काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येमेनमधील हुती बंडखोरांवरील संभाव्य लष्करी हल्ल्यांबाबत ‘सिग्नल’ या मेसेजिंग अ‍ॅपवरील ग्रुपमध्ये चर्चा केली होती. या चर्चेत चुकून ‘द अटलांटिक’ या नियतकालिकाच्या संपादकाला सहभागी करून घेतल्याने अमेरिकेची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी नाचक्की झाली होती. त्या घटनेमुळे अमेरिकेच्या गुप्तचर मोहिमा आणि संवेदनशील लष्करी माहितीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या जुन्या लाजिरवाण्या घटनेची पुनरावृत्ती आता नव्या रूपात झाली आहे. यावेळी थेट अमेरिकेचे ब्रह्मास्त्र मानल्या जाणाऱ्या F-35 स्टेल्थ फायटर जेटचे अतिसंवेदनशील भाग थेट हाँगकाँगमध्ये पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने महत्वाच्या ई-मेलकडे केलेले दुर्लक्ष आणि वाहतूक मार्गातील शेवटच्या क्षणी झालेला बदल यामुळे हे तंत्रज्ञान चीनच्या दारात पोहोचल्याचे उघड झाले आहे. या गंभीर सुरक्षा त्रुटीमुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली असून ट्रम्प प्रशासनाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. नेमका हा प्रकार कसा घडला? जाणून घेऊया…

इतका महत्त्वाचा ई-मेल दुर्लक्षित कसा राहिला?

अमेरिकेच्या F-35 स्टेल्थ फायटर जेटचे संवेदनशील भाग हाँगकाँगमध्ये पोहोचण्यामागे कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून झालेली चूक कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, युनायटेड पार्सल सर्व्हिस (UPS) या प्रसिद्ध कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून एक अतिशय महत्त्वाचा ई-मेल वाचायचा राहून गेला आणि हा मोठा घोळ झाला. F-35 लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या ‘लॉकहीड मार्टिन’ कंपनीने हे सुटे भाग पोहोचवण्याचे काम ‘DSV A/S’ या मालवाहतूक कंपनीकडे सोपवले होते. प्रत्यक्ष वाहतूक करणाऱ्या यूपीएस कंपनीला डीव्हीएसने आधीच एक सावध करणारा ई-मेल पाठवला होता. त्यात विमानांचे भाग काही ठरावीक देशांतून पाठवू नयेत असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र व्यापार नियमांनुसार ही अट महत्त्वाची होती. देशातील संवेदनशील लष्करी तंत्रज्ञान शत्रूदेशांच्या हाती पडू नये, असा या नियमांचा मुख्य उद्देश आहे.

कर्मचाऱ्याकडून नेमकी कुठे चूक झाली?

ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, F-35 विमानांचे भाग सुरुवातीला दक्षिण कोरिया आणि तैवानमार्गे सॅन फ्रान्सिस्कोला पाठवण्याचे नियोजन होते. हे दोन्ही देश अमेरिकेचे संरक्षण क्षेत्रातील भागीदार आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियातून ही खेप रवाना होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त उशीर झाला. त्यामुळे वेळेची भरपाई करण्यासाठी आणि माल लवकर पोहोचवण्यासाठी वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला. या गडबडीत ही खेप चुकून हाँगकाँगमार्गे पाठवण्यात आली. ही चूक टाळण्यासाठी डीव्हीएस कंपनीने यूपीएसला आधीच ई-मेल पाठवून निर्बंधांची आठवण करून दिली होती. मात्र, मालवाहतुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नजरेतून हा ई-मेल सुटला. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, डीव्हीएसकडून आलेला ई-मेल एका वेगळ्या संगणकीय प्रणालीवर आला होता, तर प्रत्यक्षात माल हाताळणारे कर्मचारी वेगळी सिस्टीम वापरत होते. सॉफ्टवेअरमधील या तांत्रिक तफावतीमुळे कर्मचाऱ्याला तो चेतावणीचा ई-मेल वेळेवर दिसलाच नाही आणि अमेरिकेचे संवेदनशील संरक्षण तंत्रज्ञान थेट चीनच्या हातात गेले.

