इराण युद्धासाठी अमेरिकेने गेल्या आठ महिन्यांमध्ये ४७ अब्ज डॉलर खर्च केल्याची माहिती पेंटागॉनने दिली आहे. हा सर्व पैसा अर्थातच अमेरिकी करदात्यांच्या खिशातून गेला आहे. इतके खर्चिक युद्ध करून अमेरिकने नेमके काय मिळवत आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
इराण युद्धावर किती आणि कसा खर्च?
पेंटागॉनने गेल्या आठवड्यात इराण युद्धावर झालेल्या खर्चाची माहिती दिली. त्यानुसार, १६ ऑक्टोबरपर्यंत इराण युद्धासाठी आतापर्यंत ४७.१ अब्ज डॉलर इतका मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. इराण युद्धासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी ९७.५ टक्के यशस्वीपणे वापरला असे पेंटागॉनने सांगितले. गणित मांडल्यास या युद्धासाठी ट्रम्प यांनी आतापर्यंत ४८ अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम मंजूर केल्याचे दिसते.
खर्चाची विभागणी कशी झाली?
अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, यात प्रत्यक्ष युद्धखर्चाचा समावेश आहे. त्याबरोबरच आतापर्यंत वापरेला दारूगोळा आणि अन्य लष्करी सामग्री पुन्हा भरण्यासाठी संभाव्य खर्च २९ अब्ज डॉलर इतका आहे. त्याचाही युद्धखर्चात समावेश करण्यात आला आहे. मात्र, यात नुकसान झालेल्या लष्करी तळांच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च आणि इंधन खर्च समाविष्ट नाही. २८ फेब्रुवारीला युद्धाला सुरुवात झाल्यापासून अमेरिकी हवाई दलाने लढाऊ विमाने आणि बॉम्बवाहू विमानांवर ७.६ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. अमेरिकी नौदलाने तैनात केलेल्या जवळपास २५ युद्धनौता आणि विमानवाहू नौकांसाठी १.५ अब्ज डॉलर निधीची गरज पडली. तर लष्कराला पश्चिम आशियातील सैन्य तैनातीसाठी २.१ अब्ज डॉलर इतके खर्च करावे लागले. लष्कराच्या ‘सेंट्रल कमांड’ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियात ५० हजारांपेक्षा अधिक अमेरिकी सैनिक आहेत. त्यामध्ये मोठे कायमस्वरूपी तळ आणि लहान तात्पुरत्या तळांचा समावेश आहे. याबरोबरच नुकसान झालेली लढाऊ विमाने आणि युद्धसामग्री बदलण्यासाठी ६.१ अब्ज डॉलर खर्च आला आहे. त्याशिवाय वाहतूक, रसद, वैद्यकीय मदत यासारख्या बाबीही अमेरिकेसाठी खर्चिक ठरल्या आहेत.
अमेरिकेची जीवितहानी किती झाली?
इराणविरोधातील युद्धात अमेरिकेचे १८ सैनिक कामी आल्याचे पेंटागॉनने जाहीरपणे मान्य केले आहे. पण द वॉशिंग्टन पोस्ट या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने अमेरिकी अधिकाऱ्यांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीच्या आधारे जे वृत्त प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार हा आकडा कमीत कमी २२ असू शकतो. त्याशिवाय ‘पेंटागॉन डिफेन्स कॅज्युल्टी ॲनालिसिस सिस्टीम’च्या आकडेवारीनुसार, ८६५ सैनिक जखमी झाले आहेत.
खर्चाचा हा आकडा अंतिम आहे का?
नाही. हा खर्चाचा अंतिम आकडा नाही. जॉन फिलिप्स या ब्रिटिश सल्लागार आणि तज्ज्ञाने अल जझिराला सांगितले की, पेंटागॉनने जाहीर केलेला ४७.१ अब्ज डॉलर ही रक्कम आतापर्यंत आलेल्या खर्चाचा आकडा समजावा, युद्धाचा एकूण खर्च समजू नये. युद्धाचा कोणताही दीर्घकालीन परिणाम साध्य करण्यात अमेरिकेला यश आले नाही तर त्यांना आपला लष्करी दबाव कायम राखण्यासाठी वारंवार खर्च करावा लागू शकतो. त्याच वेळी, आतपर्यंत वापरली गेलेली आपली क्षमता भरून काढण्यासाठीही पुन्हा खर्च कराला लागेल. आधुनिक शस्त्रास्त्रांचे पुन्हा उत्पादन करण्यासाठी औद्योगिक क्षमतेबरोबरच वेळही लागेल. त्याशिवाय या युद्धावर केल्या गेलेल्या खर्चाचा परिणाम इतर संरक्षण खर्चावर होऊ शकतो. फिलिप्स यांच्या मते, सध्या अमेरिकेला खर्च केलेला पैसा, वापरली गेलेली लष्करी क्षमता आणि त्यामुळे निर्माण झालेला आर्थिक व्यत्यय या तीन बाबींचा विचार कराला लागेल.
अमेरिकी जनता आणि राजकीय नेत्यांचे काय म्हणणे आहे?
पेंटागॉनने जाहीर केल्यापेक्षा युद्धाचा प्रत्यक्ष खर्च अधिक आहे, असे डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, डेमोक्रॅटिक पक्षाच्या पाच सेनेटरनी ‘सेंट्रल कमांड’चे प्रमुख ॲडमिरल ब्रॅड कूपर यांना पत्र लिहून युद्धाचा खरा खर्च जाहीर करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी अद्याप यावर थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचवेळी ऐन मध्यावधी निवडणुकीच्या प्रचारात त्यांची लोकप्रियता घटता आहे. युद्धामुळे इंधन महागले आहे. अमेरिकेत शेतकरी आणि लघु उद्योगांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या डिझेलच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्याचा फटका ट्रम्प यांना निवडणुकीत बसण्याचे अंदाज वेगवेगळ्या जनमत चाचण्यांमधून वर्तवले जात आहेत.
व्हेनेझुएलाच्या तेलावर भिस्त?
पेंटागॉनच्या अहवालावर ट्रम्प यांनी मौन बाळगले असले तरी युद्धखर्चाचा मध्यावधी निवडणुकांवर परिणाम होण्याचा अंदाज त्यांनाही आला असावा. त्यामुळेच इराण युद्धात जे गमावले त्यापेक्षा जास्त व्हेनेझुएलात सत्तापालट घडवून कमावले असा प्रचार ते करत आहेत. व्हेनेझुएलाने अमेरिकेला १० लाख बॅरल तेल दिले असून त्यातून अमेरिकेला पुष्कळ फायदा झाल्याचा दावा त्यांनी अलीकडेच पत्रकारांशी बोलताना केला. मध्यावधी निवडणुका संपल्यानंतर इराणवरील हल्ले पुन्हा सुरू करण्याचे त्यांनी अनेकदा सूचित केले आहे. इराण युद्धावर फारसा खर्च होत नसून ते संपवण्याची आपल्याला कोणतीही घाई नाही, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. इराण युद्धापेक्षा व्हेनेझुएलाच्या तेलातून मिळणारी कमाई अधिक असल्याचे ट्रम्प अमेरिकी जनतेला सांगू पाहत असले तरी हा फायदा नेमका किती झाला, याची आकडेवारी त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे त्यांचे हे दावे अमेरिकी जनता कितपत गांभीर्याने घेतले हे काहीच दिवसांत स्पष्ट होईल.
nima.patil@expressindia.com
