Analysis of US Iran Peace Talks At Islamabad’s Serena Hotel: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि अण्वस्त्र स्पर्धेच्या सावटाखाली आता अमेरिका आणि इराण यांच्यात शांततेचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील आलिशान ‘सेरेना हॉटेल’ या ऐतिहासिक चर्चेचे केंद्र असून, संपूर्ण जगाचे लक्ष या मुत्सद्दी हालचालींकडे लागले आहे.

पश्चिम आशियातील दीर्घकालीन तणाव, परस्पर अविश्वास आणि आण्विक- सामरिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रस्तावित शांतता चर्चेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या उच्चस्तरीय चर्चेसाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि तेथे असलेले ‘सेरेना हॉटेल’ हे केंद्रस्थानी आले आहे. एका बाजूला भव्यता, सुरक्षितता आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण, तर दुसऱ्या बाजूला दशकानुदशके सुरू असलेल्या संघर्षाची गुंतागुंत अशा तिठ्यावर ही बैठक होणार आहे.

सेरेना हॉटेल: मुत्सद्देगिरीचे केंद्र?

इस्लामाबादच्या नॉर्दर्न हिल्सच्या पायथ्याशी सहा एकर हिरव्यागार परिसरात वसलेले सेरेना हॉटेल हे केवळ एक आलिशान पंचतारांकित हॉटेल नाही, तर आंतरराष्ट्रीय राजनैतिक संवादाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरते आहे. ३०० हून अधिक खोल्या, ५२ सुइट्स, सुमारे १,००० जणांची क्षमता असलेला भव्य बॉलरूम, अत्याधुनिक सुविधा आणि राष्ट्रप्रमुखांसाठी खास ‘प्रेसिडेन्शियल सुइट्स’ या सर्वांमुळे हे ठिकाण संवेदनशील चर्चांसाठी आदर्श मानले जाते.

US Iran Peace Talks at Serena Hotel Islamabad | अमेरिका इराण शांतता चर्चा सेरेना हॉटेल | US Iran conflict history and diplomacy | इस्लामाबादमध्ये अमेरिका इराण बैठक आणि पाकिस्तानची मध्यस्थी
सेरेना हॉटेलमध्ये अमेरिका-इराण शांतता चर्चेची जय्यत तयारी (courtesy: Islamabad Serena Hotel/ Facebook)

स्वात व पंजाबी शैलीतील सजावट

२००२ साली उद्घाटन झालेल्या या हॉटेलची रचना पाकिस्तानच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब दाखवणारी आहे. स्वात आणि पंजाबी शैलीतील सजावट, आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक सौंदर्य यामुळे येथे येणाऱ्या जागतिक प्रतिनिधींना एक वेगळाच अनुभव मिळतो. भूकंपप्रवण क्षेत्र लक्षात घेऊन ७.५ रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचे धक्के सहन करण्याची क्षमता या इमारतीत आहे, हीदेखील त्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.

इराण- अमेरिका संघर्षाचा इतिहास

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव समजून घेण्यासाठी इतिहासात डोकावणे आवश्यक आहे. १९७९ साली झालेली ‘इराणी इस्लामिक क्रांती’ हा या संघर्षाचा निर्णायक टप्पा ठरला. या क्रांतीनंतर इराणमध्ये शाहचा पाडाव झाला आणि आयातोल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामिक प्रजासत्ताकाची स्थापना झाली. अमेरिकेने पाठिंबा दिलेल्या शाहच्या पतनामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली.

US Iran Peace Talks at Serena Hotel Islamabad | अमेरिका इराण शांतता चर्चा सेरेना हॉटेल | US Iran conflict history and diplomacy | इस्लामाबादमध्ये अमेरिका इराण बैठक आणि पाकिस्तानची मध्यस्थी
सेरेना हॉटेलमध्ये अमेरिका-इराण शांतता चर्चेची जय्यत तयारी. (courtesy: Islamabad Serena Hotel/ Facebook)

निर्बंधांना सुरुवात

याच काळात तेहरानमधील अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्याच्या घटनेने संबंध अधिकच ताणले गेले. त्यानंतर अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात केली. पुढील काही दशकांत हे निर्बंध अधिक कठोर होत गेले. विशेष म्हणजे इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिकेने अनेकदा आक्षेप घेतले.

