Iran attack UAE Project Freedom : संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) सोमवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर फुजैराह येथील ऑइल इंडस्ट्री झोनमध्ये भीषण आग लागली होती. त्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. यूएईवर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची निंदा करतो. सामान्य नागरिक व पायाभूत सुविधांवर हल्ले कधीही स्वीकार केले जाणार नाहीत. भारत यूएईबरोबर आहे. शातंता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक व संवादाच्या माध्यमातून तोडगा काढला जावा, असे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिकेने ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ची घोषणा केल्यानंतर काही तासांतच इराणने यूएईवर हल्ला केला होता. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

यूएईने इराणला कोणता इशारा दिला?

इराणने ड्रोन, बॅलेस्टिक मिसाईल व क्रूज मिसाईलने हल्ला केला, असे यूएईने म्हटले आहे. हवाई सुरक्षा यंत्रणेने इराणचे १२ बॅलेस्टिक मिसाईल, तीन क्रूज मिसाईल आणि चार ड्रोन्स हाणून पाडल्याचे यूएईकडून सांगण्यात आले. “कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही तयार आहोत. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास ठोस प्रत्युत्तर दिले जाईल”, असा इशारा यूएईने दिला आहे. देशातील महत्वाची ऑइल कंपनी असलेल्या ॲडनॉकवर तसेच दक्षिण कोरियाच्या मालवाहू जहाजावर इराणने हल्ला केल्याचे यूएईने सांगितले. इराणच्या सरकारी माध्यमावर इराणच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “हल्ल्यासाठी कोणतेही पूर्वनियोजन करण्यात आले नव्हते. अमेरिकेच्या नौदलाने केलेल्या साहसामुळे हल्ला झाला. होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांना बेकायदेशीरपणे ये-जा करता यावी म्हणून अमेरिकेने उचलेल्या पावलांमुळे यूएईवर हल्ला झाला. याला अमेरिकाच जबाबदार आहे.”

इराणने यूएईवर का हल्ला केला?

अमेरिका व इस्रायलने इराणवर २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केला. त्यानंतर इराणने प्रत्युत्तर देताना पश्चिम आशियात आजूबाजूच्या देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले. त्यात सर्वाधिक हल्ले यूएईवर करण्यात आले होते. गल्फ न्यूजने सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत यूएईच्या एअर डिफेन्स सिस्टिमने २२६० ड्रोन्स, ५४९ बॅलेस्टिक मिसाईल आणि २९ क्रूज मिसाईलचा सामना केला आहे. यूएईमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहे. यूएईची राजधानी अबूधाबीच्या दक्षिणेकडे असलेले अल धाफ्रा एअर बेस अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या हवाई तळाचा वापर करून अमेरिकेने इराणच्या विरोधात अनेक मोहिम राबवल्या. तसेच जेबेल अली बंदरावरही अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांची ये-जा सुरू असते. या बंदरावर अमेरिकन नौदलाची उपस्थिती आहे.

यूएई – इस्रायल यांच्यात अभूतपूर्व संरक्षण भागीदारी?

पश्चिम आशियातील यूएई हा इस्रायलचा मित्रदेश आहे. इस्रायलबरोबर भागीदारी करण्यासाठी यूएईने अब्राहम अकॉर्डवर सही केली आहे. मागील आठवड्यात ‘एक्झिओस’ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने यूएईला इराणच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी ‘आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टिम’ दिली आहे. तसेच सैनिकही पाठवले आहेत. यापूर्वी यूएई व इस्रायलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात संरक्षण भागीदारी झाली नव्हती. इराण सरकारच्या तसनिम न्यूज एजन्सीला इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यूएईला इस्रायलच्या हातातील बाहुले बनू दिले जाणार नाही. त्यांनी तशी चूक करू नये. दरम्यान, यूएईत जगातील एकूण ६ टक्के तेलाचे साठे आहेत. व्यापार, पर्यटन आणि रिअर इस्टेट व्यवसाय तिथे आहेत. तसेच ९० टक्के लोकसंख्या निर्यात क्षेत्रात कार्यरत आहे.

‘प्रोजेक्ट फ्रिडम’ काय आहे?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी ‘प्रोजेक्ट फ्रिडम’ची घोषणा केली होती. या अंतर्गत होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांना मोकळी वाट करून दिली जाईल, असे ते म्हणाले होते. यूएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, मिसाईलला उद्ध्वस्त करणाऱ्या प्रणाली, १०० हून अधिक विमाने, १५००० सैनिक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना अमेरिका लष्करी संरक्षण देणार आहे किंवा नाही, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. अमेरिकेच्या दोन मालवाहू जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर पडल्याचे अमेरिकेने सोमवारी सांगितले. मेअर्स्क या शिपिंग कंपनीने त्यांच्या जहाजाला होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकन लष्कराने सुरक्षा पुरवल्याचा दावा केला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी जहाजांना खुली करण्यासाठी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ची घोषणा करण्यात आली होती.

अमेरिका – इराणमधील शस्त्रसंधीचे काय होईल?

अमेरिका व इराण यांच्यात ८ एप्रिलपासून शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीनंतर दुहेरी नाकाबंदी झाली. एकीकडे इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी केली, तर दुसरीकडे अमेरिकेने इराणकडे जाणाऱ्या जहाजांची नाकेबंदी केली. इराणच्या अणुकार्यक्रमावर ट्रम्प यांनी आक्षेप घेतला आहे. इराणने अण्वस्त्र तयार करण्यासाठी लागणारे युरेनियम अमेरिकेकडे सोपवावे अशी मागणी ट्रम्प यांनी लावून धरली आहे. इराणने अमेरिकेची मागणी धुडकावून लावली आहे. रविवारी (३ मे) इराणने १४ कलमांचा प्रस्ताव अमेरिकेला दिला. होर्मझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्याची नवीन कार्यप्रणाली त्यात देण्यात आली आहे. पुढील ३० दिवसांत युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करून तात्पुरती शस्त्रसंधी संपवण्याचे आवाहन इराणने केले आहे. इराणने दिलेला प्रस्ताव ट्रम्प यांना मान्य नसल्याची माहिती समोर आली आहे.