अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याने पश्चिम आशियातील पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही देशांकडून एकमेकांवर सातत्याने हल्ले सुरूच असल्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मालवाहू जहाजांची वाहतूक ठप्प झाली. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कडाडल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. यादरम्यान आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या जलमार्गात अमेरिकेची एक मानवरहित गुप्तहेर पाणबुडी ताब्यात घेतल्याचा दावा इराणने केला. दुसरीकडे- अमेरिकेने मात्र त्यांचा हा दावा फेटाळून लावताना एका दिवसापूर्वीच ही पाणबुडी तांत्रिक बिघाडामुळे निकामी झाल्याचे सांगितले.

इराणच्या नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीत ताब्यात घेतलेली अमेरिकेची’डाइव्ह-एलडी’ ही पाणबुडी पूर्णपणे मानवरहित असल्याचा दावा तेथील सरकारी माध्यमांनी केला. या अत्याधुनिक पाणबुडीची निर्मिती कॅलिफोर्नियास्थित संरक्षण तंत्रज्ञान कंपनीकडून करण्यात आलेली असून तिचा वापर गुप्तचर माहिती गोळा करणे, समुद्रातील निरीक्षण, सर्वेक्षण आणि इतर लष्करी उद्देशांसाठी केला जाऊ शकतो, असे वृत्तात नमूद करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या पाणबुडीचे फोटो तसेच सविस्तर व्हिडीओ फुटेज लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे इराणच्या नौदलाने सांगितले. यावर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केली आहे. मध्यंतरी पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाली होती. त्याचवेळी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये शांतता करारासाठी काही बैठकाही झाल्या. मात्र, कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे पश्चिम आशियातील हा संघर्ष अद्यापही धुमसतच असल्याचे दिसून येते.

अमेरिकेसाठी पाणबुडीच्या ताब्याचा अर्थ काय?

या आठवड्याच्या सुरुवातीला इराणने आखातातील अमेरिकेच्या काही तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना अमेरिकेने कच्या तेलाची वाहतूक करणाऱ्या पाच इराणी जहाजांना नष्ट केल्याचा दावा केला. होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या संवेदनशील आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात अमेरिकेच्या मानवरहित पाणबुडीचा इराणने घेतलेला ताबा हा दोन्ही देशांमधील मोठ्या संघर्षाचे कारण ठरू शकतो. इराणकडून या उपकरणातून अमेरिकेच्या लष्करी तंत्रज्ञानासंदर्भातील संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. तसेच, ही पाणबुडी रशिया किंवा चीनसारख्या देशांच्या हाती तांत्रिक अभ्यासासाठी सोपवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सागरी सुरक्षेवर नियंत्रण असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेसाठी हा एक मोठा लष्करी धक्का मानला जात आहे.

डाइव्ह-एलडी पाणबुडीची नेमकी काय आहे?

जागतिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘डाइव्ह-एलडी’ ही अमेरिकन नौदलातील अत्याधुनिक पाणीबुडी आहे. सुरुवातीला या मानवरहित पाणबुडीची निर्मिती Dive Technologies या कंपनीने केली होती. त्यानंतर अमेरिकेतील Anduril कंपनीने त्यात अत्यंत प्रगत तंत्रज्ञान बसवण्याचे काम केले. या पाणबुडीची लांबी सुमारे ५.८ मीटर आणि रुंदी १.२ मीटर आणि तिचे वजन जवळपास तीन टन असल्याचे सांगितले जाते. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, या एका पाणबुडीची किंमत सुमारे २५ लाख डॉलर्स (अंदाजे २३.७८ कोटी रुपये) इतकी आहे. आपल्या गरजेनुसार केलेल्या रचनेवर अवलंबून ही पाणबुडी सलग १० दिवसांपर्यंत समुद्रात तैनात राहू शकते. ती पूर्णपणे मानवरहित पद्धतीने कार्यरत राहून ६,००० मीटर (सुमारे २०,००० फूट) खोलीपर्यंत जाऊ शकते.

डाइव्ह-एलडी पाणबुडीची वैशिष्ट्ये कोणती?

सागरी सुरुंगांचा शोध घेणे आणि नष्ट करणे, समुद्राच्या तळाचा नकाशा तयार करणे, पाण्याखालील गुप्त माहिती व टेहळणी करणे तसेच समुद्रातील पायाभूत सुविधांची तपासणी यांसारख्या विविध मोहिमा या पाणबुडीच्या माध्यमांतून पार पाडल्या जाऊ शकतात. कंपनीने या उपकरणाचे वर्णन अत्यंत जोखमीच्या मोहिमांसाठी तयार केलेली यंत्रणा असे केले आहे. यादरम्यान पाणबुडी तयार करणाऱ्या कंपनीतील एका अधिकाऱ्याने जागतिक माध्यमांना सांगितले की, ‘डाइव्ह-एलडी’ ही सुरुवातीपासूनच अशा धोकादायक वातावरणात काम करण्यासाठी तयार केली गेली आहे, जिथे हे उपकरण गमावले जाण्याची शक्यता आधीच गृहीत धरलेली असते. समुद्राखालील अत्यंत धोकादायक मोहिमांमध्ये सैनिकांचा जीव धोक्यात येऊ नये, हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या मोहिमांमध्ये अनेक महिने आणि हजारो तास यशस्वीपणे काम करून या पाणबुडीने आपले मोठे योगदान आधीच सिद्ध केले आहे. त्यांनी आपले उपकरण गमावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी या घटनेचे गांभीर्य मात्र फेटाळून लावले आहे. या घटनेवर अमेरिकेकडून अद्याप अधिकृत सार्वजनिक निवेदन आलेले नाही.

इराणसाठी या पाणबुडीचे महत्त्व काय?

इराणच्या नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेची एक मानवरहित गुप्तहेर पाणबुडी जप्त केल्याचा दावा केला. आज पहाटे केलेल्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि योजनाबद्ध गुप्तचर कारवाईत ही पाणबुडी पकडल्याचे त्यांनी मंगळवारी शेअर केलेल्या निवेदनात नमूद केले. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, या पाणबुडीत त्यामध्ये कोणतीही गोपनीय यंत्रणा नव्हती. त्यामुळे संवेदनशील लष्करी उपकरणे किंवा मोहिमेशी संबंधित महत्त्वाची माहिती लीक होण्याचा धोका तुलनेने कमी आहे. तरीदेखील ही पाणबुडी पूर्णपणे सुरक्षित अवस्थेत इराणच्या हाती लागली असेल तर त्यातून या उपकरणाची रचना, स्वायत्तपणे काम करण्याची क्षमता, सेन्सर्स तसेच त्याच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा याबाबत इराणला महत्त्वाची माहिती मिळू शकते. यापूर्वीही अमेरिकेच्या ताब्यातील लष्करी तंत्रज्ञानातून गुप्तचर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा इराणचा इतिहास आहे. २०११ मध्ये अमेरिकेचे RQ-170 Sentinel हे अत्याधुनिक स्टेल्थ ड्रोन पाडल्यानंतर इराणने ते ताब्यात घेतले होते. ही घटना त्यातील सर्वात उल्लेखनीय उदाहरण मानली जाते.