US Iran nuclear deal Donald Trump updates: इराणशी सुरू असलेले युद्ध संपवण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी म्हटले आहे. अमेरिकेबरोबर सुरू असलेले चर्चा सध्या प्रगतीपथावर असल्याचे सांगत इराणनेही याला दुजोरा दिला आहे. ‘सीबीएस न्यूज’ या वृत्तसंस्थेला ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत प्रतिक्रिया दिली होती. अमेरिका व इराण यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये शांतता करार होण्यात अडथळे येत आहेत. इराणचा अणुकार्यक्रम हा एकमेव अडथळा नसून अमेरिकेने लादलेले आर्थिक निर्बंध, सागरी मार्ग, क्षेपणास्त्र निर्मिती आणि आखाती देशांमध्ये भविष्यात प्रभाव निर्माण करण्यावरून अमेरिका व इराण यांच्यात वाद आहेत. इराणबरोबर सुरू असलेल्या चर्चेवरून ट्रम्प यांच्याच पक्षातून विरोध होत आहे. इराणला धोरणात्मकदृष्ट्या मिळालेला विजय अमेरिकेला हाताळता आला नाही, असा आवाज ट्रम्प यांच्याच पक्षातून उठत आहे. अमेरिका व इराण यांच्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे, मतभेद आहेत, ते सविस्तर जाणून घेऊयात.

१) इराणचा अणुकार्यक्रम

इराणचा अणुकार्यक्रम हा या वाटाघाटींमधील मुख्य मुद्दा राहिला आहे. युरेनियम समृद्धीकरणाच्या (uranium enrichment) भविष्याबाबतच नव्हे, तर इराणकडे सध्या उपलब्ध असलेल्या उच्च-समृद्ध युरेनियमच्या (highly enriched uranium) साठ्याचे काय करायचे, यावरही वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात मोठे मतभेद असल्याचे दिसून येत आहे. इराणचा अणुकार्यक्रम हा अमेरिका व इराणमधील चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. अणुबॉम्ब किंवा अण्वस्त्र तयार करण्यासाठी युरेनियम महत्वाचे आहे. इराणकडे सध्या उपलब्ध असलेल्या उच्च – समृद्ध युरेनियम साठ्याचे काय करायचे व भविष्यातील युरेनियम समद्धीकरणाबाबत कोणता निर्णय घ्यायचा यावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. ‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थे’च्या (IAEA) इराणकडे सध्या ६० टक्के शुद्धतेचे अंदाजे ९७० पाउंड समृद्ध युरेनियम आहे. तसेच विविध स्तरांवर समृद्ध केलेले जवळपास ११ टन युरेनियम आहे.

इराणने उच्च समृद्ध युरेनियम साठा नष्ट करावा, असा आग्रह अमेरिकेने धरला आहे. युरेनियमचा वापर अण्वस्त्र तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे अमेरिकेला वाटते. दुसरीकडे, इराणने मात्र हा साठा पूर्णपणे नष्ट करण्यास विरोध केला आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात एका आराखड्यावर तत्वतः सहमती झाली आहे. त्यानुसार इराण त्याच्याकडे असलेल्या उच्च-समृद्ध युरेनियमची विल्हेवाट लावेल. मात्र याची नेमकी प्रक्रिया काय असेल याबाबत दोन्ही देशांमध्ये अजूनही वाटाघाटी सुरू आहेत. परंतु, इराणच्या अधिकाऱ्यांनी हा दावा जाहीरपणे फेटाळला आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, “युरेनियम साठ्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर अद्याप सहमती झालेली नाही. या मुद्द्यावर पुढील ३० ते ६० दिवसांत चर्चा होईल”, असे इराणच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमेरिका इराणची अण्वस्त्र निर्मिती क्षमता तात्काळ आणि पूर्णपणे नष्ट करण्याऐवजी एक अंतरिम व्यवस्था स्वीकारू शकते, असे संकेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी दिले आहेत. भारत दौऱ्यादरम्यान रुबिओ म्हणाले, “तुम्ही कागदाच्या तुकड्यावर ७२ तासांत अण्वस्त्रांशी संबंधित करार पूर्ण करू शकत नाही.” अमेरिकेने इराणबाबत घेतलेल्या सौम्य भूमिकेमुळे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील इराणविरोधी नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

