इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धात अमेरिकेचे किमान २५ अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याची माहिती पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, हा आकडा त्याहीपेक्षा मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे, ही किंमत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कशी चुकवणार हा प्रश्नच आहे.
हेग्सेथ यांच्या सुनावणीत काय झाले?
फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारल्यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेग्सेथ हे २९ एप्रिल रोजी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या काँग्रेसला सामोरे गेले. त्यांच्यासह जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष (संयुक्त सैन्यदल प्रमुख) जनरल डॅन केन यांनी काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहाच्या ‘आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रश्नोत्तरांचे दीर्घकाळ चाललेले हे सत्र वादळी ठरले. विशेष म्हणजे हेग्सेथ यांनी अमेरिकेसमोरील सर्वात मोठे आव्हान इराणी लष्कराचे नसून देशांतर्गत राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आणि काही रिपब्लिकन पक्षाचेही सदस्य यांचा बेजबाबदार आणि पराभववादी दृष्टिकोन हेच प्रमुख अडथळे असल्याचा दावा केला. थोडक्यात, इराणविरोधातील युद्धामध्ये आपले किंवा प्रशासनाचे काहीही चुकले नाही यावर हेग्सेथ ठाम राहिले.
युद्धाचा खर्च नेमका किती?
इराणविरोधातील युद्धात अमेरिकेला नेमका किती खर्च आला याबाबत अजूनही स्पष्ट माहिती दिली गेलेली नाही. अमेरिकेचे किमान २५ अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याची माहिती पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पण ‘आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’चे सदस्य असलेले आणि हेग्सेथ यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणारे, डेमोक्रॅटिक पक्षाचे रो खन्ना यांच्या मते २५ अब्ज डॉलर हा आकडा खरा नाही. इराणविरोधातील युद्ध काहीच दिवसांत संपेल असा आत्मविश्वास असलेल्या ट्रम्प प्रशासनाने काँग्रेस सदस्यांना पहिल्या दोन दिवसांत ५.६ अब्ज डॉलरचा दारूगोळा वापरल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पहिल्या सहा दिवसांत युद्धाचा खर्च किमान ११.३ अब्ज डॉलरपर्यंत गेल्याचा ट्रम्प प्रशासनाचा अंदाज आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘रॉयटर्स’ला दिली. नंतर मात्र, व्हाइट हाऊसने युद्धासाठी नेमका किती खर्च आला ते जाहीर करण्यास नकार दिला. दोन स्वतंत्र अभ्यासगटांच्या मते हा आकडा २८ अब्ज डॉलर ते ३५ अब्ज डॉलरपर्यंत असू शकतो. युद्ध सुरू करण्यापूर्वी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण विभागासाठीची तरतूद काँग्रेसने मंजुरी दिलेल्या ८३८.५ अब्ज डॉलरवरून वाढवून ती १.५ लाख कोटी डॉलरपर्यंत करण्याची मागणी केली होती. युद्ध सुरू झाल्यानंतर व्हाइट हाऊसने काँग्रेसकडे आणखी २०० अब्ज डॉलर तरतुदीला मंजुरी देण्याची मागणी केली.
कल्याणकारी योजनांना फटका
पेंटॅगॉनने दिलेला २५ अब्ज डॉलर हा आकडा खरा मानला तरी त्यात अमेरिकेचे अन्य कोणत्या योजनांसाठी निधी देता आला असता ते पाहिले तर हे नुकसान किती खोलवर झाले आहे याचा अंदाज येईल. ‘नासा’चे वार्षिक अंदाजपत्रक २५ अब्ज डॉलरइतके आहे. अमेरिकेने ७ ऑक्टोबरनंतर इस्रायलला साधारण इतक्याच रकमेची लष्करी मदत केली. विविध कल्याणकारी योजनांसाठी असलेली यूएसएड बरखास्त होण्यापूर्वी या संस्थेने साधारणपणे इतकाच खर्च केला होता. त्याशिवाय २५ अब्ज डॉलर खर्चून अमेरिकी जनतेच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ओबामाकेअर योजनेच्या अनुदानाचा विस्तार करता आला असता.
अमेरिकी तळांचे प्रचंड नुकसान?
