US Midterm Swing States Competition : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले आहेत. ही निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची ठरते. पण, या निवडणुकीमुळे अमेरिकेतील देशांतर्गत राजकारणाला नवी दिशा मिळू शकते. २०२४ च्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या राज्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या विजय-पराभवात निर्णायक भूमिका बजावली, यंदा त्यांच्याऐवजी वेगळीच राज्ये चर्चेत आली आहेत. यंदा मेन आणि मिशिगन येथे अमेरिकेतील दोन प्रमुख पक्षांत अटीतटीची लढत रंगणार आहे, त्यामुळे या राज्यांवर अमेरिकनांच्या नजरा खिळल्या आहेत. २०२४ मध्ये मेनमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा मिळाला होता; मात्र आता तिथे रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर पुन्हा निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे, मिशिगनमध्ये ट्रम्प यांनी विजय मिळवला होता, पण आता तिथल्या सिनेट, गव्हर्नर आणि प्रतिनिधीगृहाच्या जागांसाठी चुरशीच्या लढती होत आहेत.

मंगळवारी, ३ नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत प्रतिनिधीगृहाच्या (काँग्रेस) सर्व ४३५ जागा, सिनेटच्या ३५ जागा आणि ३६ राज्यांतील गव्हर्नरपदासाठी मतदान पार पडणार आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतील राजकीय रणांगणाचा नकाशा २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपेक्षा वेगळा दिसतो. त्यावेळी पेनसिल्व्हेनिया, अ‍ॅरिझोना आणि जॉर्जिया ही राज्य निर्णायक ठरली होती; पण यंदा मेन आणि मिशिगन राज्यांच्या निकालांकडे अमेरिकनांचे लक्ष लागले आहे.

केवळ खासदार किंवा गव्हर्नर निवडण्यापुरते या निवडणुकीचे महत्त्व मर्यादित राहत नाही. सध्या अमेरिकेच्या संसदेतील प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. मात्र, प्रतिनिधीगृहातील सत्ताधारी पक्षाकडे निसटते बहुमत आहे. अमेरिकेत एखाद्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी आवश्यक असते. त्यानंतरच ते राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी पाठवले जाते. यासाठी मध्यावधी निवडणुकीत सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाला आपले बहुमत कायम ठेवता येते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीत एखाद्या राज्यात कोणत्या पक्षाला विजय मिळेल याचा अंदाज बांधणे कठीण असते. काही राज्यांमध्ये रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅटिक पक्षाचा विजय जवळपास निश्चित मानला जातो. मात्र, काही राज्यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत होते. अशा राज्यांना ‘स्विंग स्टेट’ किंवा ‘बॅटलग्राउंड स्टेट’ म्हणतात. म्हणजेच ज्या राज्यात कोणत्याही एका पक्षाला विजयाची खात्री देता येत नाही, ते स्विंग स्टेट.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत या ‘स्विंग स्टेट्स’ ना विशेष महत्त्व असतं. कारण अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांची निवड थेट जनतेतून होत नाही, तर ‘इलेक्टोरल कॉलेज’च्या माध्यमातून होते. या व्यवस्थेत एकूण ५३८ ‘इलेक्टोरल’ मते असतात. प्रत्येक राज्याला तेथील लोकसंख्या आणि काँग्रेसमधील (संसदेतील) प्रतिनिधित्वाच्या संख्येनुसार इलेक्टोरल मते मिळतात. नोव्हेंबरमध्ये नागरिक राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करतात. त्या निकालानुसार संबंधित राज्याची सर्व इलेक्टोरल मते कोणत्या उमेदवाराला मिळणार हे निश्चित होते. त्यानंतर हे इलेक्टर्स (प्रतिनिधी) डिसेंबरमध्ये आपले अधिकृत मत नोंदवतात आणि जानेवारी महिन्यात काँग्रेस या मतांची अधिकृत मोजणी करून अध्यक्षांची घोषणा करते, त्यामुळेच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम कौल ठरवण्यात स्विंग स्टेट्स अत्यंत निर्णायक ठरतात.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्विंग स्टेट्सचं त्यांच्या इलेक्टोरल मतांमुळेच निर्णायक ठरतात. राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी उमेदवाराला एकूण ५३८ पैकी किमान २७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते. बहुतांश राज्यांमध्ये ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात, म्हणजेच त्या उमेदवाराला त्या राज्यांमधील सर्व इलेक्टोरल मते मिळतात, त्यामुळे अगदी कमी मतांच्या फरकाने होणारी लढतही निकालाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

