US Iran Israel war impact on Pakistan : भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या महागाईचा वणवा पेटला आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारा हा देश दिवाळखोरीच्या छायेत सापडला आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानमधील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच अमेरिका व इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले सुरूच ठेवल्यामुळे या देशासमोर आणखीनच एक मोठे संकट उभे ठाकले आहे. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानमध्ये ‘काटकसर योजना’ राबवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याविषयीचा हा आढावा…

पाकिस्तान सरकारचा निर्णय काय?

परदेशी कर्जांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या पाकिस्तानला नव्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जागतिक बाजारपेठ धोक्यात आली आहे. त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसताना दिसून येत आहे. आधीच अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या या देशाला आता होर्मुझची सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहण्याची भीती सतावत आहे. पाकिस्तानला होणाऱ्या एकूण तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा याच सागरी मार्गावरून येतो. इंधनाची बचत करण्यासाठी व बाजारातील आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी शाहबाज शरीफ सरकारने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावित उपाययोजनांमध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याची सवलत, शाळा आणि महाविद्यालयांसाठी ऑनलाइन शिक्षण यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे.

पाकिस्ताला नेमकी कशाची भीती?

पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात केवळ २५ दिवस पुरेल इतका पेट्रोल-डिझेल साठा, जवळपास १० दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा आणि सुमारे १५ दिवस पुरेल इतका एलपीजी साठा उपलब्ध आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाकिस्तानी सरकारने होर्मुझ सामुद्रधुनीच्या बाहेरून पेट्रोल आणि डिझेल आयात करण्यासाठी दोन निविदा काढल्या आहेत. पेट्रोलच्या किमतींचा दर आठवड्याला आढावा घेण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहे. साठेबाजी करणाऱ्या विक्रेत्यांवर जरब बसविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉनने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.

आणखी वाचा : कॅनडात भारतीय वंशाच्या यूट्यूबरची निर्घृण हत्या; कोण होत्या नॅन्सी ग्रेवाल? भारतीयांना नेमकं कोण लक्ष्य करतंय?

पाकिस्तानला कच्च्या तेलासाठी किती खर्च?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, होर्मुझचा मार्ग बंद असल्याने पाकिस्तानने सौदी अरेबियाला लाल समुद्रातून तेल पुरवठा करण्याची विनंती केली आहे. अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे पाकिस्तानचा तेल वाहतुकीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एका जहाजाचा विमा खर्च ३०,००० डॉलरवरून थेट ४,००,००० डॉलर (सुमारे ३.६६ कोटी रुपये) पर्यंत पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याशिवाय जहाजांचे भाडे ४० लाख डॉलरच्या (सुमारे ३३ कोटी रुपये) पुढे गेले आहे. परिणामी पाकिस्तानमधील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमतीत २५-२६ रुपयांची आणि डिझेलच्या किमतीत ४५-५० रुपयांची वाढ झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलाची वाहतूक पूर्ववत न झाल्यास पुढील १५ दिवसांत पाकिस्तानमध्ये इंधनाच्या किमती आणखीनच भडकण्याची भीती तेथील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी का महत्त्वाची?

अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे सध्या होर्मुझची सामुद्रधुनी चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. इराणने या मार्गावरील काही देशांची वाहतूक बंद केल्याने त्याचा जागतिक स्तरावर मोठा फटका बसत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची सागरी वाहिनी मानली जाते. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या आणि एलपीजी गॅसच्या व्यापारापैकी सुमारे २० टक्के पुरवठा याच मार्गाने होतो. ‘केप्लर’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये दररोज या मार्गाने सुमारे १.३ कोटी बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. हे प्रमाण समुद्रातून होणाऱ्या एकूण जागतिक तेल वाहतुकीच्या ३१ टक्के इतके आहे. पाकिस्तानसाठी हा मार्ग अत्यंत संवेदनशील आहे, कारण त्यांच्या देशातील बहुतांश इंधनाची आयात याच मार्गाने होते. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी पाकिस्तान सरकारने कुवेतबरोबर दीर्घकालीन करार केला आहे. त्यातच होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक ठप्प झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये इंधनाचा प्रचंड तुटवडा भासत आहे.

हेही वाचा : इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेचा पराभव होणार? चिनी प्राध्यापकाच्या भाकिताने खळबळ का उडाली?

पाकिस्तानमध्ये उडाला महागाईचा भडका

फेब्रुवारी २०२६ मध्ये पाकिस्तानचा ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेषतः ग्रामीण भागात महागाईचा दर ७.३% इतका जास्त आहे. त्याआधीच्या महिन्यात हा दर सुमारे ५.८ टक्के इतका होता. पाकिस्तानमध्ये १ मार्च २०२६ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सध्या देशात पेट्रोलचा दर २६६.१७ रुपये प्रति लिटर इतका आहे, तर डिझेल सुमारे २८०.८६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. इंधनाबरोबरच पाकिस्तानमध्ये अन्न आणि शीतपेयांच्या किमतीतही सुमारे ५.८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरगुती गॅस आणि वीज दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. त्यातच परकीय चलनाची टंचाई आणि कर्जाच्या परतफेडीमुळे पाकिस्तानी रुपयाचे मूल्य सतत घसरत आहे. इंधन वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकारने ‘वर्क फ्रॉम होम’ आणि शाळांसाठी ‘ऑनलाइन क्लासेस’ सुरू केले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतील संकटामुळे येत्या काळात पाकिस्तानमध्ये डिझेलच्या दरात ४५-५० रुपयांपर्यंत; तर पेट्रोलमध्ये २५-२६ रुपयांपर्यंत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.