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना पश्चिम आशियातील अमेरिकेच्या तळांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक अमेरिकी अधिकारी आणि युद्धस्थितीची कल्पना असलेल्या व्यक्तींच्या मते, इराणने अलीकडे केलेल्या हल्ल्यांमुळे पर्शियन आखातातील अमेरिकन लष्करी तळ आणि संरक्षण उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान सुरुवातीला सांगण्यात आले होते त्यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे माहितगारांचे म्हणणे आहे. काही अधिकाऱ्यांनी ‘एनबीसी न्यूज’ला दिलेल्या माहितीनुसार, या तळांच्या दुरुस्तीसाठी अब्जावधी डॉलर खर्च येणार आहे.
नुकसानाची व्याप्ती
या हल्ल्यांमध्ये पश्चिम आशियातील किमान सात देशांमधील महत्त्वाच्या अमेरिकी लष्करी तळांचे नुकसान झाले आहे. त्यात साठवणीचे वेअरहाऊस, लष्करी कारवाया जिथून हाताळल्या जातात ते कमांड सेंटर्स, एअरक्राफ्ट हँगर्स आणि उपग्रह दूरसंचारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रणालींचा समावेश आहे. त्याबरोबरच धावपट्ट्या, रडार यंत्रणा आणि काही विमानांचेही नुकसान झाले आहे. लष्करी हालचाली आणि पाळत ठेवण्यासाठी या यंत्रणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एका प्रसंगामध्ये अमेरिकेची अत्यंत शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणा भेदून इराणचे एक जुन्या बनावटीचे एफ-५ लढाऊ विमान आत शिरण्यात आणि हल्ला करण्यात यशस्वी ठरले.
क्षेपणास्त्रांचा प्रचंड वापर
युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने इराणवर लांब पल्ल्याची सुमारे १,१०० ‘स्टेल्थ क्रूझ क्षेपणास्त्रे’ डागली. आता या क्षेपणास्त्रांचा साठा संपल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले आहे. आता अमेरिकेच्या शस्त्रागारात सर्व प्रकारची मिळून साधारण १,१०० क्षेपणास्त्रे शिल्लक आहेत. स्टेल्थ क्रूझबरोबरच अमेरिकी लष्कराने १,००० हून अधिक ‘टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे’ सोडली. अमेरिकी लष्कर सध्या दरवर्षी सुमारे १००-११० क्षेपणास्त्रांची खरेदी करत असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच अमेरिकेने सुमारे १० वर्षांचा साठा दोन महिन्यांच्या कालावधीत संपवला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा अंतर्गत अंदाज आणि काँग्रेसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंटॅगॉनने युद्धामध्ये १,२०० हून अधिक ‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रे वापरली. या प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमता ४० लाख डॉलरपेक्षा अधिक होती. १,००० हून अधिक ‘प्रिसिजन स्ट्राईक’ आणि ‘अॅटकॅम्स’ या जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचाही वापर केला. इतक्या मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे वापरल्यामुळे अमेरिकेचा शस्त्रास्त्रांचा साठा चिंताजनक पातळीपर्यंत कमी झाला आहे.
अमेरिकी लष्करापुढील दीर्घकालीन आव्हान
साठा संपलेल्या ‘स्टेल्थ क्रूझ क्षेपणास्त्रां’चे उत्पादन अमेरिकेने चीनविरुद्ध संभाव्य युद्धासाठी केले होते. इराणविरोधातील युद्धात शस्त्रसाठा अपुरा पडत असल्यामुळे पेंटॅगॉन आता आशिया आणि युरोपमधील आपल्या कमांड सेंटरवरून बॉम्ब, क्षेपणास्त्रे आणि अन्य शस्त्रसामग्री पश्चिम आशियात पाठवत आहे. यामुळे आशिया आणि युरोपात अमेरिकेची शस्त्रसज्जता कमी होऊन रशिया आणि चीनसारख्या प्रतिस्पर्धी देशांविरुद्ध युद्धसज्जता कमी होईल, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. या आव्हानाला ट्रम्प प्रशासन कसे सामोरे जाणार, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी गुलदस्त्यात आहे.
nima.patil@expressindia.com
