अमेरिकेत ९ दशकांच्या कालखंडानंतर पहिल्यादाच एका आरोपीला सार्वजनिकरीत्या मृत्युदंड दिला जाणार आहे. बहुचर्चित ‘फोर्ट हूड’ हत्याकांडातील आरोपी निदाल हसन याला गोळ्या घालून ठार केले जाणार आहे. या शिक्षेचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी दिली आहे. २००९ मध्ये आरोपी निदाल हसन याने टेक्सास शहरातील लष्करी तळावर अंदाधूंद गोळीबार केला होता. त्यात जवळपास १३ सैनिकांचा मृत्यू झाला होता, तर कित्येकजण गंभीर जखमी झाले होते. या घटनेला १७ वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर आता त्याच लष्करी तळावर हसनला मृत्युदंड दिला जाणार आहे. या निर्णयामुळे सार्वजनिकरीत्या मृत्युदंडाची शिक्षा देणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत अमेरिकेचाही समावेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर जगातील कोणते देश सार्वजनिकरीत्या मृत्युदंड देतात? त्याविषयीचा हा आढावा…
अमेरिकेत मृत्युदंडाच्या शिक्षेचे होणार थेट प्रक्षेपण
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी ‘रिअल अमेरिका व्हॉइस’ या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आरोपी निदाल हसन याला सैनिकांच्या गोळीबार पथकाद्वारे थेट मृत्युदंड दिला जाईल. ही कारवाई सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणार असून लोकांना ती पाहता येईल यासाठी व्यवस्था केली जाईल. हत्याकांडासारख्या गुन्ह्यांचे गंभीर परिणाम काय असतात हे लोकांना समजणे आवश्यक आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता आरोपीला मृत्युदंड देण्यात येईल. अमेरिकन सैन्यदलातील एक पथक रायफलने गोळीबार करून हसनला शिक्षा देतील. २००९ मध्ये त्याने केलेल्या हल्ल्याची वेळ आणि आता त्याला दिल्या जाणाऱ्या मृत्युदंडाची वेळ एकच ठेवण्यात आली आहे, असेही पीट हेगसेथ यांनी सांगितले.
अमेरिकेत सार्वजनिकरीत्या मृत्युदंडाचा इतिहास काय?
अमेरिकेत एखाद्या आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देताना त्या ठिकाणी काही पत्रकार आणि पीडितांच्या कुटुंबीयांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. गेल्या अनेक दशकांच्या कालखंडात या देशात सामान्य जनतेसमोर एकाही आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आलेली नाही. १९३६ मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा एका आरोपीला सार्वजनिकरीत्या मृत्युदंड देण्यात आला होता. त्यावेळी केंटकी येथे बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या रेनी बेथिया याला २०,००० लोकांच्या उपस्थितीत फाशी देण्यात आली होती. यादरम्यान मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांच्या प्रकरणांमध्ये काम करणारे वकील जॉन मिल्स यांनी बीबीसीशी बोलताना ही घटना अमेरिकेसाठी अभूतपूर्व असल्याचे सांगितले. त्याचवेळी काही कायदेतज्ज्ञांनी जाहीर नाराजी व्यक्त करत हा एक दुर्दैवी निर्णय असल्याचे म्हटले. मृत्युदंडाच्या कारवाईचे थेट प्रक्षेपण करणे हे मध्ययुगीन काळाची आठवण करून देणारे आहे. एक समाज म्हणून आपण या गोष्टींच्या खूप पुढे आलो होतो आणि आजवर मला तरी तसेच वाटत होते, अशी प्रतिक्रिया येल विद्यापीठातील तज्ज्ञ यूजीन आर. फिडेल यांनी बीबीसीला दिली.
थेट प्रक्षेपण कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर?
अमेरिकेतील सार्वजनिक मृत्युदंडाचे थेट प्रक्षेपण नेमके कुठे केले जाणार यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण सध्या अनेक प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी अशा हिंसक घटनांच्या प्रक्षेपणाला थेटपणे बंदी घातलेली आहे. मेटा या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही हिंसक घटनेला अजिबात थारा नाही. तसेच अमेरिकेतील टिकटॉकनेही अशाच पद्धतीचे नियम लागू केलेले आहेत. एक्स या प्लॅटफॉर्मवरही कोणताही आक्षेपार्ह मजकूर शेअर केला जाऊ शकत नाही, त्यामुळे निदान हसन याला दिल्या जाणाऱ्या मृत्युदंडाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी कोणत्या माध्यमाचा वापर केला जाणार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या नियमांशी त्याचा मेळ कसा घातला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
निदाल हसनने १३ सैनिकांची हत्या कशी केली?
आरोपी निदाल हसन हा अमेरिकन सैन्यदलात अधिकारी आणि मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. ५ नोव्हेंबर २००९ रोजी तो फोर्ट हूड येथील लष्करी तळावरील वैद्यकीय इमारतीत गेला. त्यावेळी त्या ठिकाणी अनेक सैनिकांची वैद्यकीय तपासणी सुरू होती. तेव्हा हसनने अचानक ‘अल्लाहू अकबर’ अशी घोषणा देत लेझर-साइट असलेल्या रायफलमधून गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात १३ सैनिकांचा जागीच मृत्यू झाला, तर ३२ जण गंभीर जखमी झाले होते. या भ्याड हल्ल्यानंतर अमेरिकेत मोठी संतापाची लाट उसळली होती. पुढे २०१३ मध्ये आरोपी हसन याला पूर्वनियोजित हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षाने न्यायालयात केलेल्या युक्तिवादानुसार, अफगाणिस्तानमध्ये तैनात होण्यास नकार देणे आणि जिहादच्या भावनेतून जास्तीत जास्त अमेरिकन सैनिकांना ठार मारणे असा आरोपी हसनचा मुख्य हेतू होता.
