‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ एका डळमळीत युद्धविरामामुळे थांबलेले असताना अमेरिकन सैन्य दारुगोळा संपण्याच्या टप्प्याजवळ पोहोचले का, याचे विविध स्तरावर मूल्यांकन सुरू आहे. इराणवरील कारवायांमध्ये अमेरिकेचा क्षेपणास्त्र साठा मोठ्या प्रमाणात खर्ची पडला. हे युद्ध सुरू ठेवण्यासाठी अमेरिकेकडे पुरेशी क्षेपणास्त्रे आहेत. त्यांच्यासमोर खरा धोका आहे, तो भविष्यात चीन, रशियासारख्या समतुल्य प्रतिस्पर्ध्याशी सामना करताना लागणाऱ्या पुरेशा शस्त्रागाराचा. अशा प्रसंगी अमेरिकेला क्षेपणास्त्रांची कमतरता भासू शकते, असा निष्कर्ष लष्करी तज्ज्ञांनी काढला आहे.

अमेरिकेकडे किती शस्त्रास्त्रे शिल्लक?

इराणशी जवळपास सात आठवडे चाललेल्या युद्धात अमेरिकन लष्कराने वापरलेल्या शस्त्रांच्या आधारे त्यांच्या शस्त्रागारातील शिल्लक साठ्याविषयी विश्लेषण केले जात आहे. संरक्षण विभागाच्या अंतर्गत मूल्यांकनाशी संबंधित काही व्यक्ती अमेरिकन लष्कराने या युद्धात क्षेपणास्त्रांचा साठा लक्षणीयरित्या कमी केल्याचे सांगतात. ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक ॲण्ड इंटरनॅशनल स्टडीज’ने (सीएसआयएस) अमेरिकन शस्त्रागाराचे विश्लेषण केले. युद्धविरामापूर्वीच्या ३९ दिवसांत हवाई आणि क्षेपणास्त्र मोहिमेत टॉमाहॉक, जेएएसएसएम, पीआरएसएम, एसएम – ६, थाड, पेट्रियट या शस्त्रास्त्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. अमेरिकन लष्कराने आपल्या ‘प्रिसिजन स्ट्राइक मिसाईल’च्या साठ्यापैकी किमान ४५ टक्के, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी बनवलेल्या ‘थाड’ क्षेपणास्त्रांच्या साठ्यापैकी किमान अर्धा आणि पेट्रियट हवाई संरक्षण इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांच्या साठ्यापैकी जवळपास ५० टक्के साठा वापरला आहे. ही आकडेवारी पेंटागॉनच्या गोपनीय माहितीशी मिळतीजुळती असल्याचे सांगितले जाते.

युद्धविराम न टिकल्यास काय?

अमेरिका-इराण यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीवर युद्धाचे भवितव्य अवलंबून आहे. लवकरच ही फेरी होऊ शकते, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकी नाकेबंदी कायम ठेवत त्यांनी तूर्त शस्त्रसंधीची मुदत वाढविली. चर्चेत सहभागी होण्याबाबत इराणने निर्णय घेतलेला नाही. या अस्थिरतेत शस्त्रसंधी डळमळीत झाल्यास अमेरिकेकडे इराणवर लढाऊ कारवाया सुरू ठेवण्यासाठी पुरेसे बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे असण्याची शक्यता आहे. दारूगोळ्याच्या अभ्यासात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे अनेक दारूगोळ्याचा पुरेसा साठा उपलब्ध असतो. त्यामुळे अत्यावश्यक दारूगोळा कमी झाला तरीही अमेरिका लढा सुरू ठेवू शकेल, याकडे सीएसआयएस लक्ष वेधते. खुद्द पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या निवेदनात राष्ट्राध्यक्षांनी निवडलेल्या वेळी आणि ठिकाणी कारवाई करण्यासाठी लष्कराकडे सर्व काही असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून लढाऊ कमांडमध्ये आम्ही अनेक यशस्वी मोहिमा राबवल्या. तसेच आपल्या लोकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी अमेरिकन सैन्याकडे व्यापक क्षमतेचा मोठा शस्त्रसाठा असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

साशंकता कुठे?

