Pakistan Role in Trump Iran Conflict : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवरील संभाव्य हल्ले पाच दिवस लांबणीवर टाकण्याची घोषणा सोमवारी केली. अमेरिका आणि इराणमध्ये अतिशय चांगली व सकारात्मक चर्चा झाली आणि त्यातून युद्धावर पूर्ण तोडगा निघेल, असा दावा त्यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये केला. त्यांच्या या दाव्यामुळे अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यात पेटलेली युद्धाची धग लवकरच शांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील हा संघर्ष मिटविण्यासाठी नेमकं कोण मध्यस्थी करतंय, असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याविषयीचा हा आढावा…

अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यात जवळपास चार आठवड्यांपासून युद्धाचा वणवा पेटला आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांचे बळी गेले आहेत. पश्चिम आशियातील या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने जगभरातील अनेक देश संकटात सापडले आहेत. यादरम्यान इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील जलमार्ग तातडीने खुला न केल्यास त्यांच्यावर आणखीनच तीव्र हल्ले करणार, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दिला होता. सोमवारी मात्र त्यांनी नरमाईची भूमिका घेऊन इराणबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला. दुसरीकडे इराणने मात्र चर्चेचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

इराण अन् अमेरिकेत कोण करतंय मध्यस्थी?

अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानसह तुर्की आणि इजिप्त या तीन देशांनी मध्यस्थीची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय भारत, ओमान व सौदी अरेबियानेही या वादात अमेरिकेला संयमाची भूमिका घेण्याचा सल्ला दिल्याचे काही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या आखाती मित्रराष्ट्रांनी ट्रम्प यांना खासगीत एक संदेश दिला होता. इराणच्या पायाभूत सुविधांचे कायमस्वरूपी नुकसान झाल्यास युद्धानंतर तिथे अराजकता निर्माण होईल आणि त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा विचार सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : सोन्याचे दागिने आणि गाड्या विकून इराणला मदत; जम्मू-काश्मीरमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

अमेरिका-इराण वादात पाकिस्तानची भूमिका काय?

अमेरिका आणि इराणमधील तणाव मिटविण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये पाकिस्तानने सर्वांत मोठा पुढाकार घेतल्याचा दावा केला जात आहे. रविवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लगेचच सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्याशी संवाद साधला. या चर्चांनंतर ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याचा आपला निर्णय लांबणीवर टाकला आणि सकारात्मक चर्चा झाल्याचे जाहीर केले, असे ‘फायनान्शियल टाइम्स’ने आपल्या वृत्तात नमूद केले आहे. यादरम्यान पाकिस्तानने अमेरिका व इराणच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये येण्याचे आमंत्रण दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप इराणकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

पाकिस्तान मध्यस्थीसाठी का पुढे आला?

अमेरिका व इराण यांच्यातील तणाव मिटविण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेण्यामागची अनेक कारणे आहेत. इराणनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची शिया मुस्लीम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आहे. तसेच सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांशी पाकिस्तानचे जवळचे संरक्षण संबंध आहेत. त्याशिवाय पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी घट्ट मैत्री असल्याचे मानले जाते. ट्रम्प यांनी यापूर्वी मुनीर यांना माझे आवडते फील्ड मार्शल व उत्कृष्ट लढवय्या म्हणून संबोधले होते. अमेरिका व इराण यांच्यातील तणाव आणखीनच विकोपाला गेल्यास खनिज तेलाच्या किमतीत मोठी वाढ होईल. परिणामी पाकिस्तानची आधीच डबघाईला आलेली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल, अशी भीती असीम मुनीर यांना वाटत असावी. याच कारणामुळे त्यांनी हा तणाव मिटवण्यात पुढाकार घेतला असावा, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

अमेरिका व इराणमध्ये खरंच युद्धविराम होणार?

अमेरिका व इराण यांच्यात युद्धविराम घडवून आणण्यासाठी पाकिस्तासह इतर मुस्लीम राष्ट्रांनी प्रयत्न सुरू केले असले तरीही तज्ज्ञांनी त्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. जगभरातील अनेक देश हे युद्ध थांबविण्यासाठी सध्या धावपळ करीत आहेत. मात्र, अमेरिका व इराण माघार या दोन्ही देशांकडून माघार घेण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे फक्त चर्चेची तयारी झाल्याने युद्ध संपणार असल्याचा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. त्यातून युद्ध संपत असल्याचा कोणताही ठोस संकेत मिळत नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. परिस्थिती अजूनही अस्थिर आहे आणि अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही बैठकीबद्दल केवळ तर्क करणे योग्य ठरणार नाही, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय कॅप्टनचा मृत्यू; मदतीअभावी गेला जीव? कोण होते राकेश सिंह?

युद्धाबाबत इराणची नेमकी भूमिका काय?

अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीवरून इराणला ४८ तासांची मुदत दिल्यानंतर इराणनेही अमेरिकेला सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा इशारा दिला होता. तसेच, पश्चिम आशियातील वीज प्रकल्प आणि पर्शियन आखातातील खाणींना लक्ष्य केले जाईल, असेही इराणने म्हटले होते. या इशाऱ्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतल्याचा दावा इराणच्या सरकारी माध्यमांनी केला. अमेरिकेने दिलेली मुदत मंगळवारी रात्री १२ वाजता संपणार होती; पण सोमवारीच ट्रम्प यांनी मुदतीत पाच दिवसांची एकतर्फी वाढ केल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकेबरोबर आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. इराणच्या प्रत्युत्तराच्या भीतीने ट्रम्प यांनी माघार घेतली, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर घालिबाफ यांनी सरकारी माध्यमांना सांगितले.