अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत वारं फिरलं आहे. महागाई, वाढता राहणीमानाचा खर्च आणि सरकारच्या धोरणांबद्दलच्या नाराजीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना फटका बसला असून, डेमोक्रॅटिक पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. प्रतिनिधीगृहासोबत सिनेटमध्येही डेमोक्रॅट्सने बहुमताचा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे टेक्सासपासून साउथ कॅरोलिनापर्यंतच्या रिपब्लिकन पक्षाचे प्रभुत्व असलेल्या राज्यांमध्ये डेमॉक्रेटिक पक्षाने निळा झेंडा फडकवला आहे.
सकाळी १२ वाजेपर्यंतच्या (भारतीय वेळ) कलानुसार प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅट्सनी २४१, तर रिपब्लिकन पक्षाने १४७ जागांवर विजय मिळवला आहे. काही मतदारसंघांचे निकाल अद्याप जाहीर होणे बाकी होते. दुसरीकडे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सनी रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यातील सहा जागा जिंकत बहुमताचा आकडा पार केला आहे. ट्रम्प यांनीही या निकालांचा स्वीकार करण्याची आणि डेमोक्रॅट्ससोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. “आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत, आम्ही कदाचित काहीतरी तोडगा काढू,” असे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने न्यूयॉर्क टाइम्सच्या हवाल्याने दिले आहे.
मध्यावधी निवडणुकीतील धक्कादायक निकाल
रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या राज्यांमधील निकाल यावेळी लक्षवेधी ठरला आहे. आयोवा, कॅन्सस, ओहायो, नॉर्थ कॅरोलिना, साउथ कॅरोलिना आणि टेक्सास या सहा राज्यांमध्ये डेमोक्रॅट्सनी सिनेटच्या जागा जिंकत रिपब्लिकनला मोठा धक्का दिला आहे. विशेषतः टेक्सासमधील विजय ऐतिहासिक ठरला. १९८८ नंतर या राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाला सिनेटची निवडणूक जिंकता आली नव्हती. यंदा डेमोक्रॅटिक उमेदवार जेम्स टालारिको यांनी रिपब्लिकन उमेदवार केन पॅक्स्टन यांना पराभवाची धूळ चारली. पॅक्स्टन हे टेक्सासचे ॲटर्नी जनरल असून, २०२३ मध्ये गैरवर्तनाच्या आरोपांवरून राज्याच्या प्रतिनिधीगृहाने त्यांच्याविरोधात महाभियोग चालवला होता. मात्र, नंतर राज्याच्या सिनेटने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
टेक्सासमध्ये केवळ सिनेटच नव्हे, तर गव्हर्नरपदाच्या निवडणुकीतही वारं फिरलं आहे. डेमोक्रॅटिक उमेदवार जीना हिनोजोसा यांनी तीन वेळा गव्हर्नर राहिलेल्या रिपब्लिकन उमेदवार ग्रेग ॲबॉट यांचा पराभव केला. या विजयामुळे १९९० मध्ये निवडून आलेल्या ॲन रिचर्ड्स यांच्यानंतर टेक्सासला पहिल्यांदाच डेमोक्रॅटिक पक्षाचा गव्हर्नर मिळाला आहे.
टेक्सासमधील ऐतिहासिक विजयापाठोपाठ ओहायो, साउथ कॅरोलिना आणि जॉर्जियामध्येही डेमोक्रॅट्सनी रिपब्लिकन पक्षाला पराभवाचा धक्का दिला आहे. ओहायोमध्ये डेमोक्रॅटिक उमेदवार ॲमी ॲक्टन यांनी रिपब्लिकन उमेदवार विवेक रामास्वामी यांचा पराभव करत गव्हर्नरपद मिळवले आहे. निवडणुकीपूर्वी रामास्वामी यांनी ॲक्टन यांच्या आईला दाखवणारी वादग्रस्त जाहिरात प्रसिद्ध केली होती. विवेक रामास्वामी यांनी आपल्या प्रचार मोहिमेत एमी ॲक्टन यांची विभक्त आई डोना आर्थर यांचा उल्लेख करत त्यांना मानसिक आजार असल्याची जाहिरात केली. या जाहिरातीतून प्रतिस्पर्धी उमेदवाराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका त्यांच्यावर झाली. या जाहिरातीमागे अमेरिकेतील नकारात्मक राजकीय प्रचाराचा इतिहास असल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले होते.
साउथ कॅरोलिनामध्ये डेमोक्रॅटिक उमेदवार ॲनी अँड्र्यूज यांनी विजय मिळवला आहे. रिपब्लिकन उमेदवार डार्लिन ग्रॅहम यांचा पराभव् झाला असून जुलैमध्ये डार्लिन यांचे भाऊ आणि दीर्घकाळ सिनेटर राहिलेले लिंडसे ग्रॅहम यांचं निधन झाल्यानंतर त्यांची या जागेवर नियुक्ती झाली होती. त्यांना ही जागा राखण्यात अपयश आले. १९९८ नंतर प्रथमच साउथ कॅरोलिनाची सिनेटची जागा आपल्याकडे खेचण्यात डेमोक्रॅटिक पक्षाला यश आले.
