युद्धात सैनिकांचा मृत्यू होणे ही दुर्दैवी बाब असतेच; पण मोठ्या संख्येने सैनिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्नही लष्करासमोर उभा राहतो. अमेरिकेच्या लष्करासमोर तब्बल सात दशकांनंतर अशीच काहीशी कठीण परिस्थिती उभी राहिल्याचे वृत्त आहे. इराणसोबतचा संघर्ष वाढण्याची शक्यता असताना अमेरिकन सैनिकांना युद्धभूमीवर सामूहिक कबरी खोदण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची वृत्त समोर आले आहे.
अमेरिकेच्या लष्कराने १९५० ते १९५३ या काळात झालेल्या कोरियन युद्धादरम्यान अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येऊ शकते, अशी तयारी लष्कराने केल्याचा कोणताही प्रसंग उद्भवला नाही. मात्र, आता इराणसोबत युद्धाचा धोका वाढत असल्याने भविष्यात मोठ्या संख्येने अमेरिकन सैनिकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी शक्यता गृहीत धरून ही तयारी केली जात असल्याचे न्यूजवीक मासिकाने वृत्तात म्हटले आहे.
या तयारीमागे अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूबाबत व्यक्त होत असलेल्या चिंताही आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष सुरू असताना अमेरिकेचे किती सैनिक मृत्युमुखी पडले, यावरूनही प्रश्न उपस्थित झाले आहेत. वॉशिंग्टन पोस्टने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या संघर्षादरम्यान सुमारे २२ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. ही संख्या पेंटागॉनच्या अधिकृत सार्वजनिक नोंदीतील आकडेवारीपेक्षा चारने अधिक होती. मात्र, या सर्व सैनिकांचा मृत्यू इराणसोबत सुरु असलेल्या संघर्षामुळेच झाला होता, असा कोणताही उल्लेख वृत्तात नाही. पश्चिम आशियात तैनात असताना संघर्षाच्या काळात त्या सैनिकांचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. पेंटागॉनचे प्रमुख आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावत ते‘पूर्णपणे खोटे’ असल्याचे म्हटले आहे.
सामूहिक दफनविधीचं प्रशिक्षण नेमकं कसं दिलं जातं?
सामूहिक कबरी खोदण्याची तयारी म्हणजे केवळ मोठे खड्डे तयार करणे नव्हे. युद्धभूमीवर अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवणे, ते सुरक्षित ठेवणे आणि नंतर त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवणे, ही मोठी जबाबदारी लष्करावर असते. अमेरिकन लष्कराचे सध्याचे प्रशिक्षण याच प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती आहे.
न्यूजवीकने २९ ऑक्टोबरला दिलेल्या वृत्तानुसार, ‘ऑपरेशन ड्रॅगन कोव्हनंट फेज २’ या नावाने सप्टेंबरमध्ये उत्तर कॅरोलिनातील फोर्ट ब्रॅग येथे हे सराव प्रशिक्षण सुरू झाले आहे. यामध्ये अमेरिकन लष्कराच्या थर्ड कॉर्प्स सस्टेनमेंट कमांड आणि ट्वेंटीथ इंजिनिअर ब्रिगेडमधील जवान सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत लष्करी धर्मगुरू आणि धार्मिक मदतकार्याशी संबंधित कर्मचारीही या सरावात सहभागी झाले.
या प्रशिक्षणासाठी मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. बुलडोझर, खोदकाम करणारी यंत्रे आणि एक्स्कॅव्हेटरच्या मदतीने तात्पुरत्या दफनस्थळांची निर्मिती करण्यात आली. मोठ्या युद्धात अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या मृतदेहांची योग्य प्रकारे हाताळणी कशी करायची, याचा सराव करण्यात आला. मृतदेहांची ओळख पटेपर्यंत आणि ते वॉशिंग्टनला पाठवण्याची व्यवस्था होईपर्यंत ते सुरक्षित स्थितीत कसे जतन करता येतील, याचीही चाचपणी या सरावातून करण्यात आली.
मोठ्या संख्येत तयार करण्यात दफनस्थळावरून या प्रशिक्षणाची व्याप्ती किती आहे ते लक्षात येते. अमेरिकन लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, कोरियन युद्धानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या सामूहिक दफनाची गरज भासलेली नाही. १९५० ते १९५३ या कोरियन युद्धात अमेरिकेचे सुमारे ३६ हजार ५१५ सैनिक मारले गेले किंवा बेपत्ता झाले, तर आणखी ७ हजार २४५ सैनिक शत्रूंच्या तावडीत सापडले होते.
