Marco Rubio speech : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी मंगळवारी (२ जून) यूएस काँग्रेससमोर पश्चिम आशियातील संघर्ष कोणत्या वळणावर आहे, याबाबत माहिती दिली. अमेरिका व इस्रायल यांनी इराण विरोधात २८ फेब्रुवारीपासून युद्ध सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच मार्को रूबियो यूएस काँग्रेससमोर आले. अमेरिका व इराण यांच्यातील करार लवकरच पूर्ण होईल, तसेच इराण अणुकार्यक्रमावर चर्चेस तयार झाला आहे, असा दावा रूबियोंनी केला. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या चर्चेतून मार्ग निघेलच, याची शाश्वती त्यांनी दिली नाही. रूबियो यांनी त्यांच्या पाच तासांच्या भाषणात अनेक मुद्द्यावर भाष्य केले. बंद झालेली होर्मुझ सामुद्रधुनी, भारताची रशियाकडून होणार कच्चे तेल (इंधन) खरेदी यांबाबत त्यांनी मत मांडले. कॅपिटल हिलवर झालेल्या मार्को रूबियो यांच्या भाषणातील महत्त्वाचे सहा मुद्दे जाणून घेऊयात.
इराणचा अणुकार्यक्रम
इराण अणुकार्यक्रमावर चर्चेसाठी तयार झाला असल्याचे रूबियो म्हणाले. यापूर्वी वाटाघाटीत अणुकार्यक्रमावर चर्चा करण्यास इराण तयार नव्हता. इराणने अणुकार्यक्रम गुंडाळावा व ४४० किलो युरेनियमचा साठा नष्ट करावा, अशी अमेरिकेची मागणी आहे. “इराण त्यांच्या अणुकार्यक्रमावर चर्चा करण्यास तयार झाला आहे. यापूर्वी इराण अणुकार्यक्रमावर चर्चेसाठी तयार नव्हता”, अशी माहिती रूबियो यांनी सिनेटला दिली.
दरम्यान, अमेरिका व इराण यांच्यात होणारा करार हा अमेरिकेतील जनतेला किंवा सिनेटला मान्य होईलच, याची कोणतीही शाश्वती नाही, अशी सावध भूमिका रूबियो यांनी घेतली. करारातून सकारात्मक निकाल समोर येणार नाहीत याचे त्यांनी संकेत दिले आहेत. दोन्ही देशांमध्ये आताही अनेक मुद्द्यांवर कमालीचे मतभेद असल्याचे रूबियो म्हणाले. मध्यस्थांच्या मार्फत अमेरिकेशी कोणतीही चर्चा होणार नाही, असे इराणने रूबियो यांच्या भाषणाच्या एक दिवस आधी म्हटले होते. इस्रायल व लेबनॉन या दोन देशांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने इराण – अमेरिकेमधील चर्चेत अडथळे येत आहेत.
अमेरिकेने इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध
अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था ढासळली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली केल्यास हे निर्बंध हटवले जातील, असे कोणतेही आश्वासन इराणला वाटाघाटीदरम्यान देण्यात आले नाही, असे रूबियो यांनी स्पष्ट केले. इराणने अणुकार्यक्रम थांबवला तरच निर्बंधांबाबत अमेरिका निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेत यावर्षाच्या शेवटी मध्यावधी निवडणुका होणार आहेत. अमेरिकेत गॅस व इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे ट्रम्प हे दबावात येऊन आपल्या मागण्या मान्य करतील, अशी इराणला आशा आहे. तर आपला मुख्य उद्देश बंद झालेली होर्मुझ सामुद्रधुनी नसून इराणचा अणुकार्यक्रम थांबवणे व युरेनियम नष्ट करणे असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून इराण – अमेरिका वाटाघाटीतील चर्चा फसल्याचे दिसून येते.
इस्रायलसोबतच्या संबंधांना तडा ?
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ७० टक्के गाझा ताब्यात घेण्याचे नियोजन केले आहे, यावर अमेरिकेची भूमिका काय अशी विचारणा रूबियो यांना करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, इस्रायल व हमास यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी ट्रम्प यांनी दिलेल्या २० कलमी कार्यक्रमात याबाबत कोणताही उल्लेख नव्हता. आमचे नियोजन वेगळे होते.
रूबियो यांच्या विधानामुळे इस्रायल व अमेरिका यांच्यातील संबंधांना तडा गेल्याचे दिसून येते. अमेरिका व इराण यांच्यात वाटाघाटी सुरू असताना लेबनॉनची राजधानी बैरुतवर इस्रायलने बॉम्बवर्षाव केला होता. त्यामुळे अमेरिका – इराण यांच्यातील चर्चा थांबवी होती. त्यानंतर ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना चांगलेच सुनावले होते. एक्झिओस या वृत्तसंस्थेला एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प नेतान्याहूंना म्हणाले, “तू वेडा आहेस. माझं हित दुखावलं गेलं तर तू तुरूंगात असशील. आता प्रत्येकजण तुझा द्वेष करतोय. तुझ्या कृत्यांमुळे प्रत्येक जण इस्रायलचा द्वेष करतोय.”
चीनची भूमिका
चीनने इराणला कोणतीही मदत केली नसल्याचे रूबियो म्हणाले. इराणकडे चीनची शस्त्रास्त्रे आहेत, परंतु, इराणला ती चीनकडून आधीच मिळाली आहेत. नव्याने इराणला चीनकडून काही मिळाले नाही. त्यामुळे त्याचा परिणाम युद्धभूमीवर झाला नाही, असे रूबियो यांनी स्पष्ट केले.
रशियन तेल खरेदीवरील निर्बंधांमध्ये सूट
रशियन तेल खरेदीसाठी इतर देशांना दिलेली सूट कमी करण्याचे नियोजन असल्याचे रूबियो म्हणाले. जागतिक पुरवठा सुरळीत राहावा यासाठी देशांना रशियन तेल खरेदीसाठी निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. ती आम्ही लवकरच बंद करणार आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, अमेरिकेने आतापर्यंत निर्बंधांमध्ये दिलेली सूट दोनदा पुढे ढकलली आहे. पश्चिम आशियातून गॅस व इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
इराणचे नवे सर्वोच्च नेते
इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी जीवंत असल्याची पुष्टी रूबियो यांनी केली. इराणमधील नेतृत्वाबाबत वाटाघाटीदरम्यान चर्चा होत आहे, असे त्यांनी सांगितले. मोजतबा खामेनी हे सक्रिय असल्याचे काही संकेत मिळत आहेत, असे रूबियो म्हणाले. अयातुल्ला मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत सतत बातम्या येतात. अमेरिका व इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मोजतबा जखमी झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांना एका सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे. मोजतबा हे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या थेट संपर्कात असल्याची माहिती समोर आहे. इराणवर सध्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सचे वर्चस्व आहे.