यासाठी टेक्सासचे उदाहरण पाहता येईल. १९८० मध्ये रोनाल्ड रेगन राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून टेक्सासने प्रत्येक राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवाराला मतदान केले आहे, त्यामुळे हे राज्य रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला मानले जाते. याउलट, अ‍ॅरिझोना आणि जॉर्जियासारख्या राज्यांमध्ये मतदारांचा कल दरवेळी बदलल्याचे दिसून येते. अॅरिझोनाने २०१६ मध्ये यांना पाठिंबा दिला. २०२० मध्ये जो बायडेन यांना संधी दिली आणि २०२४ मध्ये पुन्हा ट्रम्प यांना निवडून दिले. २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन ही सात राज्ये स्विंग स्टेट्स म्हणून चर्चेत होती.

मात्र, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्विंग स्टेट ठरलेली राज्ये मध्यावधी निवडणुकीतही निर्णायक ठरतील असे नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या दोन्ही निवडणुकांची पद्धत वेगळी आहे. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक चार वर्षांनी होते; तर मध्यावधी निवडणुका राष्ट्राध्यक्षांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मधल्या टप्प्यावर होतात. यात काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांसाठी, म्हणजेच प्रतिनिधीगृह आणि सिनेटसाठी, तसेच अनेक राज्यांमधील पदांसाठी मतदान होते. एखाद्या राज्यातील मतदारांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी एका पक्षाला पाठिंबा दिला असला, तरी गव्हर्नर किंवा सिनेटर म्हणून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराची निवड होऊ शकते. शिवाय, या निवडणुकांमध्ये इलेक्टोरल मतांची कोणतीही भूमिका नसते.

प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागांसाठी दर दोन वर्षांनी निवडणूक होते. सिनेटरचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो, त्यामुळे दर दोन वर्षांनी सिनेटमधील साधारण एक तृतीयांश जागांसाठी मतदान होते. प्रतिनिधीगृहाची निवडणूक स्वतंत्र मतदारसंघांमध्ये, तर सिनेटची निवडणूक संपूर्ण राज्यात होते, त्यामुळे कोणत्या राज्यात कोणती जागा निवडणूक सज्ज आहे यावरही स्विंग स्टेटचा नकाशा ठरतो.

उदाहरणार्थ, २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेनसिल्व्हेनिया हे महत्त्वाचे स्विंग स्टेट होते; मात्र यंदा तिथे सिनेटची निवडणूक नाही. दुसरीकडे, २०२४ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांना मतदान केलेल्या मेन राज्यात यंदा सिनेटसाठी चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या विद्यमान सिनेटर सुसन कॉलिन्स पुन्हा रिंगणात आहेत, त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील राजकीय कल आणि मध्यावधी निवडणुकीतील लढतींचे चित्र वेगळे असू शकते.

सिनेटमधील बहुमतासाठी कोणत्या राज्यांतील लढती महत्त्वाच्या?

मध्यावधी निवडणुकीत प्रतिनिधीगृहाइतकेच सिनेटमधील बहुमताचे गणितही महत्त्वाचे ठरणार आहे. सिनेटच्या एकूण १०० जागांपैकी सध्या रिपब्लिकन पक्षाकडे ५३, तर डेमोक्रॅटिक पक्षाकडे ४५ जागा आहेत. दोन अपक्ष सिनेटर डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा देतात, त्यामुळे सिनेटमध्ये बहुमत मिळवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाला आणखी चार जागा जिंकाव्या लागणार आहेत.

