अमेरिका-इस्रायल व इराणमधील युद्ध मागील दहा दिवसांपासून सुरू आहे. या युद्धात सहभागी देश एकमेकांवर, एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ले करत होते. आता या देशांनी नवीन ‘टार्गेट’ ठेवत सागरी जल शुद्धीकरण प्रकल्पांवर म्हणजेच ‘डिसॅलिनेशन प्लांट’वर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. समुद्रातील खारे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी ‘डिसॅलिनेशन प्लांट’चा वापर केला जातो. खारे पाणी गोड पाण्यात रूपांतरीत करण्याचे काम ‘डिसॅलिनेशन प्लांट’ करतात. इराण व बहरीन या देशांनी ‘डिसॅलिनेशन प्लांट’वर हल्ला केल्याचे आरोप एकमेकांवर केले आहेत. इराणने कोणकोणत्या देशांच्या ‘डिसॅलिनेशन प्लांट’वर हल्ले केले? तसेच ‘डिसॅलिनेशन प्लांट’ म्हणजे काय? ते सविस्तर जाणून घेऊयात.
इराणकडून बहरीनमधील ‘डिसॅलिनेशन प्लांट’वर हल्ले?
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकन सैन्याने इराणमधील केश्म आयलंडवरील ‘डिसॅलिनेशन प्लांट’वर हल्ला झाल्याचे शनिवारी (७ मार्च) म्हटले होते. या हल्ल्यामुळे ३० गावांतील पाणी पुरवठा खंडीत झाल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर रविवारी (८ मार्च) बहरीनने इराणवर आरोप केले. इराणचे ड्रोनने बहरीनमधील ‘डिसॅलिनेशन प्लांट’चे मोठे नुकसान करत असल्याचे बहरीन या देशाने म्हटले होते. दरम्यान, इराणच्या हल्ल्याचा पाणीपुरवठ्यावर परीणाम झाला नसल्याचे बहरीनने स्पष्ट केले होते. मागील वर्षी इराणला साठ वर्षांनंतर भयंकर दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. इराणमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पाणीपुरवठा नियंत्रित व कमी करण्यात आला होता. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाने तेलाचे दर भडकल्याचे दिसून येत आहे, आता पाण्यावरून युद्धाचा भडका आणखी उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘डिसॅलिनेशन प्लांट’ म्हणजे काय?
आखाती देश हे वाळवंटावर वसलेले आहेत. तिथे पाण्याचे खूपच कमी व मर्यादीत स्रोत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याच्या मागणीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे अनेकदा पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. ‘डिसॅलिनेशन प्लांट’च्या सहाय्याने समुद्रातील खाऱ्या पाण्याचे रूपांतर पिण्यायोग्य पाण्यात केले जाते. हे पाणी शेती व उद्योगांसाठी वापरता येते. ‘डिसॅलिनेशन प्लांट’साठी विद्युत ऊर्जा मोठ्या प्रमाणात लागते. हे प्लांट लिक्विड इंधन व नैसर्गिक गॅस यांवर चालतात. यातून दरवर्षी तब्बल ५०० ते ८५० दशलक्ष टन इतके कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होते. खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर जे उरलेले अतिक्षारयुक्त, खारे पाणी असते ते समुद्रात सोडले जाते. या पाण्यामुळे समुद्रातील प्लँक्टॉन व मासे तसेच इतर जीवांना धोका निर्माण होतो.
पश्चिम आशियातील देशांचे ‘डिसॅलिनेशन प्लांट’वरील अवलंबित्व किती?
