अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये निर्विवाद बहुमत मिळवले आहे. डेमोक्रॅटिक्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विजय खेचून आणल्याने ट्रम्प यांच्यासाठी हा सर्वांत मोठा धक्का आहे. ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणामुळे वाढलेली महागाई आणि इराणसोबतच्या युद्धामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता या मुद्द्यांमुळे ट्रम्प यांना फटका बसला. ट्रम्प यांच्या पराभवामुळे अमेरिकेच्या व्यापार धोरणात आता स्थिरता येईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेतील सत्ताबदलाचा भारत-अमेरिका व्यापार करारावरही परिणाम होऊ शकतो. अमेरिकेने भारतासह काही देशांवर मोठे आयात शुल्क लादले होते. मात्र, अमेरिकेने लादलेल्या एकतर्फी अटी मान्य करणारा करार भारताने स्वीकारला नाही. डिजिटल व्यापारात अमेरिकेला अधिक मोकळीक देणे आणि कृषीसारख्या संवेदनशील क्षेत्रांत प्रवेश देणे, अशा मागण्यांवर भारताने कठोर भूमिका घेतली. डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर अमेरिकेसोबतच्या भारताच्या वाटाघाटी अधिक व्यावहारिक होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, ट्रम्प यांच्याकडे असलेले कार्यकारी आदेशांचे अधिकार पाहता, या निकालामुळे भारतासाठी व्यापारविषयक अडचणी पूर्णपणे दूर होतीलच याचे चित्र स्पष्ट नाही.

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी कार्यकारी आदेशांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये डेमोक्रॅट्सचे बहुमत असले तरी व्यापारातील भागीदार देशांसाठी ट्रम्प यांची धोरणे अडचणीची ठरू शकतात. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘व्हेटो’ असे लिहिलेल्या लाल रंगाच्या टोपीचा फोटो पोस्ट केला. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्थलांतरासारख्या मुद्द्यांवर डेमोक्रॅट्ससोबत काम करण्याची तयारी दर्शवली; मात्र त्यांनी मंजूर केलेली कोणतीही ‘वेडगळ’ विधेयके मान्य करणार नसल्याचे सांगत व्हेटोचे अधिकार वापरण्याचा इशाराही दिला.

मध्यावधी निवडणुकीचा निकाल ट्रम्प यांना अधिक आक्रमक करू शकतो

निवडणुका पार पडल्यामुळे आता अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाकडून (USTR) एका महत्त्वाच्या तपासाचा निष्कर्ष जाहीर होण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेच्या १९७४ च्या व्यापार कायद्यातील कलम ३०१ अंतर्गत ‘अतिरिक्त उत्पादन क्षमता’ (ओव्हरकॅपॅसिटी) या मुद्द्यावर हा तपास सुरू आहे. एखाद्या देशात किंवा उद्योगक्षेत्रात बाजारातील मागणीपेक्षा अधिक उत्पादन करण्याची क्षमता असणे, याला अतिरिक्त उत्पादन क्षमता म्हणतात. ट्रम्प प्रशासनाकडून आयात शुल्करचना नव्याने लागू करण्यासाठी हा कायदेशीर मार्ग मानला जात आहे, त्यामुळे मध्यावधी निवडणुकीनंतर अमेरिकेच्या व्यापार धोरणात कोणते बदल होतात याकडे भारतासह इतर भागीदार देशांचे लक्ष लागले आहे.

सत्ता गेली म्हणून ट्रम्प आपल्या धोरणांना लगाम घालतील का?

भारताचे माजी राजदूत मोहन कुमार यांच्या मते तशी शक्यता कमी आहे. अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात राष्ट्राध्यक्षांवर मर्यादा आल्या तर ते परराष्ट्र धोरणात अधिक मोकळेपणाने निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे इतर देशांबाबत चांगले किंवा नुकसानकारक निर्णय घेण्याची ट्रम्प यांची क्षमता पूर्वीइतकीच राहू शकते किंवा वाढूही शकते, असे कुमार यांनी नमूद केले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अनेकदा काँग्रेसची मंजुरी न घेताच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ओबामा यांनी ३५, जॉर्ज बुश यांनी ४२ आणि बायडेन यांनी एका कार्यकाळात १६२ कार्यकारी आदेश जारी केले होते. ट्रम्प यांनी मात्र दोन वर्षांतच १६६ आदेश जारी केले आहेत, त्यामुळे काँग्रेसमधील सत्ता हातात नसतानाही, ट्रम्प कार्यकारी आदेशांच्या माध्यमातून निर्णय घेत राहतील असे कुमार यांनी म्हटले. ओ. पी. जिंदाल हे ग्लोबल विद्यापीठातील मोटवानी जडेजा इन्स्टिट्यूट फॉर अमेरिकन स्टडीजचे महासंचालक आहेत.