जॉर्जियामध्ये माजी अटलांटा महापौर आणि डेमोक्रॅटिक उमेदवार कीशा लान्स बॉटम्स यांनी रिपब्लिकन उमेदवार व्यावसायिक रिक जॅक्सन यांचा पराभव केला. त्या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला गव्हर्नर ठरल्या आहेत. १९९८ नंतर जॉर्जियात डेमोक्रॅटिक पक्षाचा गव्हर्नर निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय, नॉर्थ कॅरोलिनामधील सिनेटची जागा आणि केंटकी, न्यू जर्सी, नॉर्थ कॅरोलिना व पेनसिल्व्हेनियामधील प्रतिनिधीगृहाच्या जागांवरदेखील डेमोक्रॅटनी दणदणीत विजय मिळवला आहे.
मात्र, रिपब्लिकन पक्षाने फ्लोरिडातील सिनेटची जागा आपल्याकडे कायम राखली. विद्यमान सिनेटर ॲशले मूडी यांनी डेमोक्रॅटिक उमेदवार अँजी निक्सन यांचा पराभव केला. पण, मूडी यांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी मताधिक्य मिळाले. मार्को रुबियो परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर त्यांच्या जागी मूडी यांची नियुक्ती करण्यात आली होती. यंदा त्यांनी निक्सन यांचा सुमारे तीन टक्क्यांच्या फरकाने पराभव केला. २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी याच राज्यात १३ टक्क्यांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता, त्यामुळे फ्लोरिडातील यंदाची लढत रिपब्लिकन पक्षासाठी महत्त्वाची ठरली.
डेमोक्रॅट्सच्या यशामागची कारणं काय?
आर्थिक प्रश्न आणि ट्रम्प यांच्या धोरणांबद्दल मतदारांमध्ये वाढलेली नाराजी यामुळे यंदा डेमोक्रॅटिकसाठी अनुकूल वातावरण होते. असोसिएटेड प्रेससाठी SSRS ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ३९ टक्के मतदारांनी देशातील अर्थव्यवस्था हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचे म्हटले. त्यापाठोपाठ लोकशाहीची सद्यस्थिती (३२ टक्के) आणि स्थलांतराच्या मुद्द्यांवरून (१४ टक्के) मतदार नाराज असल्याचे समोर आले. जवळपास तीन-चतुर्थांश मतदारांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आर्थिक स्थिती आणखी बिघडल्याचे मत ६५ टक्के मतदारांनी, तर महागाईला त्यांच्या धोरणांमुळेच चालना मिळाल्याचे मत ६२ टक्के मतदारांनी मांडले आहे.
इराणसोबतच्या युद्धातील ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे रिपब्लिकनसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण झाले. अमेरिकेने इराणविरोधात लष्करी कारवाई करणे चुकीचे होते, असे ६२ टक्के मतदारांना वाटत होते; तर ७४ टक्के मतदारांनी मध्यावधी निवडणुकीत लष्करी कारवाईचा मुद्दा निर्णायक ठरल्याचे सांगितले. या संघर्षामुळे इंधनाच्या किमती वाढल्या आणि आधीच ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणांमुळे वाढलेल्या महागाईचा भार सामान्य नागरिकांवर पडला.
ट्रम्प प्रशासनाबद्दलची हीच नाराजी डेमोक्रॅट्सच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येते. AP Voter Poll नुसार, ४३ टक्के मतदारांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केल्याचे सांगितले, तर केवळ १६ टक्के मतदारांनी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मतदान केल्याचे म्हटले. देशातील सध्याच्या स्थितीवर आपण नाराज असल्याचे ७५ टक्के मतदारांनी नमूद केले.
डेमोक्रॅट्सना विविध वयोगट आणि समुदायांमधूनही पाठिंबा मिळाला. प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीत ६० टक्के हिस्पॅनिक आणि लॅटिनो मतदारांनी, तर ६९ टक्के आशियाई मतदारांनी डेमोक्रॅटिक उमेदवारांना पसंती दिली. १८ ते २९ वयोगटातील मतदारांमध्ये डेमोक्रॅट्सना ७१ टक्के, तर रिपब्लिकन पक्षाला २५ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजेच अमेरिकेतील जेन झी डेमोक्रॅट्स बाजूने असल्याचे यातून दिसून येते.
निवडणुकीपूर्वीच्या सर्वेक्षणांतही ट्रम्प प्रशासनाविरोधातील नाराजी दिसून आली होती. ऑक्टोबरमध्ये प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ८४ टक्के नोंदणीकृत मतदारांनी मतदानासाठी अर्थव्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगितले, टेक्सासमध्येही अशीच स्थिती होती. मारिस्टच्या ऑक्टोबरमधील सर्वेक्षणात ४३ टक्के संभाव्य मतदारांनी मागील वर्षाच्या तुलनेत आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावल्याचे सांगितले, तर ३८ टक्के मतदारांनी ट्रम्प यांच्याविरोधात भूमिका घेण्यासाठी काँग्रेस निवडणुकीत मतदान करत असल्याचे म्हटले. अपक्ष मतदारांपैकी ५२ टक्के मतदारांचा डेमोक्रॅटिक सिनेट उमेदवार जेम्स टालारिको यांना पाठिंबा दिला.