‘कुक पॉलिटिकल रिपोर्ट’ने २० ऑक्टोबरला प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, सिनेटच्या सात जागांवरील लढतींच्या निकालाचे चित्र अधिक स्पर्धात्मक आहे. यामध्ये मेन, मिशिगन, टेक्सास, ओहायो, आयोवा, अलास्का आणि कॅन्सस या राज्यांचा समावेश आहे. यापैकी सहा जागांवर सध्या रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर आहेत, तर मिशिगनची जागा डेमोक्रॅटिक पक्षाकडे आहे.

मेन राज्यात रिपब्लिकन पक्षाच्या विद्यमान सिनेटर सुसन कॉलिन्स पुन्हा निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत या राज्याने डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला होता. मिशिगनमध्ये मात्र डेमोक्रॅटिक पक्षाचे अब्दुल एल-सय्यद आणि रिपब्लिकन पक्षाचे माजी खासदार माइक रॉजर्स यांच्यात लढत होत आहे. गॅरी पीटर्स यांनी रिक्त केलेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. २६ आणि २७ ऑक्टोबरला झालेल्या सीबीएस डेट्रॉइटच्या सर्वेक्षणात एल-सय्यद यांच्या बाजूने ५१ टक्के, तर रॉजर्स यांच्या बाजूने ४४ टक्के मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून आले.

टेक्सास, आयोवा आणि कॅन्ससमधील लढतीही चुरशीच्या मानल्या जात आहेत. विशेष म्हणजे, या तिन्ही राज्यांनी गेल्या तीन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे या राज्यांमध्ये विजय मिळवणे डेमोक्रॅटिक पक्षासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. आधीच्या जागा टिकवण्यासोबतच बहुमतासाठी आवश्यक असलेल्या चार जागा जिंकण्याचे आव्हान पक्षासमोर असणार आहे.

प्रतिनिधीगृहांसाठी वातावरण कसे?

सिनेटमधील बहुमताचे गणित राज्यपातळीवरील लढतींवर अवलंबून असले तरी प्रतिनिधीगृहाचे चित्र वेगळे असते. एखाद्या राज्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एका पक्षाला मोठा पाठिंबा मिळाला, तरी त्याच राज्यातील काही मतदारसंघांमध्ये त्या पक्षाऐवजी दुसऱ्या पक्षाचे उमेदवारही विजयी होऊ शकतात, त्यामुळे राज्याचा एकूण राजकीय कल पाहून प्रतिनिधीगृहातील निकालाचा अंदाज बांधता येत नाही.

प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागांसाठी दर दोन वर्षांनी निवडणूक होते. मात्र, या निवडणुका संपूर्ण राज्यात एकाच वेळी नव्हे, तर स्वतंत्र संसदीय (काँग्रेस) मतदारसंघांमध्ये लढवल्या जातात, त्यामुळे एखाद्या राज्यात एका पक्षाचं वर्चस्व असले तरी तिथल्या काही मतदारसंघांमध्ये दुसऱ्या पक्षाला विजयाची संधी मिळू शकते.

उदाहरणार्थ, पेनसिल्व्हेनियाच्या दहाव्या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान खासदार स्कॉट पेरी यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाच्या जेनेल स्टेल्सन या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर कॅलिफोर्नियाच्या २२ व्या मतदारसंघात रिपब्लिकन खासदार डेव्हिड व्हॅलाडाओ आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे रँडी विलिगास यांच्यात लढत आहे. निवडणूक विश्लेषकांच्या मते, या दोन्ही मतदारसंघांतील लढती चुरशीच्या आहेत.

‘कुक पॉलिटिकल रिपोर्ट’च्या ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यातील अंदाजानुसार, रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात असलेल्या आणि आतापर्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या काही मतदारसंघांमध्येही आता चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे यंदाच्या मध्यावधी निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे केवळ राज्यांचा राजकीय कल किंवा २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालावरून ठरणार नाही. सिनेटमधील राज्यस्तरीय लढती आणि प्रतिनिधीगृहातील मतदारसंघनिहाय निकाल मिळूनच अमेरिकन काँग्रेसमधील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.