आपल्या अचाट निर्णयांसाठी एव्हाना प्रसिद्धी पावलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा करून सगळ्या जगाचे लक्ष पुन्हा वेधून घेतले आहे. अमेरिकेचे संरक्षण करण्यासाठी ‘गोल्डन डोम’ ही सुरक्षा प्रणाली विकसित करण्याचे त्यांनी मंगळवारी जाहीर केले. या मोहिमेद्वारे अमेरिका आता थेट अंतराळामध्ये क्षेपणास्त्रे तैनात करणार आहे. याचा परिणाम काय होईल? चीन, रशिया या योजनेकडे कसे बघतात? यामुळे जागतिक अशांती आणि अंतराळयुद्धाचा धोका अधिक वाढणार का?

‘गोल्डन डोम’ योजना काय आहे?

अमेरिकेवर शत्रूराष्ट्राकडून होणारा कोणताही संभाव्य क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ला परतवून लावण्यासाठी देशावर एक आभासी छप्पर उभारणे, ही ट्रम्प यांच्या गोल्डन डोमची मूळ संकल्पना… यामध्ये जमिनीवरील यंत्रणा असतीलच, पण आता थेट अंतराळात क्षेपणास्त्रे तैनात करण्याची ट्रम्प यांची संकल्पना आहे. या मोहिमेचे बारकावे अद्याप समोर आले नसले, तरी याद्वारे जमिनीवर आणि अंतराळात रडार, इंटरसेप्टर आणि क्षेपणास्त्रांचे जाळे अमेरिकेला विणायचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगाच्या दुसऱ्या टोकावरून किंवा अगदी अंतराळातून अमेरिकेवर एखादा हल्ला झाला, तर तो परतविण्याची क्षमता यातून विकसित होईल, असा विश्वास ट्रम्प यांनी बोलून दाखविला. तर “कोणत्याही प्रकारची क्रूझ मिसाईल, बॅलेस्टिक मिसाईल, हायपरसॉनिक मिसाईल किंवा ड्रोन अमेरिकेच्या दिशेने येत असतील, मग त्यावर पारंपरिक स्फोटके असोत किंवा अण्वस्त्रे, हवेतच नष्ट करणारी ही यंत्रणा असेल,” असे संरक्षणमंत्री पिट हेगसेथ यांनी स्पष्ट केले. एकूण १७५ अब्ज डॉलरची ही योजना असून सुरुवातीला २५ अब्ज डॉलर ट्रम्प यांनी मंजूर केले आहेत. आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी, म्हणजे २०२९पर्यंत अमेरिकेवरील हे ‘सोनेरी छत’ अस्तित्वात यावे, असा त्यांचा आग्रह आहे. अमेरिकेच्या ‘अंतराळ दला’चे (स्पेस फोर्स) प्रमुख जनरल मायकेल गॉटलिन यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी असेल. ट्रम्प यांनी अल्प, मध्यम आणि उच्चकोटीची सुरक्षा अशा तीन योजनांमधून मध्यम सुरक्षेची योजना निवडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेने हे नाव उचलले ते इस्रायलच्या ‘आयर्न डोम’वरून प्रेरणा घेऊनच…

इस्रायलचे ‘आयर्न डोम’ कसे आहे?

चारही बाजूंनी अरब राष्ट्रांनी वेढलेला आणि इराणने पोसलेल्या ‘ॲक्सिस ऑफ रेझिस्टन’मधील दहशतवादी टोळ्यांकडून हल्ले होण्याची भीती असलेला इस्रायल हा कायमच सावध असतो. त्यातच ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये सैन्य घुसविले. त्यावेळी इराणसह हमास, लेबनॉनमधील हेजबोला, येमेनमधील हुथी या इराणपुरस्कृत अतिरेक्यांकडून इस्रायलला लक्ष्य केले गेले. इराणने एकाच वेळी शेकडो क्षेपणास्त्रे डागली, मात्र त्यातील एकही मोठी हानी करू शकले नाही. ‘आयर्न डोम’ने (पोलादी छत) प्रत्येक हल्ला निष्प्रभ केला. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे (इराण, येमेनमधून डागलेली) भेदण्यासाठी ‘द ॲरो’ ही प्रणाली तर लेबनॉनसारख्या शेजारी देशातून आलेली मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे ‘डेव्हिड्स स्लिंग’ वापरून नष्ट केली जातात. या एकत्रित प्रणालीला ‘आयर्न डोम’ संबोधले जात असले, तरी यामध्ये याच नावाची कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे, ड्रोन भेदणारी प्रणालीदेखील आहे. ट्रम्प यांनी ही संकल्पना आणखी पुढे नेत उपग्रहांमधील सेन्सर, रडार आणि तेथेच क्षेपणास्त्रे ठेवून ‘फादरलँड’च्या संरक्षणाचा विडा उचलला आहे. अर्थातच, यामुळे अमेरिकेचे प्रमुख प्रतिस्पर्धी, चीन आणि रशिया सावध झाले आहेत. 