ट्रम्प यांच्या स्वाक्षरीने मृत्युदंडाचा मार्ग मोकळा
५ ऑक्टोबर २०२६ रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हसनला गोळ्या झाडून मृत्युदंड देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. विशेष बाब म्हणजे, आठवडाभरापूर्वी टेनेसी राज्यातील क्रिस्टा पाईक या महिलेला प्राणघातक इंजेक्शन देऊन मृत्युदंड देण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर तिथल्या राज्यपालांनी या वर्षातील सर्व आरोपींच्या मृत्युदंडाच्या शिक्षांना तात्पुरती स्थगिती देऊन स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले होते. या घटनेनंतर काही दिवसांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी हसनच्या शिक्षेला मंजुरी दिली आणि त्याला मृत्युदंड देण्याचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या या निर्णयाचे अमेरिकन नागरिकांनी तोंडभरून कौतुकही केले.
जगातील कोणते देश सार्वजनिक मृत्यूदंड देतात?
मानवाधिकार संघटना अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये जगभरात सार्वजनिकरीत्या दिल्या गेलेल्या किमान १७ मृत्युदंडांच्या घटना नोंदवण्यात आल्या. त्यापैकी सहा घटना तालिबानच्या नियंत्रणाखालील अफगाणिस्तानमध्ये, तर ११ घटना इराणमधील होत्या. आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये सार्वजनिकरीत्या मृत्युदंड दिलेल्या घटनांची सर्वाधिक संख्या इराणमध्ये नोंदवण्यात आली. इराणमध्ये व्यभिचार, वेश्याव्यवसाय, वेश्याव्यवसायासाठी दलाली, समलैंगिक संबंध आणि अमली पदार्थांची तस्करी यांसारख्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची तरतूद आहे. देशात सार्वजनिकरीत्या मृत्युदंड देण्यासाठी प्रामुख्याने फाशीच्या पद्धतीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील सार्वजनिक फाशीच्या घटनांचा निषेध केला होता. तालिबानने अफगाणिस्तानची सूत्रे हाती घेतल्यानंतर तिथे पुन्हा कठोर शरिया कायदा लागू केला. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिकरीत्या मृत्युदंड देण्याची प्रथा पुन्हा सुरू झाली.
अफगाणिस्तान, सौदी अरेबियातही सार्वजनिक मृत्युदंड
२०२५ मध्ये अफगाणिस्तानमध्ये सार्वजनिकरीत्या मृत्युदंड दिल्याच्या सहा घटना घडल्या. त्यापैकी एका प्रकरणातील आरोपीला थेट क्रीडा मैदानावरच मृत्युदंड देण्यात आला होता. अफगाणिस्तानच्या न्यायव्यवस्थेत निष्पक्षतेचा अभाव असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तालिबानच्या नियंत्रणाखालील न्यायव्यवस्थेत न्यायिक स्वायत्तता आणि योग्य न्यायप्रक्रियेचा अभाव असल्यामुळे मृत्युदंडाचा वापर चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अॅम्नेस्टीच्या माहितीनुसार, सौदी अरेबियामध्ये या वर्षात आतापर्यंत १०० हून अधिक फाशीच्या शिक्षांची अंमलबजावणी झाली, त्यातील अनेक शिक्षा जाहीर स्वरूपाच्या होत्या. या मुस्लीमबहुल देशात प्रामुख्याने शिरच्छेद करून किंवा व्यभिचारासारख्या गुन्ह्यांसाठी दगडधोंड्यांनी ठेचून मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.
उत्तर कोरियात आणि सोमालियातही कठोर शिक्षा
उत्तर कोरियाने २००७ मध्ये सार्वजनिकरीत्या मृत्युदंड देण्याची प्रथा पुन्हा सुरू केली होती. या देशात प्रामुख्याने गोळीबार पथकाद्वारे मृत्युदंड दिला जातो. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२४ या कालावधीत उत्तर कोरियात किमान १५३ जणांना मृत्युदंड देण्यात आला. त्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये सार्वजनिकरीत्या मृत्युदंड देण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. धर्म, अंधश्रद्धा आणि परदेशी सांस्कृतिक आशयाशी संबंधित गुन्ह्यांसाठी उत्तर कोरियात मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. यामध्ये कोरियन नाटके म्हणजेच के-ड्रामा पाहणे आणि के-पॉप संगीत ऐकणे यांसारख्या गोष्टींचाही समावेश असल्याचे अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. आफ्रिकेतील सोमालिया या देशात लष्करी दंडसंहितेअंतर्गत गोळीबार करून सार्वजनिकरीत्या मृत्युदंड देण्याची तरतूद आहे. दहशतवाद, देशद्रोह आणि हेरगिरी यांसारख्या गुन्ह्यांसाठी सोमालियात मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.