रडारला चकवा देणारे तंत्रज्ञान उघड होण्याचा धोका

F-35 हे केवळ साधेसुधे लढाऊ विमान नसून जगातील सर्वात अत्याधुनिक ‘स्टेल्थ फायटर जेट’ आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा संरक्षण प्रकल्प मानला जातो. या विमानाचे प्रगत तंत्रज्ञान हस्तगत करण्यासाठी चीन अनेक वर्षांपासून हेरगिरीचे प्रयत्न करत आहे. त्यामुळेच या विमानाचे संवेदनशील भाग हाँगकाँग-चीनमध्ये पोहोचल्याने अमेरिकन संरक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. चीनपर्यंत पोहोचलेल्या F-35 च्या भागांवर रडारच्या लहरी शोषून घेणारा विशेष थराचे आवरण होते. या आवरणामुळे शत्रूच्या रडार यंत्रणांना विमानाचा मागोवा घेणे कठीण होते. F-35 विमानाच्या स्टेल्थ म्हणजेच रडारपासून लपून राहण्याच्या क्षमतेमध्ये या तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे. मे महिन्याच्या अखेरीस F-35 विमानाचे हे भाग दुरुस्ती करण्यासाठी किंवा वापरातून काढून टाकण्यासाठी अमेरिकेत परत पाठवले जात होते. मात्र, वाहतुकीदरम्यान झालेल्या चुकीमुळे हे भाग नियोजित मार्गाऐवजी हाँगकाँगमध्ये पोहोचले.

“चीनमध्ये नक्कीच जल्लोष झाला असेल”

यादरम्यान ही संवेदनशील खेप चुकून चीनमध्ये पोहोचल्यानंतर अमेरिकन संरक्षण तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली. F-35 लढाऊ विमान प्रकल्पाच्या देखरेखीचे काम पाहणाऱ्या डायना मॉरर यांनी ब्लूमबर्गशी बोलताना म्हणाल्या की, इतक्या प्रगत विमानाचे काचेचे आवरण चीनच्या हातात जाणे ही अमेरिकेसाठी अजिबात चांगली बाब नाही. ही एक फार मोठी आणि गंभीर चूक आहे. लढाऊ विमानाचे हे संवेदनशील भाग हाती लागताच चीनने आधी नक्कीच आनंदोत्सव साजरा केला असेल. त्यानंतर हे तंत्रज्ञान नेमके कसे बनवले आहे हे समजून घेण्यासाठी चिनी वैज्ञानिक तात्काळ कामाला लागले असतील यात कोणतीही शंका नाही. यादरम्यान चीनकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच त्यांनी अमेरिकेच्या प्रगत लढाऊ विमानाचे भाग आपल्या देशात पोहोचल्याची अधिकृत पुष्टीही केली नाही.

हा चीनचा आधीच ठरवलेला कट होता का?

F-35 लढाऊ विमानाचे महत्त्वाचे भाग चीनमध्ये पोहोचल्याचे उघड झाल्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून स्वतःचा बचाव करताना ते सुटे भाग आधीच खराब झालेले आणि वापरात नसलेले होते, असा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. या मोठ्या चुकीमुळे अमेरिकेच्या संसदेतही मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षाचे प्रमुख खासदार मार्क वॉर्नर यांनी यावर ट्रम्प प्रशासनाकडे खुलासा मागितला आहे, तर समितीचे अध्यक्ष टॉम कॉटन यांनी लष्कराच्या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेची नव्याने तपासणी करण्याची मागणी केली आहे. हे महत्त्वाचे सामान वाटेतूनच पळवण्यासाठी चीनने आधीपासूनच काही प्लॅन केला होता का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेनंतर संरक्षण विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाने एकत्र मिळून चौकशी सुरू केली आहे. याबाबत संरक्षण विभागाने सांगितले की, चीनकडे गेलेले ते भाग परत मिळवण्यासाठी आणि ही चूक कशी घडली हे शोधण्यासाठी आम्ही काम करत आहोत. यापुढे अशा गंभीर चुका पुन्हा होऊ नये म्हणून एक विशेष पथकाची स्थापना केली जाईल. दुसरीकडे-F-35 लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कंपनीने आम्ही वाहतुकीचे निर्णय एकतर्फी घेत नाही, असे म्हणत या प्रकरणातून हात झटकले आहे. या संपूर्ण घटनेवर नव्याने काहीही सांगण्यास कंपनीने नकार दिला आहे.