जगभरात २१००० हून अधिक ‘डिसॅलिनेशन प्लांट’ आहेत. या प्लांटचा सर्वाधिक ७० टक्के वापर हा पश्चिम आशियातील देशांमध्ये केला जातो. बहुतांश आखाती देश हे ‘डिसॅलिनेशन प्लांट’मधील पाण्यावर अवलंबून आहेत. यूएईमध्ये ४२ टक्के पिण्याचे पाणी हे ‘डिसॅलिनेशन प्लांट’मधून पुरवले जाते. फ्रान्समधील एका संस्थेच्या अहवालानुसार, कुवेतमध्ये ९० टक्के, ओमानमध्ये ८६ टक्के, सौदी अरेबियात ७० टक्के पिण्याचे पाणी हे ‘डिसॅलिनेशन प्लांट’मधून पुरवले जाते.
इराणने कोणत्या देशांच्या ‘डिसॅलिनेशन प्लांट’वर हल्ले केले?
इराणने यूएईमधील दुबईतल्या जेबेल अली पोर्ट आणि फुजैराह एफ-१ पावर अँड वॉटर कॉम्प्लेक्सवर हल्ला केला. कुवेतच्या दोहा वेस्ट डिसॅलिनेशन प्लांटला इराणने लक्ष्य केले. त्यामुळे या भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे, असे वृत्त असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिले. दरम्यान, ‘डिसॅलिनेशन प्लांट’चा वापर विद्युत निर्मितीसाठी देखील केला जातो. त्यामुळे फक्त पाणीच नव्हे तर विद्युत पुरवठ्यावर देखील इराणी हल्ल्याने काही ठिकाणी परिणाम झाल्याचे समोर आले आहे. सौदी अरेबियामधील रियाध शहरात जवळपास ९० टक्के पिण्याचे पाणी हे ‘डिसॅलिनेशन प्लांट’मधून पुरवले जाते. रियाधमध्ये जर ‘डिसॅलिनेशन प्लांट’ उद्ध्वस्त झाला तर एका आठवड्यात अख्खे शहर रिकामे करण्याची वेळ येईल, असे एका अहवालातून समोर आले आहे.
इराणची पाण्याबाबत परिस्थिती काय?
भूजल, नदी, सरोवर यांमधील पाण्यावर इराण अवलंबून आहे. पश्चिम आशियातील इतर देशांमध्ये पाण्याची समस्या तीव्र असली तरी इराणमध्ये मात्र तितकी भीषण परिस्थिती नाही. परंतु, वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे इराणने दक्षिणेकडील किनारी भागात ‘डिसॅलिनेशन प्लांट’ उभारायला सुरूवात केली आहे. इराणमध्ये पश्चिम आशियातील इतर देशांच्या तुलनेत ‘डिसॅलिनेशन प्लांट’ची संख्या कमी आहे. केश्म आयलंडमध्ये इराणचा एक ‘डिसॅलिनेशन प्लांट’ सध्या कार्यरत आहे. त्या प्लांटला अमेरिकेने लक्ष्य केल्याचे इराणने म्हटले आहे. इराणमध्ये ५२३ धरण आहेत. त्यांमधून शहरी भागातील ९९.६ टक्के तर ग्रामीण भागातील ८२ टक्के लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जातो, असे इरानियन नॅशनल कमिटीच्या एका अहवालात सांगण्यात आले होते. दरम्यान, पश्चिम आशियातील देश एकमेकांच्या पाण्यावर आता घाव घालत आहेत. त्यामुळे पश्चिम आशियात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अमेरिका व इस्रायलचा प्रतिकार करण्यासाठी मोजतबांची नियुक्ती?
इराणच्या सर्वोच्च नेते पदाबाबत अमेरिका व इस्रायलकडून वारंवार इराणला इशारा दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोजतबा यांची इराणचे सर्वोच्च नेते पदावर नियु्क्ती करण्यात आली आहे. इराणमध्ये अयातुल्ला अली खामेनी यांच्यासारखेच नेतृत्व कायम राहावे, यासाठी मोजतबा यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या युद्धात इराण शेवटपर्यंत लढा देईल, अशी इच्छाशक्ती असलेली व्यक्ती पाहून मोजतबा यांच्याकडे इराणचे सर्वोच्च नेते पद सोपवण्यात आल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
