US Fed Rate Hike Impact: अमेरिकेच्या युएस फेडरल रिझर्व्हने २०२३ नंतर प्रथमच महागाई रोखण्यासाठी अखेर पाव टक्क्यांनी व्याजदर वाढ केली आहे. बुधवारी झालेल्या दोन दिवसाच्या चर्चेनंतर व्याजदरात वाढ करून बेंचमार्क इंटरेस्ट रेट पाव टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेसारख्या देशात महागाई वाढ दोन टक्क्यांपेक्षा जास्त असणे हेसुद्धा संकट मानले जाते, तिथे सध्या महागाई दर ३.४ % इतका आहे. या निर्णयाचा थेट फटका भारतीय शेअर बाजार, परदेशी गुंतवणूक (FII) आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्याला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मध्य पूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेली तेल टंचाई, अमेरिकन सरकारने अन्य देशांशी व्यापार करण्यावर आणलेले निर्बंध या सगळ्यामुळे अमेरिकेत महागाई वाढली आहे. डिसेंबर नंतर महागाईचा फटका असाच बसत राहिला तर पाव टक्क्याची अधिक व्याजदरवाढ करावी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे
अमेरिकेतील महागाई आणि निफ्टी
भारतीय शेअर बाजार परदेशातून विशेषतः अमेरिकेतून येणाऱ्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणुकीचा ओघ सुरूच असला तरीही जोपर्यंत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर (FII ) मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवत नाहीत, तोपर्यंत भारताचे शेअरबाजार वर जाणार नाही. अमेरिकेतील व्याजदरवाढीनंतर हे अधिक प्रकर्षाने जाणवायला लागेल.

हे कसे ते पुढील कोष्टकाच्या सहाय्याने समजून घेऊया
अमेरिकन व्याजदरात वाढ > अमेरिकेच्या बॉण्ड यील्ड मध्ये वाढ > अमेरिकेतील गुंतवणूक अधिक आकर्षक >
अमेरिकन गुंतवणूकदार परदेशात गुंतवण्यापेक्षा परदेशातून पैसा काढण्याला प्रोत्साहन देतील > भारतीय शेअर बाजारातून शेअर्स विकून पैसे माघारी नेले जातील.
शेअर बाजारात पहिला प्रभाव दिसेल तो निफ्टी आणि सेन्सेक्स मधल्या लार्ज कॅप कंपन्यांवर, गेल्या दोन आठवड्यापासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात जोरदार विक्री करून जवळपास १४४०० कोटी रुपये काढून घेतले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या एफसीएनआर च्या माध्यमातून आलेल्या गुंतवणुकीचा प्रभाव अगदीच फिका पडला आहे.
व्याजदर आणि डॉलर रुपयाचे गणित
गेल्या वर्षभरापासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत सतत पडत होती व त्यात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या सपाट्यामुळे डॉलरचा साठाही कमी झाला होता यावर उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेने मागच्या महिन्यात या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत प्रचंड प्रमाणात डॉलर भारतात आणण्याचे ध्येय साध्य केले. आता त्याचे दृश्य परिणाम दिसायला सुरुवात होण्याआधीच व्याजदर वाढीमुळे पुन्हा एकदा डॉलरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. व्याजदर वाढीमुळे अमेरिकेत गुंतवणूक करणे लाभदायक आहे असे वाटणारे गुंतवणूकदार भारतातून जेव्हा शेअर्स विक्री करून ते परदेशात पाठवतील तेव्हा आपोआपच डॉलर बलवान होण्यास सुरुवात होईल आणि त्यामुळे रुपये रुपयाची किंमत पुन्हा घसरेल. डॉलर महाग झाला तर आपोआपच आयातीवरचा खर्च वाढेल, त्याचप्रमाणे क्रूड ऑइल आधीच महाग झालेले असल्यामुळे त्याचाही दबाव वाढणार आहे.
रिझर्व्ह बँकेची भूमिका काय ?
भारतात सध्या तरी महागाई दर नियंत्रणात असला तरीही वाढत्या इंधन दरांमुळे त्यात पुढच्या तीन महिन्यात वाढ झालेली दिसली तर रिझर्व बँकेला व्याजदरात वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या स्थितीत गृह कर्ज, वाहन कर्ज महाग झाल्याने बँकांचे प्रॉफिट मार्जिन थोडेसे कमी होईल असे दिसत आहे. व्याजदर वाढीमुळे पुढील तीन ते सहा महिन्यात भारतात आयात निर्यातीत कशी तूट निर्माण होते व डॉलरचा साठा कसा काय कमी जास्त होतो यावर रिझर्व्ह बँकेचे धोरण ठरेल.
महाग खनिज तेल विकत घेण्याची वेळ येईल?
होर्मुझचे आखात तेलाच्या वाहतुकीसाठी सुरक्षित मानले जात नसल्याने भारताला रशियाकडून होणारा तेलाचा पुरवठा कमी झाला तर नाईलाजाने बाजारभावाने तेल विकत घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यातून रशियाकडून खनिज तेल विकत घेणाऱ्या देशांवर नवीन निर्बंध लादले जातील असे अमेरिकेने म्हटल्यामुळे आता भारताला महाग खनिज तेल विकत घ्यावे लागले, तर त्यामुळे निर्माण होणारा चलनाचा प्रश्न कसा सोडवायचा, हे नवे आव्हान रिझर्व्ह बँकेपुढे आहे.
पॅनिक नाही, सावध रहा !
अमेरिकेतील महागाई एकाच दिवसात पुढे आलेली नाही. ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी बेभरवशाचे व्यापार करार आणि आयात निर्यातीवरील निर्बंध जारी केले तेव्हाच (म्हणजे वर्षभरापासून) महागाई हळूहळू वाढेल हा धोका व्यक्त केला जात होता. शेअर बाजारांसाठी ही बातमी ‘अचानक’ आलेली असली तरीही त्यात कोणताही ‘धक्का’ नसून व्याजदरवाढ होणारच होती… ती आज झाली इतकेच आहे. याला शेअर मार्केटच्या भाषेत ‘मार्केट डिस्काउंट एव्हरीथिंग’ म्हणजेच ‘बाजार सगळे धक्के पचवतो’ असे म्हणतात.
बँका, वित्त संस्था व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना फटका?
अमेरिकन व्याजदर वाढ म्हणजे भारतीय शेअर बाजार कायमच घसरणार असे गृहीत धरू नका. व्याजदर वाढ झाल्यावर भारतीय शेअर बाजार घसरतील असे सरसकट विधान करता येत नाही. आज पण १७ सप्टेंबर रोजी ‘सरप्राईज एलिमेंट’ कायम ठेवत निफ्टी पॉझिटिव्ह बंद झाला आहे! मात्र आठवड्याभरात परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा सुरू झाला की कोणते शेअर्स जास्त घसरतात ? याचा अंदाज येऊ लागेल. व्याजदर वाढीचा धोका बँका, वित्त संस्था व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना अधिक बसणार आहे. त्यामुळे सरसकट सगळ्याच शेअर बाजारातील कंपन्या या व्याजदरातील वाढीमुळे संकटात सापडतील असे अजिबात समजू नये. आपण ज्या कंपनीचा शेअर विकत घेत आहोत त्याचा नेमका या घटनेशी काय संबंध आहे हे विचारात घेणे महत्त्वाचे ठरेल.