परराष्ट्र, सुरक्षा आणि व्यापार धोरणाच्या बाबतीत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष प्रभावहीन ठरत नाही, असेही कुमार यांनी स्पष्ट केले. जूनमध्ये अमेरिकन काँग्रेसने इराणविरुद्धची लष्करी कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले होते, तर सप्टेंबरमध्ये रशियावर व्यापार निर्बंध लादण्याचा प्रस्ताव मोठ्या बहुमताने मंजूर केला होता. मात्र, ट्रम्प यांनी ‘राष्ट्रीय हिताचा’ हवाला देत विशेष अधिकार (Veto Power) वापरून हे निर्बंध निष्प्रभ केले, त्यामुळे उर्वरित दोन वर्षांत ते काँग्रेसच्या निर्णयांना अशाच प्रकारे बगल देऊ शकतात, असा अंदाज कुमार यांनी व्यक्त केला.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या नियंत्रणाखाली ट्रम्प यांच्या व्यापार धोरणावर किती प्रभाव पडेल हे समजून घेण्यासाठी आधी या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी पक्षाला का नाकारले हे पाहणे महत्त्वाचे आहे. ट्रम्प यांचे आयात शुल्क धोरण आणि इराणसोबतचे युद्ध हे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरले. आयात शुल्काचा बहुतांश आर्थिक भार अमेरिकन ग्राहकांवर पडला, तर इराणसोबतच्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला होर्मुझचा सामुद्रधुनी मार्ग प्रत्यक्षात बंद पडला.

निवडणुकीनंतरच्या सर्वेक्षणांतही अर्थव्यवस्था हा मतदारांसाठी सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे दिसून आले, त्यामुळे रिपब्लिकन प्रभाव असलेल्या टेक्साससारख्या राज्यांतही मतदारांनी यंदा डेमोक्रॅट्सच्या बाजूने कौल दिला. आयात शुल्काबाबत अमेरिकन जनमतही ट्रम्प यांच्याविरोधात झुकल्याचे विविध सर्वेक्षणांतून समोर आले. एबीसी न्यूजच्या सर्वेक्षणात ६४ टक्के लोकांनी म्हटले की, आयात शुल्काचा वापर मर्यादेपलीकडे गेल्याचे म्हटले; तर कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या सर्वेक्षणानुसार, ८३ टक्के लोकांनी वाढत्या आयात शुल्काचा महागाई वाढण्यात किमान काही प्रमाणात वाटा असल्याचे मान्य केले, त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात वातावरण निर्माण झाले.

अमेरिकन मतदारांमधील नाराजीचा ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांनाही फटका बसू शकतो. अमेरिकेतील हडसन इन्स्टिट्यूट या थिंक टँकच्या अहवालानुसार, डेमोक्रॅट्सनी व्यापार धोरणांवरील ट्रम्प यांचे वर्चस्व कमी करून काँग्रेसचे अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीनंतर काँग्रेसमधील बहुमताचा वापर करून ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांवर नियंत्रण मिळवण्याच्या हालचाली डेमोक्रॅटिक नेत्यांनी आधीच सुरू केल्या आहेत.

व्यापारविषयक निर्णयांवर अधिकार असलेल्या सिनेटच्या वित्त समितीचे संभाव्य नवे अध्यक्ष रॉन वायडन आणि सिनेटमधील नेते चार्ल्स शूमर यांनी ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध करणारी विधेयके मांडली आहेत. शूमर यांच्या विधेयकातून ट्रम्प यांनी व्यापारविषयक निर्णयांसाठी वापरलेल्या काही कायद्यांमधील तरतुदी रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. यात ‘अन्याय्य व्यापार पद्धतीं’विरोधात कारवाई करण्याचा अधिकार देणाऱ्या १९७४ च्या व्यापार कायद्यातील कलम ३०१ चा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी आयात शुल्कासह अनेक व्यापारविषयक निर्णयांसाठी या अधिकाराचा वापर केला आहे, असे हडसन इन्स्टिट्यूटच्या अहवालात म्हटले आहे.

व्यापार धोरणाबाबत दोन्ही पक्षांची भूमिका सारखीच?

मात्र, काँग्रेसमध्ये डेमोक्रॅट्सची सत्ता आल्याने अमेरिकेच्या व्यापार धोरणात मोठा बदल होईल असे मानणे घाईचे ठरेल. व्यापार तज्ज्ञांच्या मते, चीनबाबतची भूमिका आणि देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्याच्या मुद्द्यावर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स यांच्यात अनेकदा एकमत दिसून आले आहे. जागतिक व्यापार संघटनेपासून (WTO) दूर जाण्याची भूमिका ट्रम्प यांनी घेतली असली, तरी या संघटनेतील न्यायाधीशांच्या नियुक्त्या रोखण्याची सुरुवात ओबामा प्रशासनाच्या काळातच झाली होती. या अनपेक्षित धोरणामुळे हळूहळू जागतिक व्यापार संघटनेमधील कामकाज ठप्प होत गेले आणि याच स्थितीने ट्रम्प प्रशासनासाठी एकतर्फी (Unilateral) व्यापारी निर्णय घेण्याचा मार्ग सुकर केला. असे असले तरी ट्रम्प यांची संरक्षणवादी धोरणे नेहमीच अधिक अनपेक्षित स्वरूपाची राहिली आहेत.

माजी व्यापार अधिकारी आणि ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांच्या मते, मध्यावधी निवडणुकीतील पराभवामुळे ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाची दिशा बदलण्याची शक्यता कमी आहे. कारण आर्थिक राष्ट्रवाद, देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन आणि मजबूत पुरवठा साखळी या मुद्द्यांवर आता रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स दोन्ही पक्षांचे एकमत आहे, त्यामुळे भारताला अमेरिकेसोबतच्या व्यापार वाटाघाटींमध्ये काही मुद्द्यांवर अधिक व्यावहारिक भूमिका अनुभवायला मिळू शकते; मात्र आयात शुल्क आणि संरक्षणवादी धोरणांबाबत मोठा दिलासा मिळेलच असे नाही. अर्थात, ट्रम्प यांच्या पराभवामुळे भारतासाठी काही दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी अमेरिकेच्या व्यापार धोरणातील मूलभूत बदलाची अपेक्षा ठेवणे कठीण आहे.