Dark Eagle Hypersonic Missile, US Iran war 2026 : अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा संघर्षाचा भडका उडणार की युद्धविराम कायम राहणार, असा प्रश्न सध्या सगळ्या जगाला सतावत आहे. पश्चिम आशियातील या वादावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली होती. त्याची मुदत आज (शुक्रवार) मध्यरात्रीपर्यंत संपणार असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यादरम्यान इराणवर नव्याने हल्ला करण्यासाठी अमेरिकेने ‘डार्क ईगल’ हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बाहेर काढण्याची तयारी केल्याचा दावा जागतिक माध्यमांनी केला आहे. या घडामोडीमुळे जगभरात एकच खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘डार्क ईगल’ क्षेपणास्त्र नेमके काय आहे, ते किती घातक ठरू शकते आणि त्याचा इराण युद्धावर काय परिणाम होणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

अमेरिका-इराणचे एकमेकांना इशारे

अमेरिकन सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) पश्चिम आशियात ‘डार्क ईगल’ ही हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्याची मागणी केल्याची समजते. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या अहवालानुसार, अमेरिकेकडे असलेल्या प्रिसिजन स्ट्राईक मिसाईल्सचा साठा वेगाने कमी होत असल्याने आणि लाँचर्स इराणच्या टप्प्याबाहेर हलवावे लागल्याने ही मागणी करण्यात आली आहे. इराणच्या महत्त्वाच्या क्षेपणास्त्र तळांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्याची युद्धसामग्री पुरेशी नसल्याची चिंता अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ‘एक्सिओस’च्या वृत्तानुसार, इराणमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेकडून अत्यंत शक्तिशाली हल्ल्यांची तयारी केली जात आहे. ही घडामोड अमेरिका-इराण चर्चेत आलेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पार्शियन आखातातील इराणी जहाजांवर नाकेबंदी कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे अमेरिका जोपर्यंत ही नाकेबंदी उठवत नाही, तोपर्यंत आम्ही चर्चेसाठी पुढे येणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.

‘डार्क ईगल’ क्षेपणास्त्र किती घातक?

  • ‘डार्क ईगल’ हे अमेरिकन लष्कराच्या ताफ्यातील लांब पल्ल्याचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. त्याची मारक क्षमता सुमारे २,७७६ किमी (१,७२५ मैल) पेक्षा जास्त असून ते आवाजाच्या वेगापेक्षा पाचपट अधिक वेगाने प्रवास करू शकते.
  • वातावरणाच्या अगदी वरच्या थरातून उड्डाण करून शत्रूच्या रडार यंत्रणेला गुंगारा देण्याची आणि आपला मार्ग बदलण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात असल्याचे सांगितले जाते.
  • अमेरिकेची संरक्षण कंपनी लॉकहीड मार्टिनने (Lockheed Martin) विकसित केलेले हे क्षेपणास्त्र प्रामुख्याने चीन आणि रशियाच्या प्रगत हवाई संरक्षण यंत्रणांना तोंड देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
  • एका अहवालानुसार, या एका क्षेपणास्त्राची किंमत सुमारे १.५ कोटी डॉलर्स असून त्याच्या एका बॅटरीचा खर्च जवळपास २.७ अब्ज डॉलर्स इतका आहे.
  • अत्यंत संवेदनशील आणि शत्रूच्या कडक सुरक्षा यंत्रणेखाली असलेल्या लक्ष्यांवर अचूक मारा करण्यासाठी हे क्षेपणास्त्र पटाईत आहे.
  • रशियाची ‘किंझाल’ ही क्षेपणास्त्र प्रणाली २०१९ पासून वापरात असून त्याची मारक क्षमता सुमारे १,२०० मैल इतकी आहे, तर चीनचे ‘DF-17’ क्षेपणास्त्र सुमारे १,५०० मैलांपर्यंत हल्ला करू शकते.
  • ‘डार्क ईगल’ अजूनही पूर्णपणे सेवेत दाखल झाले नसल्याने त्याच्या तैनातीबाबत आणि कार्यक्षमतेबाबत काही प्रमाणात शंका व्यक्त केली जात आहे.

इराणवर मोठा हल्ला करण्याची तयारी?

  • पश्चिम आशियात ‘डार्क ईगल’ क्षेपणास्त्र तैनात करण्याच्या चर्चेदरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी आणि आर्थिक दबाव आणणे सुरूच ठेवले आहे.
  • इराणने जर अण्वस्त्रे तयार न करण्याच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.
  • ‘एक्सिओस’च्या वृत्तानुसार, इराणवर अल्पकालीन पण सर्वात मोठा लष्करी हल्ला करण्याची योजना अमेरिकेने आखली आहे.
  • या कारवाईमुळे इराण पुन्हा वाटाघाटीच्या चर्चेसाठी तयार होईल आणि अण्वस्त्रांच्या विषयावर अधिकच लवचिक भूमिका घेईल, अशी अपेक्षा ट्रम्प यांना आहे.
  • याशिवाय, इराणबरोबरच्या युद्धात अमेरिकेच्या दोन पर्यायी योजनादेखील विचाराधीन असल्याचे जागतिक माध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे.
  • जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग खुला करून त्यावर ताबा मिळवण्याचे अमेरिकेचा प्रयत्न असल्याचा दावा केला जात आहे.
  • त्याशिवाय इराणकडील उच्च दर्जाच्या समृद्ध युरेनियम साठ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष दलांची मोहीम राबवण्याची तयारीही अमेरिकेने तयारी केल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेसमोरचा कायदेशीर पेच कोणता?

इराणविरोधातील कारवाईदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना वेळेची मर्यादा आहे. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केला होता. त्यानंतर २ मार्च रोजी ट्रम्प यांनी या युद्धाची माहिती अमेरिकन संसदेला दिली. अमेरिकेच्या ‘वॉर पॉवर्स रिझोल्यूशन’ या कायद्यानुसार युद्धाबाबतची माहिती संसदेला दिल्यानंतर ६० दिवसांच्या आत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आपले सैन्य माघारी घ्यावे लागते. आज (शुक्रवारी) ही मुदत संपत असल्याने डोनाल्ड ट्रम्प मोठ्या पेचात सापडल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी संसदेला दिलेल्या माहितीत एक वेगळाच मुद्दा मांडला आहे. त्यांच्या मते, युद्धबंदीच्या काळात संसदेने दिलेली ही मुदत थांबते किंवा स्थगित होते. ७ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या युद्धबंदीमुळे ही वेळ सध्या थांबली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अमेरिकेचा वाढत्या खर्चावर तज्ज्ञांची टीका

‘डार्क ईगल’ क्षेपणास्त्राच्या संभाव्य तैनातीवर संरक्षण तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डिफेन्स प्रायोरिटीजच्या संचालिका जेनिफर कवानाघ यांच्या मते, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने युद्धाबाबतचा आपला दृष्टिकोन गमावला आहे. इराणमुळे अमेरिकेच्या अस्तित्वासाठी कोणताही धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाने इतक्या महागड्या क्षेपणास्त्राचा वापर त्यांच्यावर करू नये. ‘डार्क ईगल’ क्षेपणास्त्राची किंमत सुमारे ४.१ कोटी डॉलर्स (जवळपास ३४० कोटी रुपये) आहे. इराणमधील कोणतेही लक्ष्य इतके महागडे क्षेपणास्त्र वापरण्याइतपत मौल्यवान आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.