Donald Trump China Visit Explainer: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. जागतिक पातळीवर अस्थिरता असताना शेजारील चीनमध्ये घडत असलेल्या घडामोडींवर भारताचे बारीक लक्ष आहे. इराण युद्धामुळे चीन व अमेरिकेतील संबंधांमध्ये काही प्रमाणात कटुता आली. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर जोर दिला जाणार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची ट्रम्प भेट घेणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत टेस्लाचे इलॉन मस्क, अॅपलचे टीम कूक आणि इतर टेक कंपन्यांचे सीईओ चीन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी भागीदारी होऊ शकते. इराण युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), दुर्मिळ खनिजे, तैवान, आर्थिक निर्बंध, टॅरिफ वॉर हे विषय दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी असू शकतात. ट्रम्प – जिनपिंग भेटीचे महत्व काय आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात चीनचे आमंत्रण स्वीकारले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते. त्यानुसार आजपासून (बुधवार, १३ मे) त्यांचा चीन दौरा सुरू होत आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये झालेल्या टॅरिफ वॉरमुळे या देशांमधील संबंध ताणले गेले होते. तैवान तसेच इराण युद्धावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. इराण युद्धा इथून पुढे कोणत्या वळणावर जाईल, याबाबत अनिश्चितता आहे. इराणला पुन्हा वाटाघाटीसाठी राजी करण्यात चीन महत्वाची भूमिका बजावू शकतो. पश्चिम आशियातील परिस्थिती कशीही असो, चीनची भूमिका मात्र महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये इराण युद्धावर तोडगा काढण्याबाबत चर्चा होऊ शकते. मागील आठवड्यात इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची हे चीनच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर ट्रम्प यांच्या दौऱ्याला आता महत्व प्राप्त झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या दौऱ्यावर येत असल्याची अधिकृत घोषणा चीनने मागील आठवड्यात केली होती. ट्रम्प २०१७ मध्ये राष्ट्राध्यक्ष असताना चीनच्या दौऱ्यावर आले होते. ट्रम्प व शी जिनपिंग यांची ही आतापर्यंतची ही सातवी भेट असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्याबरोबर अमेरिकन टेक कंपन्यांच्या अनेक सीईओंना घेऊन जात आहेत. टेस्लाचे इलॉन मस्क, अॅपलचे टीम कूक, बोईंगचे केली ओर्टबर्ग हे ट्रम्प यांच्याबरोबर चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. व्हाइट हाऊस जारी केलेल्या यादीत एनव्हीडिया कंपनीच्या जेन्सेन हुआंग यांचे नाव नव्हते. परंतु, नंतर ते देखील ट्रम्प यांच्या दौऱ्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. एनव्हिडियाने तयार केलेली एच२०० (H200) ही चीप अद्याप चीनला विकण्यात आलेली नाही. हा अमेरिका व चीनमध्ये वादाचा विषय ठरला होता. या विषयावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते. ट्रम्प आपल्याबरोबर टेक कंपन्यांच्या सीईओंना घेऊन जात असल्याने दोन्ही देशांमध्ये व्यापाराबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दौऱ्यात ‘टेम्पल ऑफ हेवन’ला भेट देणार आहेत. तसेच शी जिनपिंग यांना पुढील वर्षी अमेरिकेच्या दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले जाणार आहे.

जागतिक व्यापार व आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे दोन मुद्दे देखील या दौऱ्यात महत्वाचे ठरणार आहेत. अमेरिकेची बोईंग विमाने तसेच सोयाबीन खरेदी करण्याची तयारी चीन दर्शवणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये ‘बोर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘बोर्ड ऑफ ट्रेड’ ची घोषणा होऊ शकते. यावर मागील अनेक दिवसांपासून चीन-अमेरिकेत चर्चा सुरू आहे. तसेच एआयच्या सुरक्षेसंदर्भात दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतो. तैवानच्या सामुद्रधुनीवरून अमेरिका व चीनमध्ये वारंवार मतभेद होतात. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकेने तैवानला ११ अब्ज डॉलरची संरक्षण सामग्री देण्याबाबत करार केला होता. त्याला चीनने जाहीर विरोध केला. त्यावर सारवासारव करताना ट्रम्प यांनी तैवानबाबत जिनपिंगच सर्वस्वी निर्णय घेतील. त्यांना जे करायचे आहे, ते करतील. तैवानला ते चीनचा भाग समजतात, असे ट्रम्प म्हणाले होते.

इराण युद्ध

अमेरिका व इराण यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी चीन पाकिस्तानबरोबर मिळून प्रयत्न करतोय. मागील आठवड्यात इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची हे चीनच्या दौऱ्यावर येऊन गेले होते. त्यावेळी “मी आशा करतो की चायनीज लोकांनी त्यांना (अराघची) जे सांगणे अपेक्षित आहे, ते सांगितले असेल”, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो म्हणाले होते. होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून इराणने स्वत:च्याच अडचणी आणखी वाढवल्याचे ते म्हणाले. होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणे, चीनसाठी आवश्यक आहे. इराणमधून निर्यात होणारे जवळपास ८५ टक्के तेल चीनला पाठवले जाते. युद्ध सुरू होण्यापूर्वी चीन दररोज १ दशलक्षहून अधिक बॅरल तेल खरेदी करत होता. तसेच युद्ध सुरू झाल्यानंतर देखील चीनने इराणकडून तेल खरेदी सुरू ठेवली होती. त्याचा इराणला युद्धात फायदा झाला. चीनला मिळणारे ६० टक्के तेल होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येते.

आशियातील घडामोडींचे अभ्यासक व सीव्ही स्टार संस्थेचे सिनिअर फेलो रश दोशी यांच्या मते, या दौऱ्यात इराण युद्धासह आणखी तीन महत्वाचे मुद्दे आहेत. आर्थिक-व्यापारी भागीदारी, तैवान आणि एआय. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये या भेटीनंतर अनेकदा भेटी होण्याची शक्यता आहे. एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक को-ओपरेशन, ग्रुप ऑफ ट्वेंटी आणि शी जिनपिंग यांच्या वॉशिंग्टन दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा भेट होईल. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आलेली कटुता कमी करण्याचा, तसेच स्थिरता आणण्याचा या दौऱ्यात प्रयत्न असेल.