US Iran War Latest News in Marathi : अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्धाचा वणवा पेटणार की युद्धविराम कायम राहणार, असा प्रश्न सध्या संपूर्ण जगाला सतावत आहे. पश्चिम आशियातील रक्तरंजित संघर्षानंतर ८ एप्रिल २०२६ रोजी दोन्ही देशांनी १५ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली होती. येत्या २२ एप्रिल रोजी हा करार संपुष्टात येणार असल्याने पुढील काही तास अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाकिस्तानमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेली प्रत्यक्ष चर्चा निष्फळ ठरली होती. यादरम्यान अमेरिकेने पश्चिम आशियात ५० हजार सैनिकांचा फौजफाटा तैनात केल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याविषयीचा हा आढावा…

अमेरिकेकडून लष्कराची मोठी जमवाजमव

२२ एप्रिल रोजी अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम संपत असतानाच अमेरिकेने पश्चिम आशियात आपल्या लष्करी उपस्थितीत मोठी वाढ केल्याचे दिसून येत आहे. ८ एप्रिल रोजी युद्धविराम सुरू झाल्यापासून अमेरिकेने या भागात आपले सैन्यबळ वाढवले असून, यामुळे शांतता प्रक्रियेवर संशयाचे ढग दाटले आहेत. ‘वॉल स्ट्रीट जर्नल आणि लाईव्ह नाऊ फॉक्स’च्या वृत्तानुसार, अमेरिकेने पश्चिम आशियात ५०,००० हून अधिक सैन्याचा फौजफाटा तैनात केला आहे, त्यामध्ये जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांचाही समावेश आहे. अमेरिकेने युद्धविरामाच्या काळात इतकी मोठी लष्करी हालचाल करणे हे इराणसाठी एक प्रकारचे दडपण मानले जात आहे.

पाकिस्तान-तुर्कीयेकडून मध्यस्थीचे प्रयत्न

अमेरिका आणि इराण यांच्यात कायमस्वरूपी युद्धविराम घडवून आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानचे लष्करप्रमुख तथा फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह इराणचा दौरा केला. या भेटीनंतर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “असीम मुनीर यांचे स्वागत करताना आनंद झाला… पाकिस्तानने संवादासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार… दोन्ही देशांमधील संबंध मजबूत असून, प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्याची आमची बांधिलकी कायम आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. एकीकडे मुनीर इराण दौऱ्यावर असतानाच त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कीयेचा चार दिवसांचा दौरा केला. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता प्रक्रियेला मुस्लीम देशांकडून पाठिंबा मिळवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते.

आणखी वाचा : अमीर हमजाचा खेळ खल्लास? पाकिस्तानमध्ये घबराट… भारताच्या कट्टर शत्रूंना कोण संपवतंय?

तुर्कीयेचा अमेरिका-इराणला मोलाचा सल्ला

तुर्कीयेचे अध्यक्ष तय्यप एर्दोगान यांनी बुधवारी संसदेत बोलताना सांगितले की, तुर्की हा अमेरिका, इराण आणि मध्यस्थ पाकिस्तानच्या सतत संपर्कात आहे. अण्वस्त्र कार्यक्रम आणि होर्मुझची सामुद्रधुनी या मुद्द्यांवरून दोन्ही देशांतील चर्चेत अडथळे आल्याचे त्यांनी मान्य केले. मिळालेली संधी वाया घालवू नका. आवळलेल्या मुठींनी कधीही चर्चा यशस्वी होऊ शकत नाही, असा सल्लाही त्यांनी अमेरिका आणि इराणला दिला. या आठवड्यात तुर्कीयेच्या अंतल्या शहरात पाकिस्तान, सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कीयेच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान शाहबाज शरीफ हेदेखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. २२ एप्रिलपूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये समन्वय घडवून आणणे, या बैठकीमागचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

इराण युद्धात चीनची भूमिकाही महत्त्वाची

अमेरिका आणि इराणमधील युद्धात चीनही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. युद्धविराम आणि शांतता चर्चेचा वेग कायम ठेवण्यास चीन प्रयत्नशील असल्याचा दावा केला जात आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी याच आठवड्यात इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी युद्धविराम आणि शांतता प्रक्रियेला चीनचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. अराघची यांनीही तणाव कमी करण्यासाठी चीनच्या प्रयत्नांचे आभार मानले आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने सकारात्मक भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यादरम्यान चीन इराणला लष्करी मदत पुरवण्याचा विचार करत असल्याचे वृत्त असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर एक मोठा दावा केला. चीनने इराणला शस्त्रपुरवठा न करण्यास सहमती दर्शवली असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. चीनसाठी होर्मुझची सामुद्रधुनी कायमस्वरूपी खुली केली जाणार, असे आश्वासनही त्यांनी दिले.

इस्रायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांची शस्त्रसंधी

अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटीची चर्चा सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात १० दिवसांची शस्त्रसंधी झाल्याची घोषणा गुरुवारी केली. लेबनॉनमध्ये इस्रायल आणि इराण समर्थित हेझबोला या दहशतवादी गटात महिनाभरापेक्षा जास्त काळ संघर्ष सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि लेबनॉनचे अध्यक्ष जोफे औन यांच्याशी उत्तम चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केले. उच्चस्तरीय बैठकीसाठी ट्रम्प यांनी या दोन्ही देशांच्या प्रमुखांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले आहे. या शस्त्रसंधीनंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : चीनसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी कायमस्वरूपी खुली करणार; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, नेमकी रणनीति काय?

डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका काय?

पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेली वाटाघाटीची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिका व इराणने एकमेकांना पुन्हा इशारे देण्यास सुरुवात केली आहे. सध्या तणाव कायम असला तरी या संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील कारवाई तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासांतच सूचक विधान केले. पश्चिम आशियातील संघर्षाला कायमस्वरूपी खिळ लावण्याचे संकेत त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले. ट्रम्प यांच्या या विधानामुळे शांतता कराराच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरीही त्याबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत त्याबाबतचा अंदाज बांधणे कठीण आहे. सध्या लागू असलेला १५ दिवसांचा युद्धविराम संपल्यानंतरही दोन्ही बाजूंच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या नाहीत, तर अमेरिकेची प्रचंड लष्करी जमवाजमव एका मोठ्या युद्धाची नांदी ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे, त्यामुळे पश्चिम आशियातील या घडामोडींकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे.