US Military Losses in Iran War 2026 : पाच आठवड्यांचा कालावधी लोटला तरीही पश्चिम आशियातील युद्धाची धग अद्यापही कायम आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील अमेरिका व इस्रायलच्या मित्रदेशांवर एकापाठोपाठ एक हल्ले केले. या भीषण युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हा संघर्ष थांबविण्यासाठी सध्या जगभरातील अनेक देश प्रयत्नशील आहेत. यादरम्यान इराणबरोबरच्या युद्धात अमेरिकेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा जगभरातील विविध माध्यमांनी केला आहे, त्याविषयीचा हा आढावा…

युद्धात अमेरिकेचे किती नुकसान?

युद्धाच्या पहिल्या तीन आठवड्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास अमेरिकेने सुमारे १.४ ते २.९ अब्ज डॉलर्स (१३,२४१ कोटी ते २७,४२८ कोटी रुपये) किमतीची मालमत्ता गमावल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामध्ये युद्धभूमीवरील लष्करी साधने, शस्त्रसाठा आणि इतर मालमत्तेचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. युद्धाचा वाढता खर्च पाहता अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (पेंटागॉन) व्हाईट हाऊसकडे तब्बल २०० अब्ज डॉलर्स (सुमारे १८,९१,६०० कोटी रुपये) निधीची मागणी केल्याचे समोर आले आहे. ताज्या वृत्तानुसार, इराणने अमेरिकेची अत्यंत महत्त्वाची हवाई संरक्षण यंत्रणा असलेले ‘ई-३ सेंट्री अवाक्स’ (E-3 Sentry AWACS) विमान पाडले आहे.

हवेत इंधन भरणारे विमान कोसळले

‘अवाक्स’ हे केवळ लढाऊ विमान नसून ते हवेत उडणारे एक शक्तिशाली रडार आहे. या विमानावर फिरत्या रडारचा डोम बसवलेला असल्याने ते शेकडो किलोमीटर दूर असलेल्या शत्रूंच्या विमानांचा तसेच क्षेपणास्त्राचा अगदी सहजपणे नायनाट करू शकते. अत्यंत प्रगत असलेल्या अवाक्स विमानाची सलग आठ तास उड्डाण करण्याची क्षमता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या विमानात हवेतच इंधन भरण्याची सोय आहे. अमेरिकेच्या ताफ्यात अशी केवळ १६ विमाने असून त्यापैकी सहा विमाने सध्या पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये तैनात असल्याचे सांगितले जात आहे. इराणबरोबरच्या युद्धात अवाक्स विमान गमावल्याने ट्रम्प प्रशासनाला मोठ्या धक्क्यासह आर्थिक फटकाही बसल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा : Donald Trump Military Options Iran: इराण युद्धासाठी अमेरिका १० हजार सैनिक मध्य पूर्वेत पाठवणार, काय आहे ट्रम्प यांचा ‘एंडगेम’?

अत्यंत प्रगत लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त

गेल्या आठवड्यात इराकच्या पश्चिम भागात अमेरिकेचे KC135 स्ट्रॅटोटँकर हे महत्त्वाचे विमान कोसळले होते. या भीषण अपघातात अमेरिकन लष्कराचे सहा जवान शहीद झाले. हवेत इंधन भरणाऱ्या या विमानाला आपल्या प्रगत रडार यंत्रणेने लक्ष्य केल्याचा दावा इराणने केला होता. मात्र, अमेरिकेने त्यांचा हा दावा फेटाळून लावत तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याचे स्पष्ट केले होते. गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ अमेरिकन सैन्याला युद्धात मदत करणारे विमान अचानक कोसळल्याने अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेकडे सध्या KC135 श्रेणीतील जवळपास ३९६ विमाने आहेत. मात्र, या विमानांचे उत्पादन आता कायमचे बंद करण्यात आल्याने हे नुकसान भरून काढणे अमेरिकेसाठी कठीण जाणार आहे.

अमेरिकेने ‘एफ-१५’ विमानही गमावले

३ मार्च रोजी कुवेतमध्ये अमेरिकेचे ‘एफ-१५ स्ट्राईक ईगल’ या श्रेणीतील लढाऊ विमान कोसळले. अमेरिकन सैन्यानेच चुकून केलेल्या गोळीबारामुळे हे विमान अपघातग्रस्त झाल्याचा दावा केला जात आहे. ‘एफ-१५ स्ट्राईक ईगल’ विमान शत्रूंच्या हद्दीत घुसखोरी करून त्यांचे लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात पटाईत मानले जाते. हे विमान १९७० च्या दशकातील प्रसिद्ध ‘मॅकडोनेल डग्लस एफ-१५ अ’ या विमानाचे अत्याधुनिक रूप आहे. तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या ‘MiG-25’ विमानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती. एफ-१५ विमानाचा इतिहास अत्यंत गौरवशाली राहिला आहे. आजवरच्या अनेक युद्धांमध्ये या विमानाने शत्रूची १०४ विमाने पाडली आहेत; परंतु इराणबरोबरच्या संघर्षात हे विमान कोसळल्याने अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे.

‘F-35A लाइटनिंग II’ विमानही दुर्घटनाग्रस्त

१९ नोव्हेंबर रोजी इराणने आपल्या हवाई हद्दीत अमेरिकेचे F-35A लाइटनिंग II हे विमान पाडल्याचा दावा केला. अमेरिकेच्या सेंटकॉमनेही विमान पाडले गेल्याची पुष्टी केली असून वैमानिक सुरक्षित असल्याचे सांगितले. जगातील सर्वात प्रगत बहुउद्देशीय लढाऊ विमान पाडले जाण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. हे विमान तयार करण्यासाठी अमेरिकेला तब्बल दोन ट्रिलियन डॉलर्सचा (१८,९१,६०,००० कोटी रुपये) खर्च आला होता.

हेही वाचा : Food Inflation: पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात अन्नधान्य महाग होईल का? किती साठा उपलब्ध?

अमेरिकेने गमावले १२ अत्याधुनिक ड्रोन

युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने किमान १२ अत्याधुनिक ड्रोन्स गमावल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी ??? ड्रोन्स इराणच्या क्षेपणास्त्रांनी पाडले, तीन ड्रोन्स जमिनीवर नष्ट झाले, तर एक ड्रोन इराणच्या मित्रदेशाने पाडल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या एका ड्रोनची किंमत सुमारे १५१ कोटी ते २८३ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. हे ड्रोन अत्यंत अचूक हल्ले करण्यात सक्षम मानले जात होते.

अमेरिकेची अँटी-मिसाईल प्रणाली निकामी

युएईमधील अल-रुवैस तळावर इराणी सैन्याने अमेरिकेची ‘थाड’ ही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचे वृत्त आहे. ही प्रणाली शत्रूची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे ओळखून त्यांचा हवेतच नायनाट करण्यात सक्षम मानली जात होती. या एका ‘थाड’ युनिटची किंमत एक ते दोन अब्ज डॉलर्स (सुमारे ९,४५८ ते १८,९१६ कोटी) रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय ‘थाड’ प्रणालीला दिशा दाखवण्याचे काम करणाऱ्या ‘AN/TPY-2’ या रडार यंत्रणेलाही इराणने नष्ट केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या या अवाढव्य नुकसानीमुळे त्यांच्या लष्करी वर्चस्वाला धक्का बसला आहे, त्यामुळे पश्चिम आशियातील युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.