चीन आणि रशियाचे म्हणणे काय?

व्यापारापासून ते जागतिक वर्चस्वापर्यंत, प्रत्येक गोष्टीत अमेरिकेशी स्पर्धा करणाऱ्या चीनमधून ‘गोल्डन डोम’बाबत अपेक्षेप्रमाणे नकारात्मक प्रतिक्रिया उमटली. हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेला धोका असून यामुळे शस्त्रस्पर्धा वाढीला लागेल, असा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी केला. अमेरिका केवळ स्वत:चे हेतू समोर ठेवून अंतराळाला युद्धभूमी बनवू पाहात आहे. कोणत्याही देशाने स्वत:ची सुरक्षा करताना इतरांच्या सुरक्षेला बाधा पोहोचवू नये, असा सल्लाही चीनने देऊ केला. याउलट रशियाने मात्र ‘गोल्डन डोम’ला सध्यातरी फारसे महत्त्व दिलेले दिसत नाही. “हा अमेरिकेचा देशांतर्गत प्रश्न आहे. अमेरिकेला जर क्षेपणास्त्र हल्ल्याची भीती वाटत असेल, तर ते निश्चितच सुरक्षा यंत्रणा विकसित करतील. सर्व राष्ट्रे हेच तर करतात,” असे क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कॉव्ह यांचे म्हणणे आहे. चीन आणि रशियाच्या प्रतिक्रिया अगदी भिन्न असल्या तरी ट्रम्प यांच्या ‘गोल्डन डोम’च्या परिणामांचा अभ्यास जगातील प्रत्येक मोठ्या राष्ट्राने, संरक्षणतज्ज्ञांनी सुरू केला आहे. त्यांच्यासमोर प्रश्न आहेत, ते म्हणजे योजना सफल होणार का, झाली तर हे सोनेरी छप्पर केव्हा अस्तित्वात येणार आणि याचे परिणाम काय होणार, हे आहेत. 

‘गोल्डन डोम’ मोहीम किती व्यवहार्य?

अंतराळामध्ये क्षेपणास्त्रे ठेवण्याची संकल्पना ही नवी नाही. शीतयुद्धाच्या काळात १९८१ ते ८९ अशी आठ वर्षे अमेरिकेचे अध्यक्ष असलेले ‘रिपब्लिकन’ रोनाल्ड रेगन यांनी सर्वप्रथम ही योजना मांडली. ‘गोल्डन डोम’ची माहिती देताना याचा उल्लेखही ट्रम्प यांनी केला. “४० वर्षांपूर्वी रेगन यांनी सुरू केलेली योजना आपल्याला पूर्ण करायची आहे,” असे ट्रम्प म्हणाले. या ४० वर्षांत तंत्रज्ञानने बरीच प्रगती केली असून उपग्रहांवर क्षेपणास्त्रे तैनात ठेवणे कोणत्याही मोठ्या देशाला सहज शक्य आहे. यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, निधी आणि स्रोतांची अमेरिकेत वानवा नाही. मात्र ट्रम्प यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी संपूर्ण गोल्डन डोम कार्यरत होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे. संरक्षणतज्ज्ञांच्या मते ही मोहीम १०० टक्के पूर्ण होण्यास १० वर्षांचा कालावधी लागू शकेल. मात्र चीन, रशिया आणि अन्य काही राष्ट्रेदेखील आपापल्या सुरक्षेच्या नावाखाली अंतराळात क्षेपणास्त्रे धाडून देतील. आधीच पृथ्वीभोवती उपग्रह, बंद पडलेल्या उपग्रहांचा कचरा एवढा झाला आहे की कधीकधी तेथे ‘वाहतूक कोंडी’ होते. त्यात आता जगातल्या महासत्तांनी तेथे स्फोटके आणि दारुगोळा नेऊन ठेवला, तर मोठ्या अपघाताची आणि त्यातून सर्वनाशाची शक्यता कितीतरी वाढते, हे लक्षात घेतले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

amol.paranjpe@expressindia.com