अणुकार्यक्रम आणि जागतिक राजकारण

इराणच्या अणुकार्यक्रमामुळे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांमध्ये चिंता वाढली. इराणने हा कार्यक्रम शांततामय ऊर्जानिर्मितीसाठी असल्याचे वारंवार सांगितले, तर अमेरिकेने मात्र या अणू प्रकल्पातून अण्वस्त्र निर्मितीच होणार असा घोशा लावला. २०१५ साली ‘जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन’ (JCPOA) या कराराद्वारे काही प्रमाणात तणाव कमी झाला. या करारानुसार इराणने आपल्या अणुकार्यक्रमावर निर्बंध स्वीकारले, तर अमेरिकेसह इतर देशांनी आर्थिक निर्बंध शिथिल केले.

अमेरिकेची करारातून माघार

मात्र २०१८ मध्ये अमेरिकेने या करारातून माघार घेतली आणि पुन्हा कठोर निर्बंध लादले. त्यानंतर दोन्ही देशांतील संबंध पुन्हा ताणले गेले. पर्शियन गल्फमधील संघर्ष, ड्रोन हल्ले, आणि २०२० मध्ये इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली.

सध्याचा संघर्ष आणि मध्यस्थी

अलीकडे २८ फेब्रुवारीपासून संघर्ष अधिक तीव्र झाला. या संघर्षात प्रादेशिक तणाव, इस्रायलचा सहभाग, आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेचे प्रश्न यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला. दोन आठवड्यांच्या अटींवर आधारित शस्त्रसंधी सध्या झालेली असली, तरी ती अत्यंत नाजूक स्थितीत आहे.

US Iran Peace Talks at Serena Hotel Islamabad | अमेरिका इराण शांतता चर्चा सेरेना हॉटेल | US Iran conflict history and diplomacy | इस्लामाबादमध्ये अमेरिका इराण बैठक आणि पाकिस्तानची मध्यस्थी
सेरेना हॉटेलमध्ये अमेरिका-इराण शांतता चर्चेची जय्यत तयारी. (courtesy: Islamabad Serena Hotel/ Facebook)

पाकिस्तानची मध्यस्थी

याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मध्यस्थ्याची भूमिका स्वीकारत अमेरिका आणि इराण यांच्यात संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लामाबादमध्ये होणाऱ्या या चर्चेत निर्बंध शिथिल करणे, प्रादेशिक सुरक्षा, अणू कार्यक्रम आणि भविष्यातील हल्ल्यांपासून हमी यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

पाकिस्तान: संधी आणि आव्हान

पाकिस्तानसाठी ही मध्यस्थी एक मोठी राजनैतिक संधी आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि परराष्ट्र मंत्री इशाक दर हे या प्रक्रियेत सक्रिय आहेत. सौदी अरेबिया, कॅनडा आणि कुवेत यांसारख्या देशांशी संपर्क साधून या उपक्रमाला पाठिंबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या भूमिकेला काही आव्हानांचाही सामना करावा लागतो आहे. इस्रायलने पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर इराणनेही पूर्वी अशा दाव्यांना नकार दिला होता. याशिवाय, पाकिस्तानच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळेही या प्रयत्नांच्या विश्वासार्हतेसमोर प्रश्नचिन्हच आहे.

सेरेना हॉटेलभोवती कडेकोट सुरक्षा

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व पातळीवर वाढवण्यात आली आहे. सेरेना हॉटेल परिसर पूर्णपणे बंदिस्त करण्यात आला असून, हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतत समन्वय साधत आहेत, जेणेकरून कोणतीही अडचण निर्माण होऊ नये.

शांततेच्या दिशेने एक पाऊल?

इस्लामाबादमधील सेरेना हॉटेल आता केवळ एक आलिशान वास्तू नसून जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहे. दशकानुदशके सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा शांततेकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. मात्र इतिहास पाहता, या मार्गात अडथळेही तितकेच मोठे आहेत. या चर्चेतून तात्पुरत्या शस्त्रसंधीचे दीर्घकालीन शांतता करारात रूपांतर होईल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. जगभरातील राजनैतिक वर्तुळांचे लक्ष सध्या इस्लामाबादकडे लागले आहे आणि त्या भव्य सेरेना हॉटेलकडेही!