अमोल परांजपे

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हाऊस कमिटी’ने समन्स बजावले. ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेचे सर्वोच्च कायदेमंडळ असलेल्या ‘द कॅपिटॉल’बाहेर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या दंगलीची चौकशी सुरू आहे. या दंगलीमागे ट्रम्प यांचा हात असल्याचा संशय बळावल्यामुळे त्यांना ‘सबपिना’ किंवा समन्स बजावण्यात आले आहे. ते चौकशीला हजर होणार की समन्स धुडकावणार, हा खरा प्रश्न आहे.

६ जानेवारी २०२१ रोजी नेमके काय घडले?

नोव्हेंबर २०२०मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ६ जानेवारीला हाऊसची बैठक होणार होती. मात्र ही बैठक सुरू होण्यापूर्वीच ट्रम्पसमर्थक ‘कॅपिटॉल’बाहेर जमले आणि दंगल सुरू झाली. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी इमारतीत अडकून पडले. मात्र बाहेर असलेल्या बहुतांश लोकप्रतिनिधींना आत जाणे अशक्य झाले. या दंगलीत चौघांचा मृत्यू झाला. तर १३८ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले.

हाऊस ६ जानेवारी कमिटीच्या बैठकीत काय झाले?

या दंगलीची चौकशी करणाऱ्या ‘हाऊस ६ जानेवारी कमिटी’च्या सुनावण्या सध्या सुरू आहेत. यापैकी आठवी सुनावणी गेल्या शुक्रवारी झाली. पुढल्या आठवडय़ात होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुकांपूर्वीची ही शेवटची सुनावणी होती. या सुनावणीत दंगलीबाबत आणखी काही पुरावे समोर आले. त्यामुळे ट्रम्प यांच्याच चिथावणीमुळे समर्थकांनी दंगल घडवली का, अशी शंका उपस्थित झाली आहे. याची शहानिशा त्यांनी स्वत: हजर होऊन करावी, असा निर्णय समितीने एकमताने घेतला. ‘६ जानेवारीच्या मुख्य सूत्रधाराकडून शपथेवर जबाब आपण घेतलाच पाहिजे,’ असे समितीच्या उपाध्यक्षा लिझ चेनी म्हणाल्या. विशेष म्हणजे चेनी या ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्याच काँग्रेस सदस्य आहेत.

समितीसमोर आलेले नवे पुरावे कोणते?

‘ट्रम्प यांनी जमावाला मागे हटण्याचे आवाहन करण्यास नकार दिल्यामुळे अधिक कुमक पाठवण्याची आवश्यकता आहे,’ असे कॅपिटॉलमध्ये अडकलेले सदस्य बोलत असल्याची एक चित्रफीत आहे. हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांची चित्रफीत यात महत्त्वाची ठरली आहे. नजीकच्या व्हर्जिनिया राज्याच्या गव्हर्नरना अधिक पोलीस पाठवण्याची विनंती त्या करत असल्याचे दिसते. दंगल सुरू झाली त्यावेळी पेलोसी आणि सिनेट मायनॉरिटी लीडर चक शूमर यांनी अनेकांशी दूरध्वनीवर केलेले संभाषण आहे. यावरून ट्रम्प यांच्यावर संशय बळावला आहे. याशिवाय ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी केलेली काही विधानेही आता उघड झाली आहेत.

पराभव मान्य करायचा नाही, हे आधीच ठरले होते?

नोव्हेंबर २०२०च्या निवडणुकीमध्ये पराभव मान्य करायचाच नाही, याचा निश्चय ट्रम्प यांनी आधीच केला होता. जुलै २०२०मध्ये फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांना ‘पराभव झाला तर स्वीकारणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘नाही. मला बघावे लागेल. मी काही फक्त हो किंवा नाही म्हणणार नाही. मागच्या वेळीही मी तसे केले नव्हते,’ असे उत्तर ट्रम्प यांनी दिले.  जाहीर सभा, बैठका आणि मुलाखतींतही ट्रम्प यांनी पराभव मान्य करणार नसल्याचे संकेत दिले होते.

ट्रम्प समन्स स्वीकारणार की धुडकावणार?

आपल्याविरुद्ध किंवा आपल्या कंपनीविरुद्ध अशा चौकशीला सहकार्य करण्याची ट्रम्प यांची वृत्ती नाही. समन्स बजावल्यानंतर त्यांनी समाजमाध्यमांवरून ‘आपल्याला आधी विचारले का नाही,’ असे म्हणत आदळआपट केली. तज्ज्ञांच्या मते त्यांना समन्स अव्हेरता येणार नाही. राष्ट्राध्यक्ष आणि माजी राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वी अनेकदा हाऊस कमिटीपुढे जबाब दिले आहेत. मात्र ट्रम्प यांनी हजर राहण्यास नकार दिला, तर कायदेशीर गुंता वाढणार आहे.

ट्रम्प चौकशीला तयार झाल्यास काय होईल?

ट्रम्प यांनी हजर राहून शपथेवर जबाब द्यायची तयारी दर्शवली, तर ते आणि समितीच्या समन्वयाने तारीख आणि वेळ निश्चित होईल. या चौकशीवेळी त्यांचे समर्थक पुन्हा एकदा जमण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२१चा अनुभव लक्षात घेता त्यावेळी चोख सुरक्षा ठेवावी लागेल, हे स्पष्टच आहे. दुसरीकडे ट्रम्प त्यांच्या सहभागाचे आरोप कसे नाकारतात, यावर चौकशी समितीची पुढली दिशा निश्चित होईल. ही चौकशी म्हणजे एक मोठा ‘सोहळा’च ठरेल असे मानले जात आहे.

समन्स धुडकावल्यास समितीसमोर पर्याय कोणते?

हाऊस कमिटीने बजावलेला ‘सबपिना’ म्हणजे अधिकृत कागदपत्र आहे. त्याचा आदर करत ट्रम्प स्वत:हून हजर झाले नाहीत, तर अशा स्थितीत समितीसमोर दोन कायदेशीर पर्याय असतील. पहिला पर्याय म्हणजे हे संपूर्ण प्रकरणच पुढल्या सुनावणीसाठी न्यायव्यवस्थेकडे नेणे आणि दुसरा पर्याय म्हणजे ट्रम्प यांना चौकशीसाठी बाध्य  करण्याची मागणी करत न्यायालयात जाणे. मात्र हे दोन्ही पर्याय प्रचंड वेळखाऊ आहेत. त्यामुळे ट्रम्प यांना चौकशी टाळण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. कदाचित आताच्या काँग्रेसचा कार्यकाळही संपून जाईल.

मध्यावधी निवडणुकांनंतर काय फरक पडेल?

नोव्हेंबरच्या दुसऱ्या मंगळवारी, ८ तारखेला अमेरिकेत मध्यावधी निवडणूक होणार आहे. निम्म्या राज्यांमध्ये हाऊस आणि सिनेटसाठी मतदान होईल. या निवडणुकीनंतर कदाचित हाऊसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत होऊ शकेल. बहुमताच्या आधारावर चौकशी गुंडाळता येणेही शक्य आहे. मात्र कॅपिटॉल दंगल अनेक रिपब्लिकन सदस्यांनाही रुचलेली नाही. त्यामुळेच हाऊस कमिटीमध्ये असलेल्या ट्रम्प यांच्या स्वपक्षीयांनीही समन्स पाठवण्याच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे आता प्रश्न आहे तो ट्रम्प समन्सनुसार हजर होणार की नकार देऊन कालापव्यय करत राहणार. याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळेल.

amol.paranjpe@expressindia.com