उत्तर कॅरोलिनातील सरावासाठी पाच लांब चर खोदून दफनस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये एकावेळी १०० मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. लष्कराच्या माहितीनुसार, प्रत्येक दफनासाठी जागा तयार करायला जवानांना अवजड यंत्रांच्या मदतीने सरासरी एक तास १५ मिनिटं लागली.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आठ बुलडोझर आणि चार लष्करी एक्स्कॅव्हेटरच्या मदतीने २४ तासांत तब्बल २ हजार ४०० सैनिकांचे मृतदेह तात्पुरते दफन करता येऊ शकतात. मात्र, कमी वेळेत मोठ्या संख्येने मृतदेह दफन करणे एवढाच या सरावाचा उद्देश नाही. मृतदेहांची ओळख पटवता यावी आणि त्यांनंतर सन्मानाने वॉशिंग्टनला परत नेता यावे, यासाठी ते सुरक्षित ठेवण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे.
या प्रशिक्षणामागचा उद्देश नेमका काय?
मोठ्या युद्धात अनेक सैनिकांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यास प्रत्येकावर स्वतंत्रपणे अंत्यसंस्कार करणे किंवा धार्मिक विधी पार पाडणे शक्य होईलच असे नाही. अशा परिस्थितीत मृतदेहांची ओळख पटवण्यापासून ते त्यांच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया कशी हाताळायची, याचे प्रशिक्षण दिले जाते. युद्धाच्या धावपळीत घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी, आधीच ठरवलेल्या पद्धतीनुसार ही प्रक्रिया पार पाडता यावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.
थर्ड कॉर्प्स सस्टेनमेंट कमांडचे सार्जंट फर्स्ट क्लास डेल्बर्ट रुएडे यांनी न्यूजवीकशी संवाद साधताना म्हटले की, युद्धकाळात मृत सैनिकांचे मृतदेह शोधणे, त्यांना सन्मान हाताळणे, यासाठी एक कार्यप्रणाली स्थापित करणे हा प्रशिक्षणामागील उद्देश आहे. “उद्या युद्ध सुरू झालं, तर प्रत्येक गोष्ट ऐनवेळी ठरवावी लागेल. तशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही शास्त्रीय आणि प्रत्यक्ष सरावातून तपासलेल्या पद्धती विकसित करत आहोत. जेणेकरुन मृत सैनिकांची योग्य नोंद ठेवता येईल आणि त्यांची सन्मानाने काळजी घेता येईल,” असे रुएडे यांनी नमूद केले.
या प्रशिक्षणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे धार्मिक विधी. अमेरिकन लष्करातील धर्मगुरू आणि धार्मिक मदतकार्याशी संबंधित कर्मचाऱ्यांनी २० वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच युद्धभूमीवरील तात्पुरत्या दफनविधींशी संबंधित धार्मिक मदतीचे प्रशिक्षण घेतले. म्हणजेच, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली तरी मृत सैनिकांचा सन्मान राखता यावा आणि त्यांच्या धार्मिक परंपरांचाही शक्य तितका आदर करता यावा, याची तयारीही या प्रशिक्षणात केली जात आहे.
उत्तर कोरियात किती अमेरिकन सैनिकांचे दफन केले?
अमेरिकेच्या लष्कराला सामूहिक दफनाची तयारी करण्याची वेळ का आली, हे समजून घेण्यासाठी कोरियन युद्धाचा इतिहासही महत्त्वाचा आहे. या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या अनेक अमेरिकन सैनिकांचे मृतदेह आजही सापडलेले नाहीत. २०१८ मध्ये बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांतील हजारो सैनिकांचा मृतदेह अद्याप सापडलेच नाहीत. टेक्सासमधील ४३१, कॅलिफोर्नियातील ५९३, तर अलास्कातील एका सैनिकाचा ठावठिकाणा लागला नाही.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अंदाजानुसार, सध्या उत्तर कोरियाच्या हद्दीत असलेल्या भागांमध्ये सुमारे ५ हजार ३०० अमेरिकन सैनिकांचे मृतदेह अजूनही सापडले नाहीत. त्यापैकी अनेक मृतदेहांचे नेमके कुठे दफन केले गेले, याची माहिती असल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला होता.
मात्र, गेल्या २५ वर्षांतील इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धांचा अनुभव यापेक्षा वेगळा होता. त्या संघर्षांमध्ये कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांचे मृतदेह तातडीने वॉशिंग्टनला परत आणले जात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तात्पुरती दफनस्थळे उभारण्याची गरज भासलीच नव्हती.
कोरियन युद्धानंतर प्रथमच अमेरिकन लष्कराला पुन्हा अशा मोठ्या प्रमाणावरील जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन तयारी करावी लागत आहे. इराणसोबतचा संघर्ष नेमकं कोणतं वळण घेणार, हे सांगता येत नसल्याने या प्रशिक्षण महत्वाचे मानले जात आहे. युद्ध झाल्यास किती मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते आणि मृत सैनिकांचा सन्मान राखण्यासाठी लष्कराला किती व्यापक तयारी करावी लागू शकते, याचे भीषण वास्तव या प्रशिक्षणातून समोर येत आहे.
