US Greenland conflict राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नजर आता ग्रीनलँडवर आहे. व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करून त्यांना अटक केल्यानंतर आता अमेरिका ग्रीनलँड बळकावण्याची तयारी करत आहे. ग्रीनलँड बेट ताब्यात घेण्याचा हा मानस व्हाईट हाऊसने व्यक्त केला आहे आणि यासाठी लष्करी बळाच्या वापराचा पर्याय आमच्यासाठी खुला असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. त्यामुळे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ (नाटो) सध्या एका गंभीर अशा अंतर्गत संकटाचा सामना करत आहे. मुख्य म्हणजे ट्रम्प यांच्याविरोधात सात देश एकवटले आहेत. हे देश कोणते? ट्रम्प यांना ग्रीनलँड का हवे आहे? ट्रम्प यांच्या धमकीने नाटो का हादरले? जाणून घेऊयात…

अमेरिकेची नजर ग्रीनलँडवर

राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पदभार स्वीकारल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आता व्हाईट हाऊसने पुन्हा ग्रीनलँड बेट ताब्यात घेणार असल्याचा इशारा दिला आहे. ग्रीनलँडवर अमेरिकेने हल्ला केल्यास ‘नाटो’ संघटना कोसळू शकते, असा इशारा युरोपिय देशांनी दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर या घडामोडी घडत आहेत. अवघ्या ५६ हजार लोकवस्तीचे ग्रीनलँड हे बेट म्हणजे मर्यादित स्वायत्तता असलेल्या डेन्मार्कचा भूभाग असून नाटोचा भाग आहे. व्हेनेझुएलातील कारवाईनंतर आता ट्रम्प यांनी ग्रीनलँडविरुद्ध बळाचा वापर करण्याचा इशारा दिल्याने युरोपिय मित्र राष्ट्रांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

ट्रम्प यांच्याविरोधात सात देश एकवटले

युरोपमधील सात देशांतील प्रमुख नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी करून ग्रीनलँडवर ट्रम्प यांनी सांगितलेला हक्क फेटाळून लावला आहे. यामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांचा समावेश होता. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, खनिजसंपत्तीने समृद्ध असलेले ग्रीनलँड तेथील लोकांच्या मालकीचे आहे आणि बाह्य दबावामुळे त्याचा दर्जा बदलणार नाही.

नेत्यांनी म्हटले की, “डेन्मार्क आणि ग्रीनलँडशी संबंधित बाबींवर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्यांनाच आहे.” कॅनडानेही या भूमिकेचे समर्थन केले. पंतप्रधान मार्क कार्नी यांनी स्पष्ट केले की, “ग्रीनलँडचे भविष्य काय असावे हा निर्णय पूर्णपणे ग्रीनलँड आणि डेन्मार्कच्या जनतेचा आहे.” कार्नी यांनी नंतर डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेतली.

त्यानंतर त्यांच्या कार्यालयाने सांगितले की, “डेन्मार्कचे सार्वभौमत्व आणि ग्रीनलँडसह त्यांच्या प्रादेशिक अखंडतेचा सन्मान आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार केला पाहिजे.” पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी हा प्रश्न नाटोच्या अस्तित्वाशी जोडला. त्यांनी इशारा दिला की, “नाटोच्या कोणत्याही सदस्याने दुसऱ्या सदस्यावर हल्ला किंवा त्या देशाला धमकी देऊ नये. जर संघटनेतच परस्पर संघर्ष सुरू झाला, तर नाटोचे अस्तित्व उरणार नाही.”

डेन्मार्कची भूमिका काय?

डेन्मार्कची प्रतिक्रिया अत्यंत आक्रमक राहिली आहे. पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी इशारा दिला की, अमेरिकेने ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास हा ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ म्हणजेच नाटोचा शेवट असेल. डेन्मार्कच्या ‘टीव्ही २’ या वाहिनीशी बोलताना फ्रेडरिक्सन म्हणाल्या, “जर अमेरिकेने नाटोच्याच एका देशावर लष्करी हल्ला करण्याचा मार्ग निवडला तर सर्व काही थांबेल. यामध्ये नाटो सदस्यत्व आणि दुसऱ्या महायुद्धानंतर मिळालेली सुरक्षा या सर्वांचा अंत होईल.”

ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, ते २० दिवसांत ग्रीनलँडबद्दल बोलणार आहेत. ग्रीनलँड हा अजस्र भूभाग वेळ पडल्यास डेन्मार्ककडून हिसकावून घेऊ अशी धमकीही त्यांनी अनेकदा दिली आहे. दुसरीकडे डेन्मार्कने आर्क्टिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी आपली कटिबद्धता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डेन्मार्कने ग्रीनलँडच्या संरक्षण क्षमतेसाठी चार अब्ज डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे. त्यामध्ये नौदलाची जहाजे, ड्रोन आणि विमानांमधील गुंतवणुकीचा समावेश आहे.

अमेरिकेचा भाग होण्यास ग्रीनलँडचा नकार

स्वायत्त डॅनिश प्रदेश असलेल्या ग्रीनलँडने अमेरिकेचा भाग होण्यासाठी वारंवार नकार दिलेला आहे. ग्रीनलँडचे प्रीमियर जेन्स-फ्रेडरिक नील्सन यांनी याविषयी विरोध दर्शवला आहे आणि जनतेची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांच्या पत्नी केटी मिलर यांनी ‘एक्स’वर SOON (लवकरच) असे लिहून अमेरिकेच्या झेंड्याच्या रंगात रंगवलेला ग्रीनलँडचा नकाशा शेअर केला आहे, ज्यामुळे तणाव अधिक वाढला आहे.

नील्सन यांनी या पोस्टचा निषेध केला आहे आणि ती अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले. “घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. आपला देश विकण्यासाठी नाही आणि आपले भविष्य सोशल मीडिया पोस्ट ठरवू शकत नाहीत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेसाठी ग्रीनलँड का महत्त्वाचे?

युरोप आणि उत्तर अमेरिका यांच्यामध्ये असलेले हे बेट अमेरिकेच्या बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स आणि आर्क्टिक निरीक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ट्रम्प यांनी या भागात रशिया आणि चीनच्या वाढत्या हालचालींचा उल्लेख केला आहे आणि अमेरिकेचे नियंत्रण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले, “ग्रीनलँडमध्ये सर्वत्र रशियन आणि चिनी जहाजे दिसत आहेत.” ते पुढे म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला ग्रीनलँडची गरज आहे आणि डेन्मार्क ते सांभाळण्यास सक्षम नाही.”

याव्यतिरिक्त, ग्रीनलँडमधील खनिज साठेही अमेरिकेसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि लष्करी उपकरणांसाठी लागणारी ही खनिजे मिळवून चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा अमेरिकेचा विचार आहे. सध्या शीतयुद्धाच्या काळातील एका द्विपक्षीय करारानुसार अमेरिकेचा एक लष्करी तळ ग्रीनलँडमध्ये आहे. एकेकाळी तिथे १०,००० अमेरिकन सैनिक होते, जे आता फक्त २०० वर आले आहेत.

अमेरिका लष्कराचा वापर करणार?

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी लष्करी बळासह विविध पर्यायांचा विचार करत आहेत. व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांची टीम या महत्त्वाच्या परराष्ट्र धोरणाचे ध्येय गाठण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा करत आहेत. अर्थात, कमांडर-इन-चीफ म्हणून अमेरिकन लष्कराचा वापर हा पर्याय नेहमीच उपलब्ध असतो.” रॉयटर्सच्या वृत्तानुसार, प्रशासन ग्रीनलँड थेट विकत घेणे किंवा ‘कॉम्पॅक्ट ऑफ फ्री असोसिएशन’ (COFA) सारखी व्यवस्था करण्याच्या विचारात आहे. यामध्ये पूर्ण विलीनीकरण होणार नाही, परंतु संरक्षण आणि परराष्ट्र धोरणावर अमेरिकेचा मोठा प्रभाव असेल.

ट्रम्प यांचा निश्चय ठाम असला तरी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना सांगितले की, सध्या तरी कोणत्याही आक्रमणाची शक्यता नाही. डेन्मार्ककडून हा प्रदेश विकत घेण्यालाच प्राधान्य दिले जात आहे. मात्र, सिनेटमधील काही रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक सदस्यांनी इशारा दिला आहे की, अशा प्रकारचा दबाव आणणे म्हणजे आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन ठरेल आणि डेन्मार्कच्या सार्वभौमत्वाचा तो अपमान असेल.