US-Iran War Shueqin Jiang Predictions : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीचे जगभरातील विविध तज्ज्ञांकडून विश्लेषण केले जात आहे. या सगळ्यात बीजिंगमधील शिक्षणतज्ज्ञ शुएक्विन जियांग यांनी केलेले भाकीत चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. इराणबरोबरच्या युद्धात अमेरिकेला पराभव स्वीकारावा लागणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यापूर्वीही जियांग यांनी २०२४ मध्ये तीन मोठी भाकिते केली होती. त्यापैकी दोन खरी ठरल्याने आता त्यांच्या तिसऱ्या भाकिताकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याविषयीचा हा आढावा…
कोण आहेत शुएक़िन जियांग?
२०२५ मध्ये अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत येणार असल्याचे भाकीत जियांग यांनी केले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प इराणवर हल्ला करतील, असा दावाही त्यांनी केला होता. जियांग यांची पहिली दोन भाकिते तंतोतंत खरी ठरल्यामुळे आता तिसऱ्या भाकिताने अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांची चिंता वाढवली आहे. १९७६ मध्ये बीजिंगमध्ये जन्मलेले शुएक़िन जियांग हे तत्त्वज्ञान आणि इतिहास विषयातील शिक्षणतज्ज्ञ आहेत. चीनमधील शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यांनी अमेरिकेतील नामांकित येल विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली आहे.
त्यांचे विश्लेषण कशावर आधारित असते?
सप्टेंबर २००८ ते जुलै २०१० या काळात जियांग यांनी चीनमधील शेन्झेन मिडल स्कूल येथे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यानंतर बीजिंगमधील पेकिंग युनिव्हर्सिटी हाय स्कूल इंटरनॅशनल डिव्हिजन या संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. २०१३ ते २०१४ या कालावधीत जियांग त्सिंगहुआ विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सध्या ते द न्यूयॉर्क टाइम्सच्या चिनी संकेतस्थळावर शिक्षणविषयक योगदान देणारे संपादक म्हणूनही ओळखले जातात. जियांग यांनी Predictive History या नावाने एक यूट्यूब चॅनेल सुरू केले असून, त्याद्वारे त्यांनी मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. आपल्या यूट्यूब व्हिडीओंमधून ते भविष्यातील जागतिक घडामोडींचा अंदाज व्यक्त करतात. शास्त्रीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनामुळेच त्यांची भाकिते अचूक ठरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
आणखी वाचा : इराणकडे कोणकोणती क्षेपणास्त्रे? सैन्य किती शक्तिशाली? अमेरिका-इस्रायलसमोरील आव्हाने कोणती?
जियांग यांची कोणती भाकिते ठरली खरी?
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे विधान जियांग यांनी २०२४ मध्येच एका ऑनलाइन व्याख्यानादरम्यान केले होते. सध्या मध्यपूर्वेतील या दोन देशांत युद्ध पेटलेले असताना त्यांचा हा जुना व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. आपल्या व्याख्यानात जियांग यांनी तीन मोठी भाकिते केली होती. त्यातील पहिले भाकीत नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय होईल आणि २०२५ मध्ये ते सत्तेत येतील. दुसरे भाकीत- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प हे इराणवर हल्ला चढवतील. तिसरे भाकीत- इराणबरोबरच्या युद्धात अमेरिकेला पराभवाची कडू चव चाखावी लागणार, असे होते. त्यांची पहिले दोन भाकिते तंतोतंत खरी ठरल्यामुळे आता तिसऱ्या भाकिताने अमेरिकन गोटात अस्वस्थता पसरली आहे.
तिसऱ्या भाकिताला नेमका कशाचा आधार?
