सहा आठवड्यांचा कालावधी लोटला तरीही अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात पेटलेल्या युद्धाची धग अद्यापही कायम आहे. या तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी खनिज तेलाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी जगभरातील अनेक देशांत इंधनासह नैसर्गिक वायूचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. इराणशी सातत्याने ठेवलेल्या संपर्कामुळे भारताला या महत्वाच्या जलमार्गावरून आपल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यात काही प्रमाणात यश आले आहे. तरीदेखील भारताची अनेक जहाजे या सामुद्रधुनीत अडकून पडल्याचे सांगितले जात आहे. त्याविषयीचा हा आढावा…
होर्मुझ सामुद्रधुनी किती महत्वाची?
होर्मुझ सामुद्रधुनीतून आपल्या व्यापारी जहाजांची वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात यशस्वी झालेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडणारा हा जलमार्ग जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम आशियातील युद्धाआधी या जलमार्गातून जगभरातील अनेक देशांना नैसर्गिक वायूसह खनिज तेलाचा नियमित पुरवठा केला जात होता. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत या जलमार्गावर व्यापारी जहाजे अडकून पडल्याने अनेक देशांवर इंधन टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. भारताला मात्र होर्मुझ सामुद्रधुनीतून आपल्या जहाजांचा मार्ग मोकळा ठेवण्यात काही प्रमाणात यश आले आहे. भारताव्यतिरिक्त चीन, रशिया, मलेशिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनीही आपापली मालवाहू जहाजे या जलमार्गातून बाहेर काढली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये ग्रीस, तुर्की आणि जपानशी संबंधित काही जहाजांनीदेखील या सामुद्रधुनीतून प्रवास केल्याचे वृत्त आहे.
होर्मुझमध्ये भारताची किती जहाजे अडकली?
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, अमेरिका-इस्रायल आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांव्यतिरिक्त इतर देशातील मालवाहू जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची मुभा आहे. चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान यांसारख्या देशांसाठी हा मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. मार्चच्या सुरुवातीला भारताची तब्बल २४ मालवाहू जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली होती. आता मात्र ही संख्या १६ वर आल्याचे सांगितले जात आहे. नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या भारताच्या सात जहाजांनी युद्धाच्या काळात सामुद्रधुनी यशस्वीरित्या ओलांडल्याचे समोर आले आहे. रविवार दुपारपर्यंत भारताचा ध्वज असलेले ‘ग्रीन आशा’ हे आठवे व्यापारी जहाज या जोखमीच्या सागरी मार्गातून यशस्वीरित्या मार्गस्थ झाले आहे. सुमारे २०,००० टन एलपीजी घेऊन जाणारे हे जहाज ‘एमओएल इंडिया’ या कंपनीच्या मालकीचे आहे.
आणखी वाचा : “भारतात गेलो तरी आम्ही मरणारच आहोत”, दुबई सोडण्यास भारतीयांनी का नकार दिला?
भारतीय जहाजांनी सामु्द्रधुनी कशी पार केली?
अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर भारताच्या शिवालिक आणि नंदा देवी या दोन व्यापारी जहाजांनी १३-१४ मार्च दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी पार केली. या दोन्ही जहाजांनी मिळून सुमारे ९२,७०० टन नैसर्गिक वायू भारतात आणला होता. त्यानंतर २३ मार्च रोजी जग वसंत आणि पाईन गॅस या दोन जहाजांनी हा महत्वाचा जलमार्ग पार केला आणि तब्बल ९२,००० टन इंधन भारतात आणले. २८ मार्च रोजी आणखी दोन जहाजांनी होर्मुझ सामु्द्रधुनी पार करून सुमारे ९४,००० टन नैसर्गिक वायूचा साठा भारतात आणला. ३ एप्रिल रोजी ग्रीन सान्वी नामक जहाज सुमारे ४६,६५० टन नैसर्गिक वायू घेऊन भारताकडे रवाना झाले. मात्र, ते कोणत्या बंदरात पोहोचणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. हे जहाजही मॉल इंडिया या कंपनीच्या मालकीचे आहे. होर्मुझची सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाल्यास त्याचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होतो. भारतात खनिज तेलाची ४० टक्के आणि एलपीजीची ९० टक्के आयात याच जलमार्गावरून होते. त्यामुळे युद्धाच्या परिस्थितीतही इराणशी समन्वय साधून जहाजे सुरक्षितपणे आणणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मोठे यश मानले जात आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे किती नियंत्रण?
इराण हा होर्मुझच्या सामुद्रधुनीला लागून असलेला किनारी देश असल्याने या अत्यंत महत्त्वाच्या जागतिक सागरी मार्गावर त्याचे प्रभावी नियंत्रण आहे. भौगोलिकदृष्ट्या ही सामुद्रधुनी अत्यंत अरुंद (केवळ ३३ किमी) आहे, त्यामुळेच इराणच्या सागरी क्षेत्राचा वापर टाळून या भागातून प्रवास करणे कोणत्याही जहाजासाठी अशक्य आहे. या मोक्याच्या स्थानाचा फायदा घेऊन इराणने याआधीही अनेकदा जागतिक शक्तींवर दबाव तंत्राचा वापर केलेला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने परवानगीशिवाय हा जलमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे २० जहाजांवर हल्ले केले आहेत. त्याशिवाय होर्मुझमधून प्रवास करण्यासाठी अनेक जहाजांकडून त्यांनी टोलसारखी वसुली केली आहे.शिप ट्रॅकिंग डेटाच्या (जहाज शोधक माहिती) माहितीनुसार, पश्चिम आशियातील तणावाच्या काळात भारतीय जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील पारंपारिक सरळ मार्गाऐवजी इराणच्या ‘लारक’ आणि ‘केशम’ या समुद्री हद्दीतून प्रवास केला आहे. युद्धाच्या काळात इराणने या मार्गावर एक प्रकारचे ‘चेकपोस्ट’ तयार केले असून ते सागरी वाहतुकीचे नियमन करत आहेत.
हेही वाचा : लखनौमधील मशीद पहाटे तीन वाजताच का पाडण्यात आली? बुलडोझर कारवाईचे कारण काय?
ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा मोहीम काय आहे?
होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेली मालवाहू जहाजे बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय नौदलाने पाचपेक्षा अधिक युद्धनौका तैनात केल्या आहेत. ओमान आणि इराणदरम्यान असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्गदर्शन देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्याद्वारे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा अत्यावश्यक पुरवठा घेऊन भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजांचे संरक्षण केले जात आहे. भारतीय नौदल जहाजांना सुरक्षित मार्गाने नेण्यासाठी बॅकचॅनेल समन्वयाबरोबरच रिअल-टाइम नेव्हिगेशनची मदत करत आहे, जेणेकरून ही जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार करू शकतील. इराणशी केलेल्या यशस्वी राजनैतिक चर्चेमुळेच भारतीय जहाजांना कठीण काळातही या महत्वाच्या जलमार्गातून प्रवास करणे शक्य झाले आहे. यादरम्यान होर्मुझमध्ये अडकलेली भारताची उर्वरित जहाजे मायदेशी कधी परतणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
