ठेवून का केला जात आहे ? असा प्रश्न बांगलादेशातील निवडणूक प्रचारात विचारला जात आहे.
व्यापार करारावर बांगलादेशातच टीका
बांगलादेशातील अर्थतज्ज्ञ अनु मोहम्मद यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत टीका केली आहे. सरकारकडून करारासाठी इतकी घाई का केली जात आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, बंदर भाड्याने देणे, संरक्षण सामग्री आयात करणे असे महत्वाचे करार निवडणुकीच्या काही दिवस आधी केले जात आहेत. त्यात कोणतीच पारदर्शकता नाही. चुकीच्या पद्धतीने हे करार केले जात आहेत. युनूस यांच्या सरकारमध्ये सल्लागार पदांवर आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी बसले आहेत. त्यांचाच हा डाव आहे, अशी टीका त्यांनी केली.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांचे पुत्र साजिब वाजेद यांनीही मोहम्मद युनूस यांच्या सरकारवर टीका केली आहे. बांगलादेशातील निवडणुका चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे ते म्हणाले. तसेच एक कमजोर सरकार आणण्यासाठी बाहेरील देश प्रयत्न करत आहेत. देशात अपारदर्शक कारभार सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
व्यापार करारात काय असण्याची शक्यता ?
दरम्यान, व्यापार कराराची प्रत घेऊन पाच सदस्यांचे शिष्टमंडळ आज (६ फेब्रुवारी) अमेरिकेला रवाना झाले आहे. दरम्यान, व्यापार करारात नेमकं काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने बांगलादेशला चीनकडून संरक्षण क्षेत्रातील आयात कमी करण्यास सांगितले आहे. अमेरिकेकडून संरक्षण सामग्री घेण्याचे आवाहन बांगलादेशला करण्यात आले. तसेच वाहनांशी संबंधित आयात केलेल्या अमेरिकन उत्पादनांची बांगलादेशात तपासणी करू नये, बांगलादेशच्या बाजारपेठेचे दरवाजे अमेरिकेसाठी विनाशर्त खुले करावेत, अशा अटी करारात असल्याचे म्हटले जात आहे.