एका विश्लेषणानुसार अमेरिकन लष्कराने आपल्या टॉमाहॉक क्षेपणास्त्र साठ्यापैकी अंदाजे ३० टक्के, लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र साठ्यापैकी २० टक्क्यांपेक्षा जास्त आणि आपल्या एसएम-३ व एसएम-६ क्षेपणास्त्रांपैकी अंदाजे २० टक्के साठा वापरला. शस्त्रागारातील घटत्या क्षेपणास्त्र व दारूगोळ्याचा प्रश्न लष्करी तज्ज्ञ केवळ इराणशी लढण्याच्या दृष्टिकोनातून बघत नाहीत. बलाढ्य अमेरिकन सैन्याला इराणशी पुन्हा दोन हात करण्यात अडसर येणार नाही. त्यांनी हा विषय जागतिक पातळीवर अमेरिकेच्या लष्करी प्रभुत्वाशी जोडला आहे. इराण युद्धापूर्वीही, समसमान प्रतिस्पर्ध्याशी लढाईसाठी शस्त्रसाठा अपुरा मानला जात होता. इराण युद्धानंतर ही कमतरता आणखी तीव्र झाली. अमेरिकन शस्त्रागारात शिल्लक महत्त्वाच्या दारूगोळ्याची संख्या चीनसारख्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करण्यास पुरेशी नाही. हा शस्त्रसाठा युद्धाच्या आधीच्या स्थितीवर येण्यासाठी बराच कालावधी लागेल, असा ‘सीएसआयएस’चा अंदाज आहे.

लढाऊ क्षमता कधी वाढणार?

जागतिक स्थितीचा अंदाज घेत या वर्षाच्या सुरूवातीला पेंटागॉनने क्षेपणास्त्र उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यानुसार अनेक करारांवर स्वाक्षरी केली. मात्र वाढीव क्षमतेसाठी लागणारा कालावधी तीन ते पाच वर्षे असल्याचे सीआयआयएसचे म्हणणे आहे. महत्त्वपूर्ण शस्त्रसामग्रीची पश्चिम प्रशांतमधील भविष्यातील संघर्षासाठीही मोठ्या संख्येने आवश्यकता आहे. अनेक मित्रराष्ट्रे आणि भागीदार देशही त्याचा वापर करतात. अमेरिकन मरीन कोअरचे माजी कर्नल आणि सीएसआयएस अहवालाचे लेखक असणाऱ्या अधिकाऱ्याने हा साठा पुन्हा भरून काढण्यासाठी एक ते चार वर्षे लागतील आणि त्यानंतर तो आवश्यक पातळीवर नेण्यासाठी अनेक वर्षे जातील, असा अंदाज वर्तवला. ट्रम्प यांना मात्र ते मान्य नाही. अमेरिककडे कोणत्याही शस्त्रास्त्रांची कमतरता नाही, असा दावा त्यांनी केला होता. त्याचवेळी विद्यमान साठ्यावर झालेल्या परिणामामुळे अतिरिक्त निधीची त्यांना मागणी करावी लागली हे दुर्लक्षिता येणार नाही. मोठ्या प्रमाणातील दारूगोळ्यामुळे साठ्याची पुनर्बांधणी आणि विस्ताराची निकड २०२७ वर्षाच्या अर्थसंकल्पात ठळकपणे अधोरेखित होते. हा निधी मंजूर होऊनही या क्षेपणास्त्रांचे वितरण होण्यासाठी अनेक वर्ष लागतील.

धोके काय?

दारूगोळ्याचा साठा कमी झाल्यामुळे युक्रेन आणि त्यांचा वापर करणाऱ्या अन्य मित्र राष्ट्रांना होणाऱ्या अमेरिकेच्या पेट्रीयट, ‘टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिआ डिफेन्सेस’ अर्थात थाड आणि प्रिसिजन स्ट्राईक (पीआरएसएमएस) क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यावरही परिणाम होईल. ज्या देशांना आपला साठा भरून विस्तार करायचा आहे, त्यांच्याशी अमेरिकेला स्पर्धा करावी लागेल. साठा कमी असल्याने नजीकच्या काळात चीनसारख्या सक्षम प्रतिस्पर्ध्याविरुद्धच्या युद्धात अधिक प्रमाणात दारूगोळ्याचा वापर होईल. युद्धापूर्वीचा साठा आधीच अपुरा होता. भविष्यात संघर्ष उद्भवल्यास आजची पातळी अमेरिकेच्या कारवायांवर मर्यादा घालू शकते, याकडे लष्करी तज्ज्ञ लक्ष वेधतात. इराणच्या चिवट संघर्षात अमेरिकेची शस्त्रसंधीची तयारी हे त्याचेच निदर्शक ठरते.