Bourbon Virus Symptoms Tick Borne Disease Pandemic : अमेरिकेतील संशोधकांनी बोर्बन व्हायरसमुळे झालेल्या संसर्गाचे पहिले प्रकरण शोधून काढले आहे. न्यूयॉर्कमधील लाँग आयलंड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीमध्ये हा दुर्मीळ विषाणू आढळून आला आहे. गोचिडांपासून पसरणारा हा धोकादायक संसर्ग गेल्या अनेक वर्षांपासून गुप्तपणे पसरत असावा, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘अमेरिकन जर्नल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीन’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अचानक उद्भवलेल्या या विषाणूमुळे अमेरिकेसह संपूर्ण जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बोर्बन व्हायरस नेमका कशामुळे होतो? त्याची नेमकी लक्षणे कोणती? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

बोर्बन व्हायरसचा उलगडा कसा झाला?

जागतिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील ६७ वर्षीय मायकेल लार्किन यांना २०२१ मध्ये घराबाहेर काम करत असताना ‘लोन स्टार’ (गोचीड) या किड्याने दोनदा चावा घेतला होता. मात्र, त्यांच्या आजाराचे नेमके कारण डॉक्टरांना शोधण्यासाठी तब्बल पाच वर्षे लागली. सुरुवातीला लार्किन यांच्या लक्षणांचा संबंध गोचीड चावल्यामुळे होणाऱ्या लाइम रोगासारख्या सामान्य आजारांशी जोडण्यात आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) दिली होती. मात्र, विषाणूजन्य संसर्गावर प्रतिजैविकांचा कोणताही परिणाम होत नसल्याने लार्किन यांची प्रकृती आणखीनच बिघडत गेली. त्यांना सतत ताप येणे, त्वचेवर पुरळ उठणे, रात्री प्रचंड घाम येणे आणि असह्य डोकेदुखी अशी गंभीर लक्षणे दिसू लागली. लार्किन यांच्यावर उपचार करणारे डॉ. लुईस मार्कोस यांनी सीबीएस न्यूज या वृत्तवाहिनीला सांगितले की, हा विषाणू अतिशय धोकादायक ठरू शकतो हे आमच्या लक्षात आले आहे. लाँग आयलंडमध्ये गोचिडांचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे. त्यामुळे खरे सांगायचे तर, ही केवळ एका मोठ्या धोक्याची सुरुवात असू शकते.

बोर्बन व्हायरस म्हणजे नेमके काय?

बोर्बन व्हायरस हा गोचिडाने चावा घेतल्यामुळे पसरणारा अत्यंत दुर्मीळ विषाणू आहे. २०१४ मध्ये अमेरिकेतील कॅन्सस राज्यातील बोर्बन काउंटी येथे प्रथम त्याची ओळख पटली होती. त्यावेळी अनेक गोचीड चावल्यानंतर एका व्यक्तीचा रहस्यमय आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या तपासणीत या नव्या विषाणूचा शोध लागला. हा विषाणू थोगोटोव्हायरस कुटुंबातील असून, तो इन्फ्लूएंझा या आजाराशी संबंधित आहे. दिलासादायक बाब म्हणजे बोर्बन व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. त्याचा प्रसार प्रामुख्याने संक्रमित गोचिडांनी चावा घेतल्यामुळेच होतो. आजपर्यंत या विषाणूच्या संसर्गाची केवळ मोजकीच प्रकरणे अधिकृतपणे समोर आली असली, तरी प्रत्यक्षात त्यामुळे झालेल्या बाधितांची संख्या यापेक्षाही जास्त असू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या बोर्बन व्हायरसपासून संरक्षण करणारी कोणतीही लस उपलब्ध नाही. तसेच या संसर्गावर विशिष्ट औषध किंवा उपचारपद्धतीही विकसित झालेली नाही, त्यामुळे वेळेवर निदान आणि लक्षणांनुसार उपचार करणे हाच सध्या प्रमुख पर्याय आहे.

बॉर्बन व्हायरसची लक्षणे काय आहेत?

संक्रमित गोचीड चावल्यानंतर काही दिवसांतच या आजाराची लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे सौम्य ते अत्यंत गंभीर स्वरूपाची असू शकतात. ‘हेल्थ अँड मी’ या नियतकालिकाच्या अहवालानुसार, बॉर्बन व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सतत ताप येणे, तीव्र थकवा आणि अशक्तपणा, सततची डोकेदुखी, स्नायू आणि संपूर्ण शरीरात वेदना होणे, भूक न लागणे, मळमळ आणि उलट्या होणे, त्वचेवर पुरळ उठणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. याशिवाय, प्रयोगशाळेतील रक्त तपासणीत रुग्णांच्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स प्रचंड कमी झाल्याचे दिसून आले आहे. सध्या अमेरिकेत हा विषाणू आढळून आला असला तरी लवकरच त्याचा जगभरात प्रसार होऊ शकतो.

या आजाराचा सर्वाधिक धोका कोणाला?

तज्ज्ञांच्या मते, संक्रमित गोचीड चावल्यास कोणालाही बोर्बन व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. मात्र, काही व्यक्तींना त्याचा धोका अधिक असतो. त्यामध्ये शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील कामगार, माळी आणि उद्यानांची देखभाल करणारे कर्मचारी, ट्रेकिंग, कॅम्पिंग किंवा जंगलभ्रमंती करणारे व्यक्ती, शिकारी, वृद्ध व्यक्ती, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले नागरिक यांचा समावेश असू शकतो. त्याशिवाय वृद्ध नागरिक आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्तींनाही या आजाराची लागण होऊ शकते.

‘बॉर्बन’ व्हायरसपासून बचाव कसा करावा?

आरोग्य तज्ज्ञांनी बोर्बन व्हायरसपासून बचावासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. गवताळ किंवा जंगल परिसरात जाताना मान्यताप्राप्त असलेल्या कीटकनाशकाचा वापर करावा. तसेच पूर्ण बाह्यांचे कपडे, पूर्ण लांबीची पँट आणि बंद बूट परिधान करावेत. जंगलात किंवा गवताळ भागात फिरताना निश्चित केलेल्या पायवाटेवरूनच चालावे. उंच गवत, झुडपे किंवा दाट वनस्पतींना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. कारण अशा ठिकाणी गोचीड मोठ्या प्रमाणात आढळतात. बाहेरून घरी आल्यानंतर शरीर, कपडे, पाळीव प्राणी आणि वापरलेले साहित्य यांची काळजीपूर्वक तपासणी करावी. शक्य असल्यास त्वरित अंघोळ करावी, त्यामुळे शरीरावर चिकटण्यापूर्वीचे गोचीड निघून जाण्यास मदत होते. शरीराला गोचीड चिकटलेला आढळल्यास तो बारीक टोकाच्या चिमट्याच्या साहाय्याने काळजीपूर्वक काढावा. ताप, तीव्र थकवा, स्नायूंमध्ये वेदना किंवा इतर संशयास्पद लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.