इराण व अमेरिका यांच्यातील युद्धाबाबत वर्तवलेल्या भाकिताला जियांग यांनी ऐतिहासिक संदर्भाचा दाखला दिला आहे. त्यांनी या संभाव्य युद्धाची तुलना सिसिलियन मोहिमेशी केली आहे. पेलोपोनेशियन युद्धादरम्यान अथेन्सने स्पार्टाविरुद्ध मोठी लष्करी मोहीम छेडली होती. त्यावेळी या मोहिमेला सिसिलियन मोहीम, असे नाव देण्यात आले होते. मात्र, या मोहिमेत अथेन्सच्या सैन्याचा दारुण पराभव झाला आणि तिथूनच अथेन्सच्या साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला होता. अमेरिकेच्या पराभवाचे भाकीत करताना जियांग यांनी आपल्या व्हिडीओत काही महत्वाची भौगोलिक कारणेही सांगितली आहेत. इराणची भौगोलिक रचना अमेरिकन सैन्यासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरू शकते. त्याशिवाय इराणच्या सैन्याचा कडवा प्रतिकार अमेरिकेच्या आधुनिक शस्त्रास्त्रांना भारी पडू शकतो. इराणची ही भौगोलिक परिस्थिती युद्धाचे पारडे त्यांच्या बाजूने झुकवणार आणि अमेरिकेला पराजयाची माती खावी लागणार, असे जियांग यांनी म्हटले आहे.
अमेरिका इराणसमोर गुडघे टेकणार?
मध्यपूर्वेतील युद्धात अमेरिकेचा पराभव होईल, ही भविष्यवाणी व्हायरल झाल्यानंतर जियांग यांनी अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अमेरिका व इराण यांच्यातील युद्ध नेमके कोणत्या वळणावर येईल आणि त्यात इराणचे पारडे कसे जड होईल याचे सविस्तर विश्लेषण केले. जियांग यांच्या मते, मध्यपूर्वेतील हे युद्ध आता एका निर्णायक टप्प्यावर आले असून, अमेरिका हळूहळू कमकुवत होत आहे. इराण गेल्या २० वर्षांपासून या संघर्षाची तयारी करीत असल्याने अमेरिकेसमोर अत्यंत कठीण आव्हाने असणार आहेत. मुलाखतीदरम्यान जियांग यांनी एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख केला. त्यांच्या मते, जून २०२५ मध्ये अमेरिका व इराणमध्ये झालेला १२ दिवसांचा संघर्ष हा इराणसाठी एका तालमीसारखा होता. त्या १२ दिवसांच्या युद्धात इराणने इस्रायल आणि अमेरिका या दोघांच्याही हल्ला करण्याच्या क्षमतेचा बारकाईने अभ्यास केला. आठ महिन्यांपासून इराण या नवीन आक्रमणासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे, असे जियांग यांनी नमूद केले.
हेही वाचा : कोण आहेत हसन खोमेनी? अयातुल्ला खामेनींच्या हत्येनंतर इराणची सूत्रे कोणाकडे?
इराणबरोबरच्या युद्धात अमेरिकेचा पराभव होणार?
इराणसमर्थक गट – लेबनॉनमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुथी बंडखोर आणि गाझामधील हमास व पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद यांसारख्या संघटनांना अमेरिकेची रणनीती आणि मानसिकता पूर्णपणे समजली असल्याचा दावा जियांग यांनी केला आहे. इराणच्या समर्थक गटांनी अमेरिकन मानसिकतेवर चांगली पकड मिळवली आहे. अमेरिकन साम्राज्याला कसे कमकुवत करायचे आणि शेवटी ते कसे नष्ट करायचे, याची एक अचूक रणनीती आता त्यांच्याकडे तयार असल्याचे जियांग यांनी म्हटले आहे. त्यांनी एक मोठा इशारा देताना सांगितले की, इराणी सैन्य केवळ अमेरिकेशी नव्हे, तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारत आहे. त्यांच्या या रणनीतीमुळे जागतिक बाजारपेठ आणि पुरवठा साखळीवर भीषण परिणाम होऊ शकतात, ज्याचा फटका पर्यायाने अमेरिकेलाच बसेल. जियांग यांचे हे भाकीत समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाल्यानंतर अनेक जागतिक तज्ज्ञांनी यावर सावध भूमिका घेतली आहे. काही अभ्यासकांनी त्यांच्या ऐतिहासिक दाखल्यांचे कौतुक केले असून, त्यांचे विश्लेषण तर्कसुसंगत असल्याचे म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला काही तज्ज्ञांचे मत आहे की, भू-राजकीय घडामोडींमध्ये इतकी टोकाची भविष्यवाणी करणे केवळ तर्कावर आधारित असते. युद्धात अनेक अनपेक्षित वळणे येत असतात. त्यामुळे जियांग यांचा प्रत्येक दावा खरा ठरेलच, असे नाही.
