US Iran Ceasefire 5 Important Points: अमेरिका व इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करार झाला आहे. बुधवारी (८ एप्रिल) सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तशी घोषणा केली. त्यामुळे पश्चिम आशियातील युद्धापासून जगाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अमेरिका व इराणमध्ये सामंजस्य होण्यात अनेक अडथळे येऊ शकतात. शस्त्रसंधीने ठोस असे काही साध्य होणार नाही, युद्धात दोन्ही देशांनी थोडा विराम घेतल्याचेच दिसून येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिका व इराणमध्ये शस्त्रसंधी करार झाला असला तरी दोन्ही देशांचा पुढील मार्ग खडतर आहे.

काही तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या मागील काही राष्ट्राध्यक्षांना जे जमले नाही ते डोनाल्ड ट्रम्प यांनी करून दाखवले. इराणबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला सखोल चर्चेसाठी तयार केले आहे. अमेरिकेबरोबर दीर्घकाळापासून सुरू असलेला संघर्ष मिटवण्याची तयारी इराणकडूनही दर्शवण्यात आली आहे. इराणची अर्थव्यवस्था मोडकळीस निघाल्याने इराणलाही अमेरिकेबरोबर संघर्ष थांबवायचा आहे.

अमेरिका व इराणमधील शस्त्रसंधी करार म्हणजे फक्त युद्धापासून घेतलेली एक अल्प विश्रांती ठरेल. अमेरिका व इराणमध्ये १९७९ पासून वाद सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील वाद दोन आठवड्यात सुटण्याची शक्यता कमी आहे, असे आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित अभ्यासकांचे म्हणणे आहे. पाकिस्तान मधील इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांचे शिष्टमंडळ शुक्रवारी चर्चा करणार आहे. अमेरिकेच्या १५ कलमी कार्यक्रमावर तर इराणच्या दहा कलमी कार्यक्रमावर दोन्ही देश चर्चा करणार आहेत. इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होईल की नव्याने युद्धाची ठिणगी पडेल, हे पाच महत्वाच्या मुद्द्यांवर अवलंबून असणार आहे. ते मुद्दे कोणते? सविस्तर जाणून घेऊयात.

१) इराणचा अणुकार्यक्रम आणि क्षेपणास्त्र निर्मिती

अमेरिकेचा इराणच्या अणुकार्यक्रमावर आक्षेप आहे. इराण अण्वस्त्र तयार करत असल्याचा संशय अमेरिकेला आहे. त्यामुळे इराणने अणुकार्यक्रम पूर्णपणे थांबवावा तसेच अण्वस्त्र तयार करण्याशी संबंधित सुविधांना नष्ट करावे, अशी अमेरिकेची मुख्य मागणी आहे. तर दुसरीकडे इराण अणुकार्यक्रम थांबवण्यासाठी तयार नाही. शांतता प्रस्थापित करण्यासाठी अणुकार्यक्रम हाती घेण्यात आला असून इराणचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशी इराणची भूमिका आहे. दरम्यान, अमेरिका व इराणमध्ये या मुद्द्यावर तोडगा निघत असल्याची माहिती आहे.

इराणकडून उत्पादन केल्या जाणाऱ्या बॅलेस्टिक मिसाइलवर देखील अमेरिकेला आक्षेप आहे. इराणने क्षेपणास्त्र बनवणे थांबवावे, अशी मागणी अमेरिकेची आहे. इराणकडे सक्षम अशी वायू सेना नाही. त्यामुळे इराण क्षेपणास्त्र व ड्रोन्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती करतो. इराणकडून तयार केले जाणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हे सर्वात मोठा धोका असल्याचे अमेरिका व आखातातील देशांचे म्हणणे आहे.

२) होर्मुझ सामुद्रधुनी

युद्ध सुरू होण्याआधी होर्मुझ सामुद्रधुनी जशी खुली होती, तशीच आता खुली करावी, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करताना “होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षित खुली करावी” अशी मागणी केली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना इराणच्या सशस्त्र सेनेशी ताळमेळ ठेवावा लागेल, अशी अट इराणने ठेवली आहे. इराणकडून सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना दोन दशलक्ष डॉलरचा टोल आकारला जात असल्याची माहिती आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणला कायमस्वरूपी नियंत्रण हवे आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीवरून इराण व अमेरिकेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील एकूण २० ते २५ टक्के कच्चे तेल व नैसर्गिक वायूची वाहतूक केली जाते.

३) इराणवरील आर्थिक निर्बंध

अमेरिकेने लादलेले प्राथमिक व दुय्यम आर्थिक निर्बंध रद्द करावेत, अशी मागणी इराणने केली आहे. इराणवर अमेरिकेने मागील चार दशकांपासून आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्याचा विपरित परिणाम इराणच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. निर्बंध हटवल्यास पुढील वाटाघाटी करता येईल, असे इराणने म्हटले आहे. इराणवरील आर्थिक निर्बंध हटवल्यास इराण अमेरिकेच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी तयार होईल. दरम्यान, आर्थिक निर्बंध हटवण्याच्या बदल्यात अमेरिका इराणमध्ये तेल उत्पादन करण्याचा अधिकार मागू शकते. त्यामुळे या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये सामंजस्य होणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे.

४) इराणकडून हमास, हुथी, हेजबोल्लाला दिले जाणारे समर्थन

इराणकडून हमास, हुथी, हेजबोल्ला या दहशतवादी संघटनांना समर्थन दिले जाते, असा आरोप अमेरिका व इस्रायलकडून वारंवार केला जातो. या दहशतवाद्यांना खतपाणी घालण्याचे काम इराण करतो, असा आरोप इराणवर आहे. इराणने हमास, हुथी आणि हेजबोल्ला या संघटनांना आर्थिक तसेच लष्करी मदत बंद करावी, अशी मागणी अमेरिका करणार आहे. तर इराणकडून या संघटनांच्या माध्यमातून आखातात प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

इराणने अमेरिकेसमोर ठेवलेल्या दहा मागण्यांमध्ये हेजबोल्ला व इतर संघटनांवर अमेरिका व इस्रायलने हल्ले थांबवावेत, अशी मागणी केली आहे. हल्ले थांबल्यावरच शांतता प्रस्थापित होईल, अशी अट इराणने ठेवली आहे. दरम्यान, इस्रायलने हेजबोल्लावरील हल्ले थांबणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरूनही दोन्ही देशांत सामंजस्य होणे अवघड मानले जात आहे.

५) आखातात असलेली सुरक्षा रचना

आखाती देशांमध्ये अमेरिकेचे सैन्य मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आखाती देशांमधून अमेरिकेच्या सैन्याने बाहेर पडावे, १९९१ पासून अमेरिकेने आखातात उभारलेल्या लष्करी पायाभूत सुविधा नष्ट कराव्यात अशी मागणी इराणने केली आहे. तर आखातातील मित्र देश व इस्रायलच्या संरक्षणसाठी अमेरिकी सैन्य आखातात असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेचे सैन्य आखातातून बाहेर पडल्यास इराण अन्य देशांवर प्रभुत्व निर्माण करेल असा अमेरिकेचा युक्तिवाद आहे. या मुद्द्यावर काय तोडगा निघतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, अमेरिकेकडून हल्ला झाल्यास इराण पुन्हा प्रत्युत्तर देण्यास संकोच करणार नाही, असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी दिला आहे.