२) होर्मुझ सामुद्रधुनी

अमेरिका व इराण यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनीवरून मतभेद आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग हा जागतिक ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाच्या मार्गांपैकी एक आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले. तेलवाहू जहाजांची वाहतूक बंद केली. त्यामुळे जागतिक पातळीवर इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना इराण आता टोल आकारत आहे. तर अमेरिकन नौदलाने इराणभोवती नाकेबंदी केली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी कोणत्याही अडथळ्याविना सुरू करावी, अशी मागणी अमेरिकेने केली.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा अमेरिका नाकेबंदी उठवेल तेव्हाच इराण प्रस्तावित कराराअंतर्गत जहाजांना कोणतेही शुल्क न आकारता होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देईल. ट्रम्प यांनी भविष्यात हे निर्बंध उठवण्याबाबत काहीशी लवचिकता दाखवली आहे, परंतु, अंतिम करार होईपर्यंत नाकेबंदी सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले, जोपर्यंत करारावर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत नाकेबंदी पूर्ण ताकदीने लागू राहील.

३) अमेरिकेने गोठवलेल्या इराणच्या मालमत्ता

अमेरिकेने आंतरराष्ट्रीय निर्बंध लादून इराणच्या अब्जावधी डॉलरच्या मालमत्ता गोठवल्या आहेत. या मालमत्ता पुन्हा इराणच्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी इराणने केली. अमेरिकेने गोठवलेल्या इराणच्या मालमत्तांची किंमत जवळपास २५ अब्ज डॉलरहून अधिक आहे. इराणला या मालमत्ता सोपवण्याबाबत अमेरिकेने कोणतेही नियोजन केलेले नाही, असे व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. जर इराणने अणुकार्यक्रमाशी संबंधित अटींची पूर्तता केली, तर या मालमत्ता परतवण्याबाबतची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असेही ते म्हणाले. ‘अल जझीरा’ने इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या मालमत्ता पुन्हा सोपवणे व लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी हे दोन मुद्दे अमेरिकेने चर्चेतून वगळले आहेत. अमेरिकेने गोठवलेल्या मालमत्ता हा इराणसाठी अत्यंत कळीचा मुद्दा झाला आहे.

४) इराणशी संबंधित बंडखोर व अतिरेकी संघटना

लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी करावी अशी मागणी इराणने केली होती. दरम्यान, अमेरिकेने लेबनॉनमधील हेजबोल्लाह या बंडखोर संघटनेला चर्चेतून वगळले आहे. तसेच इराणचे समर्थन असलेल्या संघटनांबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले. इराणचे समर्थन असलेल्या बंडखोर सशस्त्र संघटनांबाबत चर्चा टाळण्याला अमेरिकेतूनच विरोध होत आहे. या संघटना आखाती देशांमध्ये इराणचा प्रभाव कायम ठेवतील, त्यामुळे आता केलेल्या लष्करी कारवाया व युद्ध निष्फळ ठरेल, अशी टीका ट्रम्प यांच्यावर होत आहे.

५) इराणचे क्षेपणास्त्र उत्पादन

इराणच्या क्षेपणास्त्र उत्पादनाबाबत अमेरिका, इराण आणि आखाती देशांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिका व इराण यांच्यात सध्या सुरू असलेल्या चर्चेतून इराणच्या क्षेपणास्त्रांचा मुद्दा वगळण्यात आला आहे. दरम्यान, चर्चेत फक्त अणुकार्यक्रमाचा मुद्दा असल्यास इराणचा क्षेपणास्त्र उत्पादन कार्यक्रम अबाधित राहील. त्यामुळे इराण मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र निर्मिती करेल, असे एका इराणी अधिकाऱ्याने म्